विधिलिखित भाग-५

वंदनाताईंचा फोन वाजला.पलीकडून आवाज आला.
मिहिरला ओळखता?
हो माझे जावई आहेत ते.
मी पोलीसस्टेशनमधून बोलतोय.त्यांच्या  गाडीचा अपघात झाला. शेवटी ते तुमच्या सोबतच बोलले म्हणून तुम्हाला फोन केला. हाॕस्पिटलचे नाव लिहून घ्या.
वंदनाताईंना काहीच सुचत नव्हते.
त्यांनी हाॕस्पिटलचे नाव लिहून घेतले.
किती लागले असेल मिहिरला? तो ठीक असेल ना?
त्यांच्या मनात आले.
त्यांनी लगेच मिहिरच्या आईला फोन केला आणि हाॕस्पिटलचा पत्ता दिला.
मिहिरचे आईबाबा हाॕस्पिटलकडे निघाले.
वंदनाताई ऊर्वशीजवळ थांबल्या.
उर्वशी आता शुद्धीवर आली.
आई मिहिर पोहचले नाही अजून?
तिने आईला विचारले.
अग पोहचतच होते.छोटासा अपघात झाला त्यांचा.
जास्त लागले नाही.
एवढे तिला सांगून त्या रुमच्या बाहेर पडल्या. मोबाइल रुममध्येच राहला. उर्वशीच्या बाजूलाच. दवाखान्यात एक मंदिर होते.वंदनाताईंना माहित होते.त्या मंदिरात येऊन हात जोडून उभ्या राहिल्या.मिहिरसाठी प्रार्थना करून रुममध्ये परतत होत्या.
वंदनाताईंचा फोन वाजला. फोन उर्वशीच्या बाजूला होता.तिने उचलला.पलिकडून मिहिरच्या आईचा  आवाज  आला.
वंदनाताई मिहिर गेला. 
त्या रडत रडत बोलल्या.
उर्वशीसाठी हा धक्का होता.ती जोरात ओरडली, नाही.
तेवढ्यात वंदनाताई रुममध्ये पोहचल्या.
काय झाले उर्वशी?
ती काहीच बोलू शकली नाही.
वंदनाताईंचे फोनकडे लक्ष गेले.
त्यांना मिहिरच्या आईचा नंबर दिसला.
त्यांनी परत फोन केला.फोन सावीने उचलला.
सावीने ती दुःखद बातमी वंदनाताईंना दिली.
वंदनाताई मटकन बाजूला असलेल्या खुर्चीवर बसल्या.
त्यांच्या मुलीचेही नशीब त्यांच्यासारखेच होते तर.
मिहिरला शेवटचे बघायलाही वंदनाताई,उर्वशी जाऊ शकल्या नाही. बाळाला न बघताच मिहिर लांबच्या प्रवासाला निघून गेला होता.
आई-बाबा,सावी हाॕस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच मिहिर गेला होता.
मिहिरचा अंत्यसंस्कार आटोपला. एका दिवसात परमेश्वराने अतोनात आनंद आणि न पचवता येणारे दुःख  दिले होते. आता या वयात आईबाबा सावरणे शक्य नव्हते.
सावीच पूर्ण घर सांभाळत होती.हाॕस्पिटल काही दिवसांसाठी दुसऱ्या डाॕक्टरकडे सांभाळायला दिले.
आईबाबा,सावी मिहिरचे बाळ बघायला  वंदनाताईंकडे आले. बाळाला बघितल्याबरोबर त्यांना छोटा मिहिर आठवला. असाच गोड आणि गुटगुटीत होता मिहिर.रंग,नाक,डोळे,केस सगळे मिहिरसारखे.
दुसरा मिहिरच आहे हा.
आईचे डोळे पाण्याने डबडबले.
जीव कासावीस झाला मिहिरच्या आठवणीने.घशाला कोरड पडली. बाबांचेही डोळे वाहायला लागले.
सावीने दोघांनाही आधार दिला.
बराच वेळ कुणी कुणाशी बोलले नाही.काय बोलणार? नियतीने वज्राघात केला होता त्यांच्यावर.
उर्वशी काही न बोलता अश्रु गाळत होती.
आईबाबा,सावी जायला निघाले. बाळाला सोडवत नव्हते त्यांना.
बाळ आणि उर्वशीला लवकर घरी पाठवा
असे सांगून ते निघाले.
उर्वशीला आता सासरी जायची इच्छा नव्हती.
मिहिरशिवाय तिथे कसे राहणार?
उर्वशीला हुंदका आवरला नाही.
बाळ आता दोन महिन्याचे झाले.
वंदनाताई आणि उर्वशीचा सगळा वेळ बाळाचे करण्यात जायचा. बाळाकडे बघितले कि दोघींनाही मिहिरची आठवण  यायची. उर्वशीच्या डोळ्यात तर सतत पाणी असायचे. एकेक दिवस ढकलत होत्या दोघीजणी.मिहिरच्या घरी पण तेच होते.
घरात मिहिर नाही,उर्वशी नाही घर खायला उठायचे.
बाळाची पण आठवण यायची.
अधूनमधून बाळाला भेटायला यायचे तिघेही.आता त्यांना बाळाला घरी न्यायचे होते. पण उर्वशी तयार झाली नाही.
वंदनाताईंनी मन घट्ट करुन उर्वशीला  जाण्याविषयी समजवले.
अनिच्छेनेच उर्वशी तयार झाली.
उर्वशी आणि  बाळाला घ्यायला आई बाबा आले.  उर्वशी आणि बाळ जाणार या कल्पनेनेच वंदनाताई खचल्या.
विधवेचे जीवन त्यांनी अनुभवले होते.एकटेपणा किती दाहक असतो याची अनुभूती त्यांनी घेतले होते.
त्यांनीं अनुभवलेला एकटेपणा उर्वशीच्याही पदरात आला होता.
उर्वशी आणि बाळाला आईबाबा घेऊन आले. सगळे दिवसरात्र बाळाच्या भोवती असायची.
आईबाबांनी हाॕस्पिटलमध्ये जाणे जवळजवळ बंदच केले होते. उर्वशीने बाळाचे नाव मोहित ठेवले मिहिरनेच ठरवले होते हे नाव.
मोहित सगळ्यांना मोहात पाडणाराच होता.
केवळ त्याच्या  असण्याने मिहिर जाण्याचे दुःख ते घर पचवू शकले.
मोहित मोठा होत होता. बघता बघता चार वर्षाचा झाला. शाळेत जायला लागला.
तो उर्वशीपेक्षा आईबाबांजवळच जास्त राहायचा.
उर्वशी दिवसभर काय करणार म्हणून तिने बँकेत नौकरी करायला सुरुवात केली.
सावी आता हाॕस्पिटल सांभाळत होती.
वंदनाताईंनी एकटेपणा घालवायला स्वतःला समाजसेवेत  झोकून दिले. समाजसेवा करण्यासाठी त्यांनी एक संस्था काढली. समाजसेवा पण व्हायची आणि एकटेपणा पण जाणवायचा नाही.
एकदा संस्थेच्या कामानिमित्त त्यांना बँकेत जावे लागली. काम मॕनेजरकडे होते. मॕनेजरच्या केबिनमध्ये गेल्या. जुन्या मॕनेजरची बदली झाली होती.
हे नविन मॕनेजर होते. त्यांनी नावाची पाटी बघितली.
पाटीवर ‘जावेद’ नाव बघून चरकल्या त्या.
जावेद अतिशय सभ्य आणि मितभाषी वाटला त्यांना.
त्यांनी जावेदशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने कामाशिवाय बोलण्यात काहीही रस दाखवला नाही.
हा तोच जावेद असेल का? वंदनाताई घरी आल्या पण त्यांची उत्सुकता ताणल्या जात होती.
दुसऱ्या दिवशी त्या परत बँकेत गेल्या.त्यांच्या ओळखीची  एक मुलगी होती तिथे.
तिच्या कडे त्यांनी जावेदची चौकशी केली.
त्यांचा संशय खरा ठरला.
तो  तोच जावेद होता उर्वशीचा.
ज्याला त्यांनी नकार दिला होता तो हाच जावेद होता.
ज्याला उर्वशी कधीही विसरु शकली नाही.
ज्याच्याशिवाय ती सुखात राहू शकली नाही तोच हा जावेद होता.
तेव्हा त्यांनी होकार दिला असता तर आज उर्वशी,
तिचे आयुष्य वेगळे राहले असते.
वंदनाताईंना नेहमीच सलणारी अपराधीपणाची भावना आज जास्त तीव्र  झाली.
वंदनाताई काही तरी कारणे काढून बँकेत जाऊ लागल्या. जावेदसोबत ओळख वाढवण्याचा प्रयत्न  करु लागल्या.पण जावेद दाद देत नव्हता.
वंदनाताईंना स्वस्थ बसवत नव्हते.
जावेदचे लग्न झाले असेल का?  कसे शोधायचे?
तो बोलायचाच नाही जास्त कुणाशी.
मध्ये बरेच दिवस गेले.वंदनाताईंनी प्रयत्न सुरुच ठेवले.
योगायोगाने संस्थेत आलेला एकजण जावेदचा मित्र  निघाला. त्याच्याकडून जावेद अविवाहित असल्याचे वंदनाताईंना समजले.त्यांच्या  मनात आशेची नवी पालवी फुटली. उर्वशीचे नवे आयुष्य सुरु होऊ शकते या विचारानेच किती उभारी मिळाली त्यांना.
क्रमशः
विधिलिखित भाग- वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण marathi.shabdaparna.in    वर पाठवू शकता.
आमचे साहित्य आवडत असल्यास नक्की
like,comment,share करा.
आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow  करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

…..प्रिती….

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!