सुमी आत्ममग्न अवस्थेत असताना तिला आठवले, नोकरी लागून वर्ष झाले असावे. मला दुसरे बाळ झाले यावेळी त्याने मला प्रसुतीसाठी माहेरी जाण्यास व आईला माझ्याकडे येण्यास मनाई केली होती. यावेळी त्याने त्याच्या मावशीला गावावरून दोन महिने आधीपासून माझ्याजवळ आणले होते .पण जशी माझी प्रसुती झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची मावशी तिच्या गावी निघून गेली. त्यामुळे वेळेवर मोठी अडचण निर्माण झाली .आम्ही दोघांनी कशीबशी वेळ निभावून नेली.
त्यानंतर पाच-सहा महिने तो बाहेरगावी जाऊ शकला नाही .त्यानंतर मात्र त्याचे नियमितपणे बाहेर गावी जाणे येणे सुरू होते. यथावकाश माझी बदली दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी झाली. तिथे माझ्या मोठ्या मुलाचा पहिल्या वर्गात प्रवेश केला. तिथे बऱ्यापैकी मराठी बोलणारी लोकं होती .त्यामुळे हळूहळू शेजाऱ्यांशी ओळख झाली व तिथे मी चांगली रुळले. आतापर्यंतचा एकटेपणा थोडा कमी झाला .माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याचे लोकांशिवाय जगणे म्हणजे अर्धवट जगणे होय. याची अनुभुती आली.
इथे कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश महिला होत्या. हळूहळू त्यांचेही जीवनपट थोडक्यात माझे समोर येऊ लागले .एक महिला कर्मचारी शीला तीचा नवरा तिला सोडून दुसऱ्या बाईसोबत गावी राहत होता. ती मुलांना घेऊन इथे नोकरी करीत होती .इतर लोक तीच्याबद्दल काहीबाही बोलत पण प्रत्यक्षात ती अतिशय खंबीर होती. हे तिच्या व्यवहारावरून मला नंतर कळले. तिची मुले पंधरा व तेरा वर्षाची होती. पण तिच्या आज्ञे बाहेर नव्हती. सर्व संसार व व्यवहार ती स्वतः समर्थपणे सांभाळत असे.
दुसरी महिला कर्मचारी सुशिला. तिला मूलबाळ होत नव्हते म्हणून तिचा नवरा तिच्याजवळ कमी आणि गावी जास्त राहायचा .म्हणून तिने तिच्या नवऱ्याचे स्वतःची मावस बहिण सुनिता सोबत दुसरे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला .त्यानंतर सुनिताला तीन अपत्ये झालीत. ही सर्व जण एकत्र राहतात. सुरुवातीपासूनच सुशीला घरी गेल्याशिवाय तिचा नवरा व सुनीता जेवण करत नसत. जेव्हा सुशीलाला कार्यालयात काही कामाने उशीर झाला तेव्हा सुनिता तिला घ्यावयास कार्यालयात येत असे.सुशीलाच सर्व घर खर्च करीत असे. तिचा नवरा मोलमजुरी करीत असे. जेव्हा सुनिता सुशीला ला घ्यायला कार्यालयात येत असे तेव्हा मी सुनीताची विचारपूस करीत असे. सर्वजण आनंदी असल्याचे दिसत होते. या दोघी किती समंजसपणे आणि प्रेमाने वागतात याचे मला फार आश्चर्य वाटे.
तिसरी कर्मचारी वत्सला. तिला नवऱ्याने सोडले होते .तीने गावावरून सर्व भावांच्या सहा मुलांना ईथे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी आणले होते. त्या सर्वांसोबत ती इथे राहत होती. आणि सर्वांचा खर्च तीच करीत असे.
वरील सर्व कर्मचाऱ्यांचे वय तीस ते पस्तीस वर्षाच्या आसपास होते. सर्व महिला नवऱ्याशिवाय एकट्याने समर्थपणे संसार चालवत होत्या. त्या माझ्यासारख्या भेकड नव्हत्या .कमी शिकलेल्या पण हिंमतवान होत्या. लोकांच्या टीकेला न घाबरता त्यांना तोंड देऊन घट्ट पाय रोवून समाजात ताठ मानेने उभ्या होत्या. मी स्वतःबद्दलच्या कमकुवतपणा ने खजील झाले.
एकदा माझा नवरा असाच बाहेरगावी गेलेला असताना शेजारच्या इंदूताई व सुनंदाताई दुपारच्या निवांत वेळी माझ्याकडे गप्पा मारायला म्हणून आल्या. त्यांच्यासाठी मी चहा नाश्ता केला. गप्पांच्या ओघात ईंदू ताई मला म्हणाल्या
,”ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ,पण एक विचारावेसे वाटते .तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर काम करता आणि एवढा मोठा पगार असून तुम्ही एवढ्या स्वस्त साड्या घालता. तुमच्याकडे मंगळसूत्र नाही का ? हे तुमच्या गळ्यातील जुने मणी आताच्या मुली घालत नाहीत. नाही… म्हणजे … तशी आता फॅशनच नाही. आम्ही गृहिणी असून नवऱ्याच्या कमाईवर तुमच्या पेक्षा चांगल्या साड्या व मंगळसूत्र घालतो. तुम्हाला वाटत नाही का असे घालावेसे ?”
मी चाट पडले. माझ्या गळ्यात सासूबाईंनी दिलेले चार मणी आणि वाटीसारखे डोरले अजूनही तसेच होते .हे माझ्या लक्षात आले.तरी मी म्हणाले , माझ्या नवऱ्याच्या हाती व्यवहार आहे , त्यामुळे तो जेंव्हा घेऊन देईल तेंव्हा मी पण घालीन की.. त्या दोघीही हसू लागल्या. त्या पुढे बोलू लागल्या
,अहो ताई इतक्या भोळ्या कशा तुम्ही ?आम्ही एवढ्या साड्या आणि स्वतःसाठी खरेदी करतो . ते काही आम्ही नवऱ्याला सांगत नाही. आणि कधी नवऱ्याचे लक्ष गेले आणि विचारले तर, ते मागच्या वर्षीच घेतल्याचे आम्ही सांगतो. आमचा नवरा पगार झाला की आमच्या हाती पगार देतो.
खर्चाचे नियोजन आम्हीच करतो. मला त्यांचा हेवा वाटला.
तुम्ही तुमचा पगार नवर्याजवळ का देता?
असे सुनंदाताई ने सरळच विचारले , त्यावर मी ओशाळत म्हणाले,
माझा नवरा काही कमवत नाही. त्याला वाईट वाटू नये. म्हणून मी त्याला पगाराबद्दल काही बोलत नाही. आणि मी तरी एवढे पैसे काय करू
हे ऐकून इंदूताई म्हणाल्या, पण तुमच्या नवऱ्याने तरी तुम्हाला व मुलांना चांगले कपडे व मंगळसूत्र इत्यादी आवश्यक गोष्टी घेऊन द्यायला पाहिजे. ही तुमची साडी कामवाली सारखी दिसते हो.. मला चांगले वाटत नाही म्हणून बोलले. तुम्ही राग मानू नका.
मी म्हणाले ,खरच आहे तुमचे माझ्या सासरची लोकं गरीब आहेत. माझा नवरा पैसे वाचवून त्यांच्याकरिता खर्च करतो आहे .म्हणून सध्या आमची काटकसर सुरू आहे.
ईंदूताईंना हे पटले नाही. त्यांनी तोंड वाकडे केले व हा विषय इथेच संपवला.
काही दिवसांनी नवरा माझ्याकडे परत आला. पैशाचा हिशोब मागून लागला. मी म्हणाले ,
मी आता माझे पैसे देणार नाही.
आमचे खूप कडाक्याचे भांडण झाले. पण मी डगमगले नाही . त्याला पैसे दिले नाही. त्यामुळे त्याची पुन्हा बाहेर गावी कसे जावे? या बाबत चुळबूळ सुरू झाली. तो दररोज काही ना काही निमित्त काढून भांडू लागला. मुले रडत असली तरी त्यांना जवळ घेत नव्हता. त्याने असहकार पुकारला
. तुला माझ्यापेक्षा जास्त पैसा प्रिय झाला तर…
असे म्हणून तो पुन्हा बाहेर गावी निघून गेला. मी यावेळी त्याला पैसे दिले नाही. आता तो बरेच दिवस माझ्याकडे आला नाही.
क्रमशः
प्रिय वाचक,लेखक तुम्हीही तुमचे लिखाणा शब्दपर्णवर पाठवू शकता.
सुमीमधील बदल प्रशंसनीय.
छान..