प्रतिशोध- मराठी स्त्री कथा
वैशाली श्रीमंत घरात जन्मलेली एकुलती एक मुलगी असल्याने मम्मी पप्पांच्या गळ्यातील ताईत होती. दिसायला सुस्वरूप, रंगाने गोरीपान, सडपातळ बांध्याची वैशाली कॉलेजला जायची तेव्हा सर्वजण तिच्याकडे टक लावून बघायचे. तिचे व्यक्तिमत्व लोभस होते फक्त एका डोळ्यातील व्यंग सोडले तर ती सर्वगुणसंपन्न होती. वैशाली अभ्यासात जशी हुशार होती तशी तिला स्वयंपाकाचीपण आवड होती. घरच्या सर्व नातेवाईकांत व नोकरचाकरात ती आवडती होती.तिच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. बंगला , गाडी सर्व सुखसोयी होत्या.
सुरज हा तिच्याच वर्गात शिकत होता . त्याला ती मनापासून आवडत होती. पण तो तिला सांगायची हिंमत करू शकला नाही .त्याला गाण्याची फार आवड होती. कॉलेजच्या कार्यक्रमात तो छान गायचा. पण वैशालीला कधी त्याचे आकर्षण कळलेच नाही. नव्हे ती स्वतःच्या विश्वातच धुंद असायची . तिच्या कॉलेजमध्ये भरपूर मैत्रिणी होत्या.ती नेहमी मैत्रिणींच्या गराड्यात असायची.ताच्या समंजस स्वभावाने तिची कुणाशीही सहज मैत्री होऊन जायची.
कॉलेजच्या फायनल परीक्षा सुरु होणार होत्या. वर्गातील विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर करायचे ठरवले. वैशाली पण गेली कार्यक्रमाला. तिथे सर्वांना आपापल्या भविष्यातील नियोजनाबद्दल, करिअर बद्दल सांगायचे होते. सूरज म्हणाला मी गायक होणार, कुणी इंजिनिअर कुणी डॉक्टर कुणी प्राध्यापक, वैशालीने मी चांगली गृहिणी होणार असे सांगितले आणि एकच हशा पिकला. सर्वांनी मनसोक्त हसून झाल्यावर एकीने तिला विचारले,
अगं सर्वजणी गृहिणी असतात पण तू करिअर काय करणार आहेस असे सर्व विचारत आहेत. हेच माझे करिअर ,तिने पुन्हा तिचा मुद्दा ठासून सांगितला. कार्यक्रम संपला सर्वांनी एकमेकांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व एकमेकांचा निरोप घेतला. सर्व जण आपापल्या घरी जावयास निघाले .सुरजची नजर तिच्यावरच खिळलेली होती. त्याला काही बोलायचे होते पण हिम्मत झाली नाही. तिचा ड्रायव्हर बाहेर वाट बघत उभा होता. तिला सुरज तिच्याकडेच बघतोय हे जाणवले.
ती त्याच्याजवळ गेली
,काय सुरज कसा आहेस? मोठा गायक हो आणि हो …तुझ्या कार्यक्रमाला मला बोलवत जा .
तो थोडा संकोचून म्हणाला, जर तसे झाले तर नक्कीच .आणि ती जायला निघाली. त्याला मनातल्या भावना ही तिच्यासमोर व्यक्त करता आल्या नाहीत.
फायनल ची परीक्षा संपली. आणि वर्गातील सर्व जण वेगवेगळ्या दिशेने आपापले ध्येय पूर्ण करण्यासाठी निघाले .
इकडे वैशाली च्या आईने वैशाली साठी स्थळ शोधणे सुरू केले .परंतु तिच्या डोळ्यातील व्यंगामुळे तिचे लग्न जुळत नव्हते. वैशालीला प्रथमच आपल्या व्यंगाची इतकी प्रकर्षाने जाणीव झाली . मला कोणीही पसंत करत नाहीत. माझ्या व्यक्तिमत्वाला काहीच किंमत नाही . माझ्या कलेला माझ्या गुणाला कोणीच बघू शकत नाही. याचे तिला फार वाईट वाटले, त्यापेक्षाही तिच्या मम्मी-पप्पांना वाईट वाटायचे.
आणि एक दिवस स्थळ आले. मुलगा दिसायला रुबाबदार आणि सुस्वरूप होता. पहिल्याच वेळी वैशाली च्या मम्मी-पप्पांना मुलगा पसंत पडला. वैशाली ला पण तो आवडला होता. पण त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे कळले .संपत्तीचा काही विषयच नव्हता वैशालीच्या पप्पाकडे जे काही आहे ते वैशालीचे तर होणार होते. तरीसुद्धा वैशाली च्या मम्मी-पप्पांनी वैशाली च्या डोळ्यातील व्यंगाबाबत मुलाला स्पष्टपणे विचारले.
सागर म्हणाला वैशाली च्या सौंदर्यात तिच्या डोळ्यातील व्यंगामुळे काहीही फरक पडत नाही. ती मुळातच सुंदर आहे .सर्वांना हायसे वाटले. वैशालीचे लग्न मोठ्या थाटामाटात ,भरपूर दागदागिने, भेट वस्तू इत्यादी देऊन लावण्यात आले. वैशाली सासरी गेली. मम्मी-पप्पांना तिच्या आठवणीने हुंदके आवरणे कठीण झाले. त्यांची लाडकी लेक आता दुसऱ्याची झाली होती. दोघेही तिच्या बालपणापासूनच्या आठवणी काढून हुंदके देत होते. आणि एकमेकांना धीरही देत होते की त्यांची मुलगी आता सुखात संसार करणार आहे.
वैशालीचे दिवस मजेत जात होते. सागर तिला किती जीव लावतो हे ती रोज मम्मी-पप्पांना फोन करून सांगत असे. मुलगी सुखी आहे या भावनेने मम्मी-पप्पांना आनंद व्हायचा. काही महिन्यातच सागरने आपला चेहरा दाखवायला सुरुवात केली .तो वेळोवेळी तिला माहेरून पैसे आणायला सांगत असे.ते संपले की पुन्हा तीच मागणी.
तिचे मम्मी-पप्पा सागरची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना वेळोवेळी पैसे पाठवायचे. वैशाली च्या पप्पांना नेहमी वाटत असे की, सागर ने त्या पैशात काही व्यवसाय सुरु करावा .एक-दोन वेळा त्यांनी सागरला तसे प्रत्यक्ष विचारले देखील. परंतु सागर ते गांभीर्याने घेत नव्हता. वैशालीला सुद्धा त्यांनी ही बाब सागरला समजावून सांगण्याबाबत बोलले होते .वैशालीने सागरला समजावून सांगितले परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.तिलाही सागरचे हे वागणे कळायचे नाही . तो काय काम करतो हे तो अजूनही तिला का सांगत नाही हेच तिला कळेना.
क्रमशः
तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
निर्मला मेंढे
छान सुरुवात कथेची
छान.. गुंता सारखीच या कथेची उत्सुकता