४- डायरी शलाकाची
४- डायरी शलाकाची

४- डायरी शलाकाची

४- डायरी शलाकाची
सई,शलाका,राजा तीन बहीणभाऊ आणि  आईचे बाबांविना असलेले घर.सईचे लग्न झाले.राजा होस्टेलमध्ये गेला.शलाका आणि आई दोघीच घरी….पुढे ….
डायरी शलाकाची
भाग-४
काय बोलणार? ती आता जास्त भूतकाळात असते तिच्या. तिचा भूतकाळ मानसला पूर्ण  अपरिचित.
काॕलेजमध्ये आजचा दिवस चांगला गेला.
ती विद्यार्थ्यांची आवडती प्रोफेसर होती.
काॕलेज संपले. घरी आली. घरी तेच रुटीन. मानस अभ्यासिकेत,सुखदा तिच्या अभ्यासात बिझी.
रोजची संध्याकाळ तिची एकटीचीच राहायची. संध्याकाळ घालवायला सोबती मिळत गेले पण तात्पुरते. संध्याकाळची उदासीनता घालवणारा कायमचा सोबती कोणीही मिळाला नाही.
आज डाॕ. रिषभची खूप   आठवण आली. फोन करु का? बिझी असेल का? म्हणत शलाकाने फोन लावला सुद्धा.
हॕलो स्वीटहार्ट.पलीकडून आवाज आला.बिझी का रे डाॕ?
 ती रिषभला डाॕक्टरच म्हणायची.
तुझ्यासाठी कधीच बिझी नसतो स्वीटहार्ट. बोल.कशी आठवण झाली?
काही नाही सहजच रे. एकटे वाटत होते.तुझ्याशी दृबोलावेसे वाटले. कसा आहेस?
 मजेत आहो ग.
तेवढ्यात नर्सने रिषभला आवाज दिला.
साॕरी यार शलाका मी बोलतो नंतर तुझ्याशी. इमर्जन्सी आहे.
माझ्या आयुष्यात येणारे सगळे पुरुष बिझीच निघाले.
शलाका पुटपुटली. एकटेपणा आला कि ती रिषभलाच काॕल करायची.
रात्रीची जेवणे झाली. परत तेच रुटीन.
पण आता शलाकाला तिच्या खोलीत जायची घाई व्हायची. तिच्या हातून निसटलेले दिवस  तिची वाट बघत असायचे.
डायरीच्या रुपात तिला तिची मैत्रीण मिळाली होती. हक्काची.तिने सांगितलेले सगळे सामावून घेणारी.तिच्या मनात इतके वर्ष जे जे साचत गेले ते  ती  डायरीत व्यक्त करु शकत होती.
शलाका खोलीत आली.पेन घेतला.डायरी उघडली.कालचे पान पलटले.
दिनांक…..
सईने आज घरी सांगितले कि तिच्याच काॕलेजमध्ये एक मुलगा आहे.त्याला आईला भेटायचे आहे.
 आई भेटायला तयार झाली.आईचा सईवर विश्वास होता. सई संदीपला घेऊन घरी आली.आईला आवडला तो. त्याला बँकेत नौकरी लागली होती. आई लगेच सईच्या लग्नासाठी तयार झाली.
 तसेही बाबांमुळे तिचे लग्न होणे कठीणच होते. सईच्या लग्नाचे बाबांना सांगणे  आईला गरजेचे वाटत होते.
 बँकेतून पत्ता मिळवून आईने मला त्यांना घरी जाऊन सांगायला सांगितले.माझी इच्छा नव्हती पण आईसाठी गेली.
बाबा आॕफिसमधून आले होते. पाचसहा वर्षांनी मी बाबांना बघत होते. मला बघून बाबांना  आनंद झालाय  असे काही वाटले नाही.संकोचल्यासारखे  वाटले बाबा.घरात एक छोटा तीन चार वर्षाचा मुलगा होता.कसेसेच वाटले मला त्याला बघून.ती दुसरी बाई पण होती. तिच्यापेक्षा माझी आई कितीतरी सुंदर  होते.बाबांना काय आवडले असेल हिच्यात? काहीतरी तर नक्कीच असणार माझ्या मनात आले.
 मी घाईघाईने  सईच्या लग्नाचे सांगितले.मला तिथून पळ काढावासा वाटला.बाबांनी जास्त रस घेतला नाही.
सख्ख्या मुलीच्या लग्नाबद्दल या माणसाला काहीच उत्सुकता असू नये. मी निघतांना ते एवढेच म्हणाले,’पैशांची काही गरज लागली तर सांगाल मला.’
तिथून निघाल्यावर माझ्या मनात असंख्य विचार येत होते.’
रक्ताचे नाते एवढे तकलादू कसे? बाबा आमच्यापासून एवढे दूर कसे गेले? बाबांनी आमच्यावर,आईवर कधी प्रेम  केले असेल का? करायचे आधी.मला आठवतात काही आठवणी.आमचे पण खूप लाड करायचे बाबा.  आमचे सगळे हट्ट पुरवायचे.  बाबा आईला घरकामात मदत करायचे.लोकांना दोघांची जोडी आदर्श वाटायची. आईची प्रत्येक वस्तु बाबांच्या पसंतीची राहायची. आणि बाबाही आईचे म्हणणे टाळायचे नाहीत.मग कसे बिनसले असेल यांचे नाते?  बाबा दुसरीकडे कसे आणि का ओढल्या गेले असतील?
 आई कुठे कमी पडली असेल? आईचा कोरडेपणा नडला असेल का? आई कोरडी असली तरी बाबांवर तिचे खूप प्रेम होते.बाबांसारखे तिला व्यक्त करता यायचे नाही.
बाबांनी आम्हालाही सोडले.माझ्या डोळ्यात पाणी आले.
आई बाबांसाठी जन्मभर झुरत राहिली. बाबांचे दुसऱ्या  कुणावर प्रेम आहे हे माहित असूनही तिचे बाबांवरचे प्रेम तसुभरही कमी झाले नाही. बाबांना माहित होते आईचे बाबांवर किती प्रेम आहे ते. 
तरीही बाबा आईला सोडून दुसऱ्या बाईवर प्रेम करायला लागले.  काय असते ही प्रेमाची  भावना? ह्या भावनांचे मापन करायला एखादा मापक असायला हवा होता.
विचारांच्या तंद्रीतच मी घरी पोहचले.  आई वाट बघत होती.तिला उत्सुकता होती बाबांबद्दल जाणून घेण्याची. मी सांगितले आईला बाबा जास्त काहीही बोलले नाही फक्त काही गरज वाटली तर सांगा म्हणाले. आई,आपण त्यांना  मुळीच पैसे मागायचे नाही.मी आईला म्हणाले.आईच्या डोळ्यात टचकन् पाणी आले.आईला किती वाईट वाटले असेल मी  सांगितलेले ऐकुन. 
दिनांक…….
आज सईचे लग्न झाले. राजाची सेमिस्टर पुढच्याच आठवड्यात म्हणून तो दोनच दिवसासांठी आला.
आईने एकटीने लग्नाचा डोलारा सांभाळला.
पैशांची जमवाजमव,पाहुण्यांची राहण्याची सोय,सईच्या सासरच्यांचा मानपान सगळे तिने निभावून नेले.
 पण ती शेवटपर्यंत बाबांची वाट बघत होती. तिला खात्री होती सईच्या लग्नाला बाबा येतीलच. बाबा आले नाहीत.कसे येणार? बाबांनी लग्नाची तारीख विचारली नाही आणि मी पण स्वतःहून सांगितली नाही.
सईचे कन्यादान मामा मामींनी केले. सईची पाठवणी करतांना आईच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते.
सई जाणार या कल्पनेने मला पण धडधडत होते.
आई दिवसभर शाळेत असली कि सईच घराला,आम्हाला सांभाळायची. सईचा आईला खूप आधार होता. आणि आता सईच चालली होती.
सईची पाठवणी झाली.मंगलकार्यालयातून घरी आलो. कालपर्यंत लग्न आहे म्हणून असणारा आनंद  आज सईची पाठवणी झाल्यानंतर संपला होता.  घर  सुनं सुनं झाले होते.
आधी बाबा मग राजा आणि आता सई सगळे एकेक जण आईला,घराला सोडून गेले. मी आईला बिलगून म्हणाले
 ‘आई मी नाही जाणार तुला सोडून.’ आईने घट्ट पकडले मला.
एक एक करुन सगळे आईला सोडून गेले.शलाकाने आईला न सोडण्याचा,तिच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
क्रमशः

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!