मी डोक्यात असंख्य विचारांचे काहूर सोबत घेऊन त्याच्या बरोबर चालु लागले . ना प्रेमाची कबुली, ना कोणते वचन, तरी मी त्याच्यासोबत संसार करण्यासाठी त्याच्या मागोमाग चालु लागले.
आम्ही बस स्टॅंड वर पोहोचलो.आधी तालुक्याला व तेथून दुसरी बस पकडून त्याच्या गावी जायचे होते. आम्ही तालुक्याला पोचलो. तिथे गावच्या बसला यायला बराच वेळ असल्यामुळे त्याची मोठी बहीण येथेच राहत असल्याने तिच्याकडे जायचे ठरवले .आम्ही मोठ्या नणंदे कडे गेलो. तिने यथोचित स्वागत केले. चहा नाश्ता केला. आणि गमतीने म्हणाली जर तुम्हाला आमच्या घरीही प्रवेश नाकारला तर ..मी बुचकळ्यात पडले. तिने लगेच पुष्टी केली, तसे आमचे घरचे लोक चांगले व समजूतदार आहेत . ते तसे काही करणार नाहीत. मला बरे वाटले. आम्ही परत जायला निघालो. एव्हाना आमची बातमी गावात घरी पोहोचली होती. बस मध्ये तो म्हणाला घरी लहान थोर मंडळी आहेत. त्यांचे समोर तुझ्या सोबत मला जास्त बोलायला जमणार नाही .खेड्यातली रीत जरा वेगळी असते. त्याप्रमाणे वागायला हवे .मी हो म्हणाले .
त्यानंतर मी काहीतरी बोलण्यासाठी त्याला” तू” संबोधले. त्याने लगेच माझ्या गालावर झणझणीत थापड मारली आणि म्हणाला यापुढे “तू” नाही ” तुम्ही” म्हणायचे. माझा गाल लाल झाला होता आणि चुरचुरत होता. किती वेगळे व्यक्तिमत्व आहे याचे .माझ्या घरी किती निर्लज्जपणे वागत होता आणि त्याच्या घरी लहान मुलांसमोर वाईट संस्कार होतील म्हणून मला बोलायची मनाई करतो. मला माझ्या छोटी ची आठवण झाली. तिच्या बालमनावर किती वाईट संस्कार होत असतील .किती गोड मुलगी आहे ती.
आम्ही घरी पोहोचलो तेव्हा सायंकाळ झाली होती. दिवे लागले होते .माझ्या मोठ्या जाऊबाईने मला हळद कुंकू लावून माझे स्वागत केले . तिनेच पुरणपोळी ,डाळीचे वडे, भजे, कढी असा जेवणाचा बेत केला होता. त्याचे गावी त्याचे तीन मोठे भाऊ व त्यांचा परिवार शेजारी शेजारी राहत होता .प्रत्येकाचा स्वतंत्र कामधंदा व संसार होता. परंतु कोणी पाहुणे आले किंवा घरी कोणताही कार्यक्रम असला की सर्वांचा एकत्र स्वयंपाक व जेवणे होत . तसेच आजही सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर आमच्या लग्न बाबत चर्चा केली.
उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कोर्ट मॅरेज करायचे ठरले .त्यानंतर सर्व आपापल्या घरी झोपावयास गेले .माझी सासुबाई व लहान दिर वेगळे मूळ घरात राहत असत .तेथे आतले स्वयंपाकघर व बाहेरची ओसरी अशी घराची रचना होती. सासूबाईंनी आमची झोपायची व्यवस्था स्वयंपाक घराच्या एका कोपऱ्यात करून घेतली होती. सासुबाई व दिर बाहेरच्या ओसरीत झोपले .आता पर्यंत आम्ही दोघेही एकमेकांना काही बोललो नव्हतो. सर्व शांत झाल्यानंतर त्याने मला जवळ घेतले . एक हलकी वेदनेची लहर उमटली व रात्रीच्या काळोखात विरून गेली .बाहेर आवाज जाऊ नये म्हणून त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला.
सकाळी जाग आली तेव्हा सहा वाजले होते .माझ्या जावा उठून त्यांची सडा-रांगोळी झाली होती.कोणाचा चहा पण झाला होता तर कोणी आंघोळीच्या गडबडीत होते. मुले चहाच्या कपात काहीतरी बुडवून खात होती.
मी आंघोळ करून मोठ्या जाऊबाई कडे स्वयंपाकात मदत करायला गेले. तिकडे माझ्या सासूबाई ने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या माळेतून काही मणी व डोरले काढून माझ्यासाठी काळ्या मण्याची पोथ तयार केली होती. आणी मला बोलावून माझ्या नवऱ्या कडून ती माझ्या गळ्यात बांधून घेतली. त्याक्षणी मी खूप भावूक झाले होते ,माझे सर्वांग शहारुन आले . माझ्या जीवनातील खुप मोठा बदल मी अनुभवत होते. त्यानंतर सर्वांची एकत्र जेवणे झाली.
दुसरे दिवशी त्याचे दोन मोठे भाऊ , सासुबाई व आम्ही दोघे असे आम्ही पाच जण जिल्ह्याच्या ठिकाणी विवाह नोंदणी कार्यालयात गेलो . तेथे माझ्या जन्मतारखेचा पुरावा मागितला तो आम्ही सोबत नेलेला नव्हता .त्यामुळे परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही परत तेथे सर्व आवश्यक कागदपत्रानिशी गेलो व नोंदणी पद्धतीने विवाह रजिस्टर केला. त्यानंतर मला सासूबाईंनी दुकानात नेऊन एक पिवळ्या रंगाची किनार असलेले पांढरी साडी व दोन गाऊन घेऊन दिले.
क्रमशः
सुमीच्या आयुष्यात पुढे काय होते? …..वाचत रहा पुढील भाग
आणि कथा तुमच्या मनापर्यंत पोहचत असल्यास नक्की like करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल
भाग सातची लिंक
https://marathi.shabdaparna.in/७-गुंता-एका
प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..
शब्दपर्ण फुल ना फुलाची पाकळी म्हणून शब्दपर्णसाठी जे लेखक लिहितील त्यांना views नूसार मानधन देणार आहे.
१००० views.ला १५ रु…..याप्रमाणे.
लिखाण पाठवण्यासाठी marathi.shabdaparna.in वर Registration करा.
Registration करायला काही अडचण आल्यास
9867408400 वर तुमचा नंबर आणि नाव पाठवा.आम्ही Registration करुन देवू.
बापरे.. किती यातना… समोर काय उत्सुकता