९-उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
चैतन्यचे काहीतरी बिनसले हे नक्की याची प्राचीला खात्री पटली पण काय बिनसले याचा अंदाज येत नव्हता.
उद्या आनंदी जाणार या विचाराने चैतन्य रात्रभर झोपू शकला नाही. तिच्या आठवणी तर छळत होत्याच पण पुढे काय हाही प्रश्न होताच. पुढे …..
भाग-९
आनंदी घरी परत आली. अनंतराव वाटच बघत होते.
त्यांना आनंदीशिवाय कोणी नव्हते. आनंदीने चैतन्य आणि तिला लग्न करायचे हे त्यांना सांगितले होते.पण त्याही आधी अनंतरावांना आनंदीच्या डाॕक्टरकडून समजले होते.
त्यांची काही हरकत नव्हती. उलट त्यांना खूप आनंद झाला.
लहानपणापासून चैतन्यला बघितले होते.शिवाय आनंदचा जवळचा मित्र.
आनंदीने कायम आनंदी राहावे इतकेच हवे होते त्यांना.
आनंदीने घरी पोहचल्याबरोबर चैतन्य भेटल्याचे त्यांना
सांगितले.तिचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता.
अनंतरावांनी आनंदीला चैतन्य इथे कधी येणार…विचारले.
लवकरच येईल बाबा.
बोलव लवकर .तो आला की लग्नाबद्दल बोलू.तुझे लग्न झाले की मीही मोकळा.
पण बाबा लग्नानंतर मी राजकारण सोडेल.चैतन्यची आधीपासून ती अट होती.
हरकत नाही बेटा.राजकारणापेक्षा तुझा संसार,तुझा आनंद मोठा आहे.
आनंदी तिच्या रुममध्ये गेली. चैतन्यला सकाळपासून फोन लावत होती ती पण लागत नव्हता. आता पुन्हा लावला.त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते.
फोन लागला.पण चैतन्यने कट केला.
कामात असेल चैतन्य. आनंदीने विचार केला.
चैतन्यला रिंग आली.आनंदीचे नाव बघून कट केला त्याने फोन.
प्राचीसमोर काय बोलणार आनंदीशी?
आधीच त्याचे थाऱ्यावर नसलेले चित्त बघून ती प्रश्न विचारत राहायची.
चैतन्य प्राचीसोबत सिनेमा बघायला गेला नाही म्हणून मग ती संध्याकाळी मैत्रिणीकडे गेली.
ती गेल्याबरोबर चैतन्यने आनंदीला फोन केला.
कालपासून तो आनंदीशी बोलला नव्हता.ह्या दोन तीन दिवसातच आनंदीसोबत बोलण्याची किती सवय झाली होती त्याला. मधले काही वर्ष सोडले तर आनंदीशी रोज बोलल्याशिवाय त्याचा दिवस जायचा नाही.
आनंदी बराच वेळ चैतन्यशी बोलत राहिली.
‘चैतन्य बघ,मी पारसपिंपळाच्या पारावर बसून आहे आता. किती गप्पा केल्या आपण याच्या साक्षीने.
आपल्या सगळ्या गुजगोष्टी याला माहीत आहेत.
तू,मी ,आनंद याच्यासमवेतच मोठे झालो.
आपण दोघे तर आता पुन्हा भेटलो, आता सोबत राहू.पण आनंद नसणार आपल्यात.’
बोलतांना आनंदीचा गळा दाटून आला.
आनंदीचा एकटेपणा चैतन्यला लांबूनही जाणवला.
‘चैतन्य कधी येतो बाबांना भेटायला?
त्यांना भेटायचे आहे तुला. ये ना लवकर’
‘बघतो.चैतन्यने कसेबसे उत्तर दिले.
‘अरे बघतो नाही.तू बाबांना भेटल्याशिवाय लग्न कसे होणार आपले. तू पुन्हा गायब होण्याआधी आपण लग्न करु.आणि आपण लग्न इथेच करु ह्या वृक्षाच्या साक्षीने. आपल्या सगळ्या आठवणींचा साक्षीदार तोच राहिल.’
चैतन्यने फोन ठेवला. दोन तीन दिवसात आयुष्य पूर्ण बदलले त्याचे. स्थिर असलेल्या जीवनात आनंदीच्या रुपात वादळ आले होते. वादळातून बाहेर पडणे सोपे नव्हते. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो अधिक गुंतत चालला होता.
आनंदीने त्याचे आयुष्य किती व्यापले हे जाणवत होते त्याला.
मग प्राची? मला आवडते ती.माझी काळजी घेते ती. मी पण घेतो. पण एकमेकांची काळजी घेणे म्हणजे प्रेम आहे का? मी प्राचीवर प्रेम करतो का?
मी प्राचीवर प्रेम केले असते तर आनंदी कधीचीच मनातून हद्दपार झाली असती.
आनंदीची जागा आनंदीचीच आहे. प्राचीसोबत लग्न ही केवळ तडजोड होती का?
चैतन्यला विचार करुन करुन अस्वस्थता येत होती.
मनाची तगमग थांबत नव्हती.
मध्ये आठएक दिवस गेले.चैतन्य कंपनीत जात होता.
आनंदी रोज फोन करुन लवकर ये चा हट्ट करत होती. तो काहीतरी कारणे सांगून जाण्याचे टाळत राहिला.काय करावे चैतन्यला कळत नव्हते.
प्राचीला सांगावे का?
पण त्याचे नसले तरी प्राचीचे त्याच्यावर प्रेम आहे हे चैतन्यला माहिती होते. तिला सांगितले तर ती समजून घेईल का?
नाही घेईल.तिला हे सहन होणार नाही. तुटून जाईल ती.
आनंदीचा फोन आला कि सगळेच अनुत्तरीत प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत राहायचे. आनंदीला काय सांगू ? खरे तर सांगायलाच हवे. दोघे एकमेकांशी बराच वेळ बोलत राहायचे.
एक दिवस दुपारी चैतन्य कंपनीत असतांना चैतन्यला अनंतरावांचा फोन आला. त्यांनी त्याला भेटायला बोलवले.
येतो असे सांगून चैतन्यने फोन ठेवला.
का बोलवले असेल अनंतरावांनी? आनंदीने नक्कीच माझ्याबद्दल त्यांना सांगितले असेल.
मी आनंदीला समजवून सांगू शकलो नाही पण अनंतरावांना मी समजावून सांगेन अशी खुणगाठ मनाशी बांधली.
शनिवारी सकाळी उठून प्राचीला आज गावी जातो असे सांगितले.
अचानक?
प्राचीने विचारले.
हो ग.
गेलोच नाही कित्येक वर्षात.एकदा भेटून येतो.
आपले लग्नही कोर्ट मॕरेज झाले.तिथल्या खूप लोकांना माझे लग्न झाले हेही माहीत नाही.
मी येवू का चैतन्य?
पुढल्या वेळी दोघे जावू.
चैतन्य गावी निघाला…..
क्रमशः
PreviousLink
चैतन्य आनंदीला भेटायला गावी निघाला…काय होईल त्यांच्या भेटीनंतर….वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान लिहिले
धन्यवाद
चैतन्य, आनंदी प्राची सोबत स्वतः ची सुद्धा फसवणूक करतोय .
छान कथा
धन्यवाद मोहिनी.
जे हातातून निसटले ते मिळवण्याचा मानवी स्वभाव आहे.