८-उसवले धागे कसे?-कथामालिका
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
भाग-८
बाजूला प्राची होती आणि मनात आनंदी.
त्याच्या जीवाची नुसती तगमग चालली होती.
प्राची किती शांत आणि तृप्ततेने झोपली.
प्राचीमुळे माझे अस्थिर असलेले आयुष्य सावरले.
पण आनंदी?
आयुष्यात कित्येक वर्ष फक्त आनंदी होती.
आता पण आहेच….जागे झालेले मन बोलले.
चैतन्य झोपायचा प्रयत्न करत होता.पण डोळे बंद केले कि समोर आनंदी दिसत होती.
परवापर्यंत स्थिर असलेले आयुष्य आज किती अस्थिर झाले होते.
सकाळी कधीतरी त्याला झोप आली.
प्राचीचे आवरुन तिने चैतन्यला उठविले.
आज येणार का चैतन्य सोबत?
आजही आनंदीकढे मन ओढ घेत होते.पण काल तिला यापुढे न भेटण्याचा केलेला निश्चय आठवला.
हो ग.सोबतच निघूया.
असे म्हणत चैतन्य उठला.दोघेही तयार होऊन कंपनीत निघाले. दोघांच्याही केबिन वेगवेगळ्या होत्या.
चैतन्य केबिनमध्ये आला.दोन दिवसांची कामे पेंडिंग होती.ती आवरायला हवी.असा विचार करत तो कामाला लागला. पण कामात मन लागत नव्हते.
आनंदी मनातून जायला तयार नव्हती.
आनंदी दोनच दिवस राहणार इथे.
म्हणजे उद्या जाईल ती. नंतर ती भेटेल न भेटेल.
आज शेवटची भेट घेऊ का?
चैतन्यच्या मनात चलबिचल सुरु झाली.
मोबाईल वाजला.
प्राचीचा फोन होता.
चैतन्य जेवायचे का सोबत?
चैतन्य मिटिंग्जमध्ये बिझी राहायचा.त्यामुळे ती त्याला विचारुनच त्याच्या केबिनमध्ये जेवायला जायची.
ये प्राची.
दोघांनी सोबत जेवण केले.
चैतन्य कंपनीत काही प्राॕब्लेम आहे का?
नाही तर
मग तू डिस्टर्ब का वाटतोस?
चैतन्य काहीच बोलला नाही.
चल आज कुठेतरी बाहेर जाऊ.तुलाही फ्रेश वाटेल.
मी बरा आहे.जाऊ संध्याकाळी कुठे तरी.बरं.संध्याकाळी लवकर ये घरी…असे सांगत प्राची तिच्या केबिनमध्ये गेली.
चैतन्यने थोडा वेळ स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण चंचल मन आनंदीकडे जायला भाग पाडत होते.
चैतन्यने प्राचीला फोन केला
आता एका मिटिंगसाठी बाहेर जायचे आहे.
आज तर एकही मिटिंग नव्हती तुझी.
अग आता वेळेवर ठरली.
बरं.संध्याकाळी लवकर ये घरी…असे सांगत प्राचीने फोन ठेवला.
आनंदी मीटिंग संपवून रुमवर आली.
चैतन्य…कुठे असेल आता?
राहून राहून तिला चैतन्यचा नंबर घ्यायला हवा होता असे वाटत होते.
चैतन्यला कसे भेटता येईल याच विचारात होती.
दारावरची बेल वाजली.चैतन्य समोर उभा होता. आनंदीने त्याला मिठी मारली.
तुझाच विचार करत होते. तुला कसे भेटायचे कळत नव्हते.पण तुला माझ्या मनातले बरोबर समजले.तू कायम माझ्या सोबत रहा चैतन्य.
आज चैतन्यने तिला मिठीतून बाजूला केले नाही.
तिला प्रेमाने थोपटत राहिला.
आनंदी मिठीतून बाजूला होत म्हणाली.
चैतन्य आधी तुझा नंबर दे मला.
आणि तुझ्या कंपनीचा पत्ता पण दे.
नंबर देवू कि नको चैतन्य विचारात पडला.
आनंदीने तिचा मोबाइल काढला आणि परत चैतन्यचा नंबर मागितला.
चैतन्य नकार देऊ शकला नाही.
मी उद्या पहाटेच वापस जात आहे चैतन्य.चल ना तू पण.
नाही आनंदी.कंपनीत खूप कामे आहेत.तू जा.कामे आटोपली कि येईन मी.
नक्की येशील नं..मी वाट बघत राहील. आनंदीचे डोळे भरुन आले.चैतन्यला थांबणे अवघड वाटू लागले.
चल निघतो मी.
थांब ना आज इथेच. आनंदीने चैतन्यचा हात घट्ट पकडला.
आनंदी मला जायला पाहिजे.
तुझी कोण वाट बघतयं रे घरी.
असे म्हणत आनंदीने हात अजून घट्ट पकडला.
तिच्या हाताचा स्पर्श त्याला मोहवत होता. पण मोह टाळायला हवा असा विचार करत चैतन्य आनंदीची समजूत घालू लागला
आनंदी प्लीज आता जाऊ दे मला.
पण तू येशील नं.
हो ग
तू आला की लग्न करु आपण.
चैतन्यने आनंदीच्या डोळ्यातील अश्रू पूसले आणि निघाला.
चैतन्य आनंदीचे मन मोडून घरी तर आला पण मन तिच्याचकडे ओढ घेत होते. तिचा अगतिक चेहरा,आसवांनी डबडबलेले डोळे समोर येत होते.
उद्या आनंदीने जाऊ नये असेच वाटत होते त्याला. झोप उडाली होती.डोळ्यासमोर त्याच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी आनंदी येत होती.
‘वेडी आजही माझ्यावर वेड्यासारखी प्रेम करते.
पण आता वेळ निघून गेली.’
प्राची चैतन्यजवळ येऊन बसली.
‘चैतन्य उद्या रविवार आहे.एखादा सिनेमा बघायला जायचे का?’
‘नाही ग माझा मुड नाही’.
सिनेमाचा चाहता असणारा चैतन्य नाही म्हणतोय याचे तिला आश्चर्य वाटले. चैतन्यचे काहीतरी बिनसले हे नक्की याची तिला खात्री पटली पण काय बिनसले याचा अंदाज येत नव्हता.
उद्या आनंदी जाणार या विचाराने चैतन्य रात्रभर झोपू शकला नाही. तिच्या आठवणी तर छळत होत्याच पण पुढे काय हाही प्रश्न होताच.
क्रमशः
आनंदी परत गेली.चैतन्य आणि तिची वाट पुन्हा वेगळी झाली…वेगळी झालेली वाट पुन्हा एक होईल कि…..
वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खुप सुंदर लिहिले
खरं का सांगत नाही चैतन्य ?
काय डोक्यात आहे त्याच्या ?
छान कथा