१०-उसवले धागे कसे?
१०-उसवले धागे कसे?

१०-उसवले धागे कसे?

उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
द्विधा मनःस्थितीत चैतन्य अनंतरावांना आनंदीला भेटायला निघाला.काय होईल त्यांच्या भेटीनंतर….त्याच्या लग्नाबद्दल,प्राचीबद्दल तो सांगेल का त्यांना …..
उसवले धागे कसे?
भाग-१०
चैतन्य त्याच्या आवडत्या शहरात आला.त्याचे शहर.खूप दिवसांनी तो  आला होता. तेच शहर, तेच रस्ते,तीच माणसे.
जाता जाता शहराच्या सुरुवातीलाच  त्याची शाळा दिसली.आधी दहावीपर्यत असलेली शाळा बारावीपर्यत झाली होती.शाळेची इमारत भव्य दिसत होती.शाळेसमोरच्या मैदानावर मुले खेळत होती. त्याला त्याचे शाळेतील दिवस आठवले. मैदानावर शाळेची प्रार्थना व्हायची.पी.टी.चे तास,गाण्याचा तास ,नाटकाची तालीम इथेच मोकळ्या मैदानात व्हायची. 
मैदानात सूर ऐकू  येत आहेत,पी.टी.चा तास सुरु आहे.
 सगळे तसेच तर भासत आहे…
फक्त चैतन्यचेच आयुष्य बदलले होते. माझे आयुष्यही असेच राहिले असते जर मी आनंदीला सोडून गेलो नसतो तर….तो पुढे निघाला.जागोजागी आनंदीचे हात जोडलेले होर्डिंग्ज दिसत होते. खाली तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहून होत्या.
उद्या आनंदीचा वाढदिवस….चैतन्य मनातच बोलला.रस्ते,आठवणी मागे टाकत चैतन्य पुढे निघाला.
 दुरुनच  पारसपिंपळ दिसला आणि त्याचा फोन वाजला.प्राचीचा फोन होता.
पोहचला का चैतन्य?
हो 
अरे पोहचल्यावर फोन तरी करायचा.
अग करणारच होतो. आताच पोहचलो.
कधी येशील परत?
अग आता तर पोहचलो.उद्या येईल.
अरे तुझ्याशिवाय  घरात काहीच नसते.उद्या पहाटेच निघ.
जशी तुमची आज्ञा राणीसरकार.
हसत प्राचीने फोन ठेवला.चैतन्यचे मन चलबिचल करायला लागले.
काय बोलू अनंतरावांसोबत?
आज आनंदीसोबतचे पाश तोडायला हवे.त्यासाठीच तर आलो मी इथे.
चैतन्य आनंदीच्या घराजवळ पोहचला.
पारसपिंपळला बघून डोळे भरुन आले त्याचे. खूप आठवणी मनात दाटल्या. आनंदच्या आठवणी आठवल्या.
बाजूलाच त्याचे घर होते.तिकडे बघून त्याचे,वैभवचे सरलेले बालपण आठवले. त्याच घरात आईवडिलांनी दोन्ही भावांचे लाड,हट्ट पुरवले होते.आता घरावर दुसऱ्यांचे राज्य होते. आई-बाबांनी ते घर विकले होते.ते आता वैभव-केतकी सोबत अमेरिकेला राहत होते.केतकीला आनंदची आठवण नसेल येत का?आनंदचा जीव होता तिच्यात.
चैतन्य आठवणीत गुंतला.एकदा पुन्हा त्याच्या  घराकडे नजर टाकली.घराला माझी आठवण येत असेल का? आईचा खूप जीव होता घरात.दिवसभर काही ना काही करत राहायची.अंगणात बाग फुलवली होती. आताही बाग आहे पण झाडे नवीन दिसत आहेत.दुसऱ्यांचे रज्य आहे आता त्या घरात.
आठवणी आल्या की एकामागोमाग येतात.त्यांना  थोपवून धरणे अशक्य असते.तो पारसपिंपळाखाली उभा होता.
साहेब तुम्ही?
आनंदीच्या घरचा माळी चैतन्यसोबत बोलत होता.
कसे आहात काका?
चैतन्यने त्याची विचारपूस केली.
चैतन्य थोडावेळ पारसपिंपळाजवळ रेंगाळला.पारसपिंपळाची पांढरी,गुलाबी फुले खाली मातीवर पडली होती.त्याने ती वेचली.
साहेब पारसपिंपळ तुमची आठवणा काढतो बघा.कधीच त्याची एवढी फुले खाली मातीवर नसतात.सगळी फुले तो अंगावर झेलतो.वडील जसे  मुलाला अंगाखांद्यावर खेळवतात तसा हा फुलांना जपतो.
 आज तुम्ही आले तर बघा कसा आनंदाने तुमचे फुलांनी स्वागत करत आहे.
 येत जा साहेब अधेमध्ये.
 आनंदभाऊ गेले आणि तुम्हीही इकडे येणे टाकले.माळीकाकांने डोळे पुसले.आनंदीताई कधीतरी इथे पारावर येऊन बसतात.चैतन्यने त्याच्या खांद्यावर थोपटले आणि  पुढे  निघाला.
 अंगणात आला.आधी रोज कितीदा तरी इथे अंगणात यायचा तो.खूप  खेळायचा आनंद-आनंदीबरोबर.आजही ते तेवढेच जवळचे वाटले.गेले ते दिवस असे म्हणत तो पुढे  गेला.आनंदीचे घर….खूप आनंदाचे क्षण वेचले इथे.
दारात पोहचला
  
चैतन्य…चैतन्य….
तो दिसताच आनंदी त्याला आवाज देत धावत बाहेर आली आणि त्याचा हात पकडून आत घेऊन आली.
अनंतराव चैतन्यची वाट बघतच होते.पण तो आज येईल हे माहीत नव्हते.
अरे अचानक आलास.कळवले नाही येण्याचे?
हो काका इकडे काम निघाले म्हणून आलो…चैतन्यने सुचेल ते सांगितले.
आनंदचा लहानपणापासून मित्र असणारा चैतन्य अनंतरावांनाना जवळचा वाटला.
ये चैतन्य
अनंतराव म्हणाले.
आनंदीही त्यांच्याजवळ येऊन बसली.तिघे बोलत बसले.आनंदच्या आठवणी निघाल्या.अनंतरावांचे आनंद गेल्याचे दुःख एवढ्या वर्षात जराही कमी झाले नव्हते.
आनंद असता तर हे घर खूप  वेगळे राहले असते.
आनंदीचा एव्हाना  संसार थाटला असता पण ते होणे नव्हते.ते बोलले.
चैतन्यने अनंरावांचा हात पकडून त्यांना धीर देत म्हंटले,होईल काका सर्व ठीक.
सगळं ठीक नाही होणार.आनंदीच्या आयुष्यात नवे वळण आले तर थोडे  समाधान मिळेल.
आनंदी स्वयंपाक तयार असेल तर जेवून घेऊ.चैतन्य तू  फ्रेश होऊन ये.जेवण करुन घेऊ  मग सावकाश बोलू या.
 चैतन्य वाॕशबेसिनकडे गेला.तिथे उभ्या असलेल्या आनंदीने त्याला मिठी मारत बोलली,किती वाट बघायला लावली चैतन्य.
अग बघेल कोणी असे म्हणत चैतन्यने तिला बाजूला केले.
फ्रेश होऊन चैतन्य हाॕलमध्ये आला.
जेवण तयार होते.चैतन्यच्या आवडीची तांदुळाची खीर होती.जेवण करता करता गप्पा रंगल्या.
मग काय ठरवले चैतन्य?
क्रमशः
Previous Link
चैतन्य आनंदीला,अनंतरावांना भेटायला आला.अनंतरावांच्या प्रश्नाचे चैतन्य काय उत्तर देईल….वाचा पुढील अंतिम भाग
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!