५-डायरी शलाकाची
एक एक करुन सगळे आईला सोडून गेले.शलाकाने आईला न सोडण्याचा,तिच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला……पुढील कथा वाचा
भाग-५
सई सासरी गेली.आता घरी मी आणि आई दोघीच होतो. दिवसभर आई शाळेत असायची,
मी काॕलेज,ट्युशन्समध्ये बिझी राहायची. आम्ही जवळपास सारख्याच वेळेला घरी यायचो.
सई मध्ये मध्ये घरी यायची आम्हाला भेटायला. तिचे सर्व सुरळीत सुरु होते.आनंदी होती ती. आईला बरे वाटायचे तिला आनंदी बघून.
माझी बारावीची परीक्षा संपली. मध्ये सुट्या होत्या. आई आणि मी दिल्लीला जाऊन राजाला भेटून आलो. राजा रुळला होता तिथे.त्याची स्वप्नेही विस्तारली होती. आयआयटी झाल्यानंतरचे प्लॕन्स तयार होते त्याचे.
माझा रिझल्ट आला. मला मुंबईला एका नावाजलेल्या काॕलेजमध्ये इंजिनियरींगला अॕडमिशन मिळाली.
आईची मी आयआयटीला जाण्याची इच्छा मी पूर्ण करु शकले नाही.पण मुंबईच्या एका नावाजलेल्या इंजिनियरींग काॕलेजमध्ये मला अॕडमिशन मिळाली. आई खूष झाली.
शलाका आता रोज डायरी लिहित होती. मानस वेळ देत नाही तक्रार संपली होती.आता तिलाच कुणासाठी वेळ नव्हता.तिची ती परत एकदा भूतकाळात जाऊन जगत होती.नव्याने तिची ती तिला भेटत होती.
तिचा भूतकाळ रम्य नव्हता. पण ती भूतकाळात रमायला लागाली होती.
शलाका रोजच्यासारखी पहाटे टेरिसवर गेली. सूर्योदय रोजच्यासारखाच होता.पण रोज सूर्योदय सारखा असला तरी कंटाळा नाही येत बघण्याचा.
अरे काय तो रोज रोज सूर्योदय बघायचा असे कधी वाटत नाही.
काहीतरी नाविन्य असतेच त्यात. आपल्या आयुष्याचे मात्र तसे नाही. तोचतोपणा आला कि रुटीनचा कंटाळा यायला येतो.
असे का व्हावे?
निसर्ग तोच,सूर्य तोच,पाऊस तोच,समुद्र तोच तरीही त्यात नवीनता भासत राहते.
शलाका सूर्योदय बघण्यात गुंग होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. डाॕ.रिषभ. नाव वाचूनच हास्य पसरले चेहऱ्यावर.रिषभला ह्यावेळेस ती टेरिसवर एकटीच असते हे माहित होते.
गुड माॕर्निंग शलाका डार्लिंग.
तो पलिकडून बोलत होता. रिषभ म्हणजे आनंदाचा झरा नाही तर धबधबा होता. त्याच्या बोलण्यात,वागण्यात आनंद धबधब्यासारखा ओसंडून वाहायचा. छोट्या छोट्या गोष्टीतही तो मोठा आनंद शोधायचा. त्याच्याशी बोलले कि शलाकाला आश्चर्य वाटायचे
एखादा माणूस एवढा आनंदी राहू शकतो? आणि तेही काही कारण नसतांना.
रिषभशी ओळख अलीकडील म्हणजे चार पाच वर्षातील. त्याला भेटता भेटता जवळीक निर्माण झाली.लोहचुंबकासारखी आकर्षित करण्याची कला होती त्याच्याजवळ. पहाटे पहाटे त्याच्याशी बोलले कि दिवस छान जातो माझा.
एकदा सई रागाने मला म्हणाली,स्त्रियांशी पण मैत्री करुन बघत जा. तुला मित्र म्हणून पुरुषच का आवडतात? या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. माझी मुलींशी,स्त्रियांशी मैत्री व्हायची पण मी मन मोकळे करावे एवढी जवळीक
त्यांच्याशी नाही साधल्या गेली.
असे का व्हावे? कदाचित् बाबा आम्हाला सोडून गेले म्हणून असेल.
मला आधार हवा असायचा बाबांसारखा जो पुरुषच देऊ शकतो असे मला वाटत गेले.
सगळ्या पुरुषांमध्ये मी बाबांची छबी शोधत गेली का?
मानसकडून आधार मिळतो पण त्यात ओलावा नाही.
आमचे नाते सामान्य नवराबायकोसारखे नाही.त्याला माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही.
आमची कधी भांडणे होत नाही.आम्ही एखाद्या सिनेमावर, नाटकावर,गाण्यावर चर्चा करत नाही.
माझा आवडता रंग,आवडते गाणे काहीही मानसला माहित नाही. माझ्या मनात माझ्या आईवडीलांनी केलेला संसार दडी मारुन बसलाय. बाबा अर्ध्यावर संसाराचा डाव टाकून,आईला सोडून गेले.पण ते जेवढी वर्षे घरात होते तेवढी वर्ष खूप प्रेमाने,जिव्हाळ्याने संसार केला.त्यांच्या संसारात जिवंतपणाची जी उर्मी होती ती आमच्या संसारात नाही.
थोडावेळ टेरेसवर थांबून शलाका खाली उतरली. आज काॕलेजचा शेवटचा दिवस होता.
उद्यापासून ख्रिसमसच्या सुट्या सुरु होणार होत्या. आज मानसला लवकर जायचे होते काॕलेजला. तो निघून गेला.शलाकाला वेळ होता जरा जायला.सुखदाही उठली,
आई काय मग डायरी लिहितेस कि संपला उत्साह?
लिहिते ग बाई. रोज लिहिते. सगळे लिहून झाले कि दाखवेल मी तुला. चल येते मी.
शलाका गेट बाहेर येऊन रिक्षा शोधत होती.
तेवढ्यात रिषभ हाॕर्न वाजवत आला.
‘अरे तू कसा सकाळी सकाळी इकडे?’
रिषभ बोलला, तुलाच भेटायला आलो ग. चल मी सोडतो आज तुला काॕलेजमध्ये.
शलाका त्याच्या बाजूला जाऊन बसली. आज खूप दिवसांनी भेटले होते ते. शलाकाने रिषभच्या खांद्यावर डोके ठेवले.
खूप दिवसांनी आधार मिळाल्यासारखा वाटला तिला.
आज फोनवरच बोलणे झाल्यामुळे आता दोघेही गाणे ऐकत शांत बसले ते. रिषभने त्याचे आवडते गाणे लावले होते.
‘ भेट तुझी माझी स्मरते अजून त्या ठिकाणी…’
शलाकाचे काॕलेज आले. रिषभने शलाकाचा हात हळूच दाबला आणि बाय बोलून निघून गेला.
शलाका काॕलेजमधून घरी आली. आजपासून काही दिवस सगळे आरामात चालणार होते. पंधरा दिवस सुट्या होत्या.आता तिला डायरी लिहायला भरपूर वेळ मिळणार होता.
आज शलाका लवकरच डायरी लिहायला बसली.
दिनांक……
क्रमशः
एक एक करुन सगळे आईला सोडून गेले.शलाकाने आईला न सोडण्याचा,तिच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला……पुढील कथा वाचा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खुप छान
कथेत वेगवेगळ्या कथा
छान