६-शलाकाची डायरी
शलाका काॕलेजमधून घरी आली. आजपासून काही दिवस सगळे आरामात चालणार होते. पंधरा दिवस सुट्या होत्या.आता तिला डायरी लिहायला भरपूर वेळ मिळणार होता.
आज शलाका लवकरच डायरी लिहायला बसली….
पुढे….
दिनांक……
माझे काॕलेज सुरु झाले. पहिल्यांदाच असे मोकळे जीवन अनुभवायला मिळत होते. अभ्यासाचे ओझेही कमी झाले होते. काही दिवसातच सगळ्यांचे आपापले गृप बनले. मुली कमी आहेत इथे.
इंजिनियरींग काॕलेजमध्ये कमीच मुली असायच्या तेव्हा.(पंचवीस तीस वर्षापूर्वी मुली इंजिनियरींगला कमी जायच्या.)
मी सिव्हिल ब्रॕच घेतली होती. मी आता काॕलेजमध्ये जास्त बिझी राहायची. काॕलेज संपले कि मित्र मैत्रिणींसोबत भटकणे यातच वेळ जायचा.आतापर्यंत मला फक्त मैत्रिणीच राहायच्या त्या पण मोजक्याच. पण आता मित्रही मिळाले होते. मुलींना मित्र असणे ही संकल्पना तेव्हा रुढ झाली नव्हती.
मला मित्र आहेत हे आईला माहित नव्हते.
काॕलेजमधूनच परस्पर आम्ही सिनेमा,नाटक बघायला बीचवर फिरायला जात होतो.आई पण आता घराबाहेर पडायला लागली होती.स्वतःच्या कोषातून बाहेर आली होती.
काॕलेजमध्येच मला वैभव भेटला. आमच्याच गृपमध्ये. वैभव माझे पहिले प्रेम. मी जेवढी बोलकी तो तेवढाच गंभीर. गृपमध्ये सर्वात शांत तोच. त्याचे बोलके डोळे,त्याचा आवाज, बोलण्याची ढब मी त्याच्या या सगळ्याच गोष्टींच्या प्रेमात पडली. त्याला माझ्यातले काय आवडले हे मात्र त्याने सांगितलं नाही.
विचारले तर सगळेच आवडले एवढेच सांगायचा. दिवसरात्र डोक्यात वैभव राहायचा.काहीही करतांना हे वैभवला आवडेल का हाच विचार मनात यायचा. मला आवडणाऱ्या कैक गोष्टी केवळ त्याला आवडणार नाही म्हणून सोडून दिल्या.
प्रेमात पडल्यावर लोक वेडे का होतात याचे उत्तर वैभवमुळे सापडत गेले.
त्याच्यासाठी मी काहीही करु शकत होते. त्याच्या प्रेमापायी सर्वस्व अर्पण केले होते मी त्याला.
वैभवच्या,मित्र मैत्रिणींच्या सहवासात चार वर्ष भूर्र्कन उडाली.फायनलची परीक्षा संपली.
आईला मी वैभवबद्दल सांगितले. आईने त्याला भेटायला घरी बोलवले. पण त्यापूर्वी बाबांबद्दल त्याला सांगायला सांगितले. माझा वैभववर विश्वास होता.तो काहीही झाले तरी मला सोडणार नाही याची खात्री होती.
दुसऱ्या दिवशी मी आणि वैभव नेहमीच्या जागी भेटलो. मी वैभवला बाबांबद्दल सांगितले. मी जसजशी सांगत गेले तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडत गेला. मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले त्याला
अरे, बाबा आणि आमचा संबंधच नाही दहा वर्षापासून.
बाबांनी काही केले तरी आपल्याला काय फरक पडणार?
आधीच गंभीर असणारा वैभव अजूनच शांत झाला.
मला आईबाबांना सांगावे लागेल असे म्हणून निघून गेला.म्हणजे आईबाबांनी परवानगी नाही दिली तर हा माझ्याशी लग्न नाही करणार का? मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याच्यासाठी कितीही थांबायला तयार होते. आतुरतेने त्याच्या होकाराची वाट बघत राहिले. मी दुसऱ्या दिवशी फोन केला त्याला पण त्याने उचलला नाही.सतत दोन तीन दिवस फोन केल्यानंतर त्याने उचलला आणि घरच्यांची परवानगी नाही एवढेच बोलून फोन ठेवून दिला.
मी? नेमके काय वाटले मला? माझ्या भावना ?
शब्दात नाही पकडता येणार.
वैभव, असा कसा वागू शकतो? मी निवडलेला भावी जोडीदार त्याच्या आईबाबांसमोर माझी बाजू मांडू शकला नाही.
माझ्यावर प्रेम करता करता माझे सर्वस्व घेतले होते त्याने आणि आता माझ्या बाबांमूळे तो चक्क नाही म्हणत होता.
बाबांच्या कृत्याच्या काजळीने माझे पूर्ण आयुष्यच काळवंडले. बाबांकडे जाऊन जाब मागावासा वाटत होते.
मला बाबांबद्दल असणारा राग अजून वाढला.
वैभवच्या नकाराने पार कोलमडून गेले मी.कशातच मन रमत नव्हते माझे. काही सुचत नव्हते.
मला फक्त वैभव हवा होता.मी माझ्या मित्र ,मैत्रिणींना त्याला समजवायला सांगितले पण नाही.काही फायदा नाही झाला.
मी आईला सांगितले वैभवने नकार दिल्याचे आणि नकार दिल्याचे कारणही सांगितले.आईला उगाचच अपराध्यासारखे वाटले.
आईने कसे सहन केले असेल बाबांचे जाणे? माझ्या मनात आले.त्यांचा तर सतरा अठरा वर्षांचा संसार झाला होता. आईला किती यातना झाल्या असतील.
वैभव पण बाबांसारखाच वागला होता.मला आठवले,’आई जेव्हा बाबांसाठी अश्रु ढाळायची तेव्हाच मी ठरवले होते कि मी अशा माझ्यावर प्रेम न करणाऱ्यांसाठी रडत बसणार नाही. पण हे आठवूनही भावनांचा आवेग थांबत नव्हता. मी पहिल्यांदा ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्याने मला अव्हेरले होते.
का? तर माझ्या बाबांनी केलेल्या चुकीमुळे.स्वतःला मी अगतिक समाजायला लागले होते. पण नाही.आता पूरे. वैभवला काही अधिकार नाही मला रडवण्याचा.
शलाकाला आज जरा उशीरच झाला उठायला. सुखदा ,मानस उठले होते. मानसलाही सुट्ट्या लागल्या होत्या पण घरी काय करायचे म्हणून तो काॕलेजमध्ये जायचा.प्रोजेक्टचे काम करायचा.
प्रोजेक्टशिवाय जीवनात काही आहे हे त्याला माहित नव्हते. किती अलिप्तपणे जगायचा मानस. कशातच रस नव्हता त्याला.गाणे,सिनेमा,फिरणे ह्या गोष्टी त्याला वेस्ट आॕफ टाईम वाटायच्या.
शलाका आधी खुप प्रयत्न करायची त्याने तिच्यासोबत वेळ घालवावा म्हणून.पण नंतर थकली ती.
सुखदाने शलाकाला गरम गरम चहा आणून दिला.
आज स्वानंदपण येणार होता दोन दिवसांसाठी. तिने मानसला आठवण करुन दिली आणि घरी लवकर यायला सांगितले.
आज दिवसभर शलाका आणि सुखदा दोघीच घरी होत्या.सुखदाचे बारावीचे वर्ष होते.त्यामुळे ती अभ्यासात बिझी राहायची. सुखदा शलाकासारखीच बडबडी होती.तिच्या मुळे घर जिवंत वाटत राहायचे.
स्वानंदही बोलका होता. तो घरी आला कि धमाल करायचे बहीणभाऊ.त्यांना बघितले कि, शलाकाला तिचे कोमेजलेले बालपण आठवायचे. आपल्या मुलांपासून हे हसरे क्षण कधीच दुरावले जाऊ नये असेच तिला वाटायचे.
आज स्वानंद येणार म्हणून त्याच्या आवडीचे काही पदार्थ शलाकाने बनवायला घेतले.स्वानंदची नेहमी होस्टेलच्या जेवणाबद्दल तक्रार राहायची. स्वानंद येण्याआधी तिला सर्व तयार करायचे होते.तिचे सगळे होते न् होते तोच स्वानंद मानसबरोबर हजर.मानस मुलांच्या बाबतीत कधीही कर्तव्याला चुकायचा नाही.
क्रमशः
मुलांना आनंदी ठेवणारा,कर्तव्यात न चुकणारा मानस शलाकाच्शी वागतांना मात्र तिला समजून घेण्यात कमी पडत होता.पुढील कथा वाचा पुढील भागात.
सई,शलाका,राजा तीन बहीणभाऊ.सईचे लग्न झाले.राजा होस्टेलमध्ये गेला.शलाका आणि आई दोघीच घरी….पुढे ….
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खुप छान👏✊👍
छान कथा मालिका