बेटा,ही शिल्पे माझा मित्र अभीरने आणि त्याच्या वाडवडिलांनी बनवली आहेत.
ते पुढे सांगू लागले,
अभीरच्या पणजोबांच्या काळापासून भरतपूरची शिल्पकारी प्रसिद्ध होती. बडी बडी असामी पणजोबांकडे शिल्पकारीसाठी यायचे.
दगडाला छन्नी ,हातोड्याचे घाव देत त्यातून जिवंत भासणाऱ्या मूर्तीची निर्मिती बघणे खरोखर अद्भुत अनुभूती वाटायची.. पणजोबांची कला वारसाहक्काने अभीरपर्यंत झिरपली.
अभीर ‘बापसे बेटा सवाई’ या म्हणीनुसार वाडवडीलांपेक्षा शिल्पकारीत सरस होता.
हे अलिकडील दहा शिल्पे त्याचीच.
त्या गृहस्थाने बोटाने खूण करुन सांगितले.
काका आता ते शिल्पकार अभीर कुठे असतात?
‘ ते नाहीत आता’.
गृहस्थाने दुःखी स्वरात सांगितले.
त्यांच्या घरचे कोणी तर असेल?
काका त्यांचे घर कुठे आहे?
बेटा घर इथून जवळच आहे.घरी फक्त त्यांची म्हातारी आई राहते.मीच सांभाळ करतो आईचा.
मृगांकची नजर अर्धवट असलेल्या शिल्पाकडे गेली.
काका,हे शिल्प? अर्धवटच का आहे?. हे बरेचसे माझ्या…
एवढे बोलून मृगांक थांबला.गृहस्थ म्हणाले,
ती एक मोठी कहाणी आहे.
बरे. ,तू कुठे थांबलास?
मृगांकने सांगितले,
हाॕटेलमध्ये.
काका म्हणाले,
अरे ये इथेच राहायला.
अभीरच्या चेहऱ्याशी मृगांकचे असलेले साम्य बघून त्यांना त्याच्याबद्दल जवळीक वाटायला लागली होती.
मृगांकच्या मनासारखेच झाले.त्याला त्या अर्धवट शिल्पाबद्दल जाणून घ्यायचे होतेच.
तो आनंदाने इथे राहायला तयार झाला.
हाॕटेलमध्ये जाऊन त्याचे सामान घेऊन आला.
इथे काका एकटेच राहत होते.
त्यांचे कुंटूंब मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहत होते. काकांनी दोघांसाठी जेवण बनवले.
दोघेही जेवले आणि गप्पांमध्ये गुंतले.
गप्पा सुरु असतांनाच मृगांकच्या आईचा फोन आला.मृगांकला आईला त्या आईसारख्या दिसणाऱ्या अर्धवट शिल्पाबद्दल सांगायचे होते.त्याने सुरूवात केली.
अग, आई मी आज निघालो नाही.’
तेवढ्यात मोबाइलची रेंज गेली.बोलणे अर्धवटच राहिले त्या अर्धवट शिल्पासारखे. काकांना त्याने पुन्हा विचारले,
‘काका त्या शिल्पाबद्दल सांगा ना.’
काका संभ्रमात पडले.
सांगावे कि नाही सांगावे?
पण हा मुंबईवरुन आलेला दिसत नाही.मी कुठून आला विचारले तर याने दुसरेच नाव सांगितले होते.
सांगू का? पण आज थांबावे.
काका म्हणाले,
उद्या सांगतो.
काका नक्की.
मृगांकने जवळजवळ वचनच घेतले त्यांच्याकडून.
काका,मला शिल्पकार अभीरकडे जायचे आहे.उद्या पहाटे जमेल का?
काका हो म्हणाले आणि झोपले.मृगांक जागाच होता.
काका त्या शिल्पाबद्दल का सांगत नाही आहेत? त्याची उत्सुकता शिगेला पोहचली.
दुसऱ्या दिवशी पहाटेच मृगांक उठला.त्याने काकांनाही आवाज दिला. शिल्पकार अभीरकडे त्याला जायचे होते.काका आणि तो तयार झाले आणि अभीरच्या घराकडे निघाले.
काकांनी घराच्या अंगणात पोहचल्यावर
आई,आई म्हणून आवाज दिला.एक सत्तरीच्या जवळपास असलेली स्त्री बाहेर आली.
अरे प्रताप ये ना. आणि तुझ्या सोबत कोण आहे? वृद्ध स्त्री मृगांकला निरखून बघत होती.
निरखून बघतांना तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते.ती हर्षवायू झाल्यासारखी ओरडली.
अभीर.
मृगांक गोंधळला. त्याला कळेना काका पण त्याला अभीर समजले होते आणि आता ह्या पण अभीर समजत आहे.म्हणजे माझ्या आणि शिल्पकार अभीरच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे.
जसे आई आणि त्या अर्धवट शिल्पात आहे.
काकांनी त्या वृद्ध स्त्रीला समजवले,
‘आई हा अभीर नाही.हा मृगांक आहे.
पण त्या मानायला तयार नव्हत्या.त्यांना मृगांकला जवळ घ्यायचे होते.
मृगांकच्या ते लक्षात आले.तो जवळ गेला आणि म्हणाला,
आजी मी मृगांक आहे.
त्याने आजीचे हात हातात घेतले. किती वात्सल्य होते त्या हातात.आजी एव्हाना भानावर आल्या होत्या.त्या बोलल्या,
तू विशीतला आणि अभीर पन्नाशीत राहला असता.
पण तुझ्या हाताचा स्पर्श तसाच आहे.अभीरसारखा.स्पर्श ओळखण्यात मी चुकणार नाही.
मृगांक शहारला.त्यालाही हा स्पर्श ओळखीचा,खूप जवळचा वाटत होता.
आजीला मृगांकमध्ये अभीरचा भास होत होता.
मृगांकने एक नजर इकडेतिकडे फिरवली. बाजूच्या भिंतीवर एक फोटो होता. हुबेहुब मृगांकसारखा. मृगांकला चमत्कारिक वाटले. मृगांकने ओळखले हा नक्की शिल्पकार अभीरचा फोटो असणार. थोडावेळ थांबून काकांसोबत तो परत निघाला. आजीने पुन्हा त्याला घरी यायला सांगितले.
काकांच्या घरी आल्यावर त्याने काका अर्धवट शिल्पाबद्दल सांगणार होते याची आठवण दिली.
काका बोलले,
अरे हो मला आठवण आहे मृगांक.
ऐक तर.
काकांनी सांगायला सुरूवात केली.
मोहिनी.
काकांनी मोहिनी म्हणताच मृगांक चमकला.आईचे नाव, मी शिल्पकार अभीर सारखा दिसणे,ते अर्धवट शिल्प….
मृगांक काही अंदाज बांधायला लागला. त्याच्या छातीतील धडधड वाढू लागली.
काका सांगू लागले,
सुदर,चंचल अशी मोहीनी मुंबईहून मैत्रिणींसोबत इथे आली होती. इथून बाजूलाच असलेले स्थलांतरीत पक्ष्यांचे ठिकाण बघायचे होते तिला.ते बघून झाल्यावर तू आला तशीच पायवाटेने ती आली या जंगलात. तेव्हा हे जंगल जास्त घनदाट,हिरवेजर्द होते.
अभीर इथे बसूनच शिल्पकारी करायचा.दगडांना कोरीव आकार तो इथे बसूनच द्यायचा.
मी बरेचदा त्याच्याबरोबरच असायचो.
मोहिनी शिल्पे बघून मोहीत झाली होती. अभीर शिल्प कोरायला बसला कि बेभान असायचा. तल्लीन होऊन जायचा. कोणी आपले शिल्प बघत आहेत याचीही जाणीव त्याला व्हायची नाही. मोहिनी आणि मैत्रिणी रोजच यायला लागल्या. कधी कधी ती एकटीच यायची. मोहिनी शिल्पाबरोबरच अभीरकडेही मग्नतेने बघायची. एकदिवस अभीर एक शिल्प बनवून निवांत त्या शिल्पाकडे बघत बसला होता.तेवढ्यात मोहिनी आली.आज ती एकटीच होती. मी त्याला सांगितले ,
ही रोजच येते …..
क्रमशः
भाग-3 वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow करा.
प्रिती
कथेतील नावे आवडली, कथा पण 👍
छान
पुढें काय ??
वाह