२-डायरी शलाकाची
बाबा आईला सिनेमाला,नाटक बघायला घेऊन जायचे. घरी आले की आम्हाला समरसून कथानक ऐकवायचे. खूप तद्रुपतेने सांगायचे सगळे. त्यांनी सांगितलेले चित्रवत् डोळ्यासमोर उभे राहायचे.
बाबांच्या स्वभावात ओलावा तर आई जरा कोरडी होती. कित्येकदा बाबा आईला काही सांगायचे तिकडेही तिचे लक्ष नसायचे.
बाबा आम्हाला कधीही रागवायचे नाहीत.
मी चवथीत असतांना घरी टेपरेकॉर्डर आल्याचे आठवते. बाबा त्यांच्या आवडीच्या गाण्यांची लिस्ट बनवायचे आणि गाणी रेकाॕर्ड करुन आणायचे. किती छान दिवस होते ते. आम्ही जेवण मिळून करायचो.सकाळी आमची शाळेची तयारी करण्यात बाबा आईला मदत करायचे. घरी नातेवाईक,बाबांचे मित्र येत राहायचे.घर भरलेलं,नांदतं वाटायचे. घरात शिरले कि प्रसन्न वाटायचे.
पण आता अलिकडे आईबाबांमध्ये काहीतरी धुसफूस चालायची. दोघांच्या भांडणांचा आवाज यायचा. याआधी आम्ही आईबाबांना कधीही भांडतांना बघितले नव्हते. नेहमी वेळेवर घरी येणारे बाबा आता उशिरा यायचे. आम्ही जेवणासाठी ताटळत राहायचो.आणि घरी आल्यावरही त्यांचे चित्त थाऱ्यावर नसायचे. नजर हरवलेली असायची. आमच्याकडेही कमीच लक्ष द्यायचे बाबा. मी विचारायची बाबांना,
‘बाबा तुम्ही आता फार कमी बोलता आमच्याशी.’ बाबा फक्त थोडे हसायचे.
त्यांचे खळखळून हसणे तर बंदच झाले होते.
त्या दिवशी आईबाबांचे किती भांडण झाले होते. फारसे आठवत नाही.पण आईबाबांचा मोठा आवाज ऐकून मी घाबरले होते. बाबांना आई काहीतरी दुसऱ्या बाईबद्दल बोलत होती.
‘तुम्ही तिचा नाद सोडायला तयार असणार तरच घरी या.’
आईने बाबांना निक्षून सांगितले. बाबा आईला सांगत होते
‘तिला माझ्याशिवाय कोणी नाही.
माझ्यासाठी तिने तिचे भरलेले घर सोडले’.
आई ह्यावेळेस ऐकायला तयार नव्हती. आणि बाबाही जिद्द सोडत नव्हते.शेवटी बाबांनी रागारागाने एका बॕगमध्ये कपडे भरले आणि निघून गेले. आईला असे होईल असे वाटले नव्हते.आईच्या धमकीने बाबा त्या दुसऱ्या बाईजवळ जाणार नाहीत असेच आईला वाटले होते.आई दिवसभर खूप रडत होती. मला काही कळत नव्हते. माझ्या पेक्षा मोठी असलेली सई आणि राजा काहीही बोलत नव्हते.
मी तेव्हा सहावीत,राजा आठवीत आणि सई दहावीत होती. बाबा अचानक निघून गेल्यामूळे घर विस्कळीत झाले होते. आम्हाला कुणालाच बाबांशिवाय राहण्याची सवय नव्हती. आईतर एकटी काहीच करु शकत नव्हती.आई एका शाळेत शिक्षिका होती.तरीपण खूप परावलंबी होती.प्रत्येक गोष्टींसाठी बाबांवर अवलंबून राहायची
बाबा घर सोडून गेले आणि घरातला आनंदही गेला बाबांसोबत.कायमचा. नंतर ते घर कधीही आनंदी झाले नाही. आईचे सुख,दुःख,आनंद सगळे बाबांशी निगडीत होते.
आता आईच आनंदी नसायची म्हणून घरही आईसारखेच दुःखी राहायचे.
बाबा नंतर कधीही परत आले नाही. आई खूप वाट बघायची बाबांची. ते येणारच. माझ्यासाठी नाही तरी मुलांसाठी तरी येतीलच.असेच वाटायचे तिला.
ती शाळेतून घरी आली कि,घरचे कामे करता करता बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. डोळ्यात सतत पाणी असायचे. खूप रडत राहायची.
बाबा आम्हाला शाळेत भेटायला यायचे. मग आई आम्हाला सतत बाबांबद्दल विचारत राहायची.
आईचे केविलवाणे जगणे,बाबांसाठी रडणे बघून आता मला बाबांचा राग यायला लागला होता.
बाबा शाळेत भेटायला आले तरी मी भेटणे टाळायची.
मला माझ्या आईला रडवणाऱ्या बाबांना भेटायला आवडायचे नाही.पण बाबांची मला खूप आठवण यायची.पण मला कुणाला सांगता यायचे नाही.मग मी एकटीच रडत बसायची.
बाबाही काही दिवस नियमित भेटायला यायचे.नंतर हळूहळू कमी झाले त्यांचे येणे. आई बाबांबद्दल माहिती मिळते का याच्या शोधातच राहायची.
कोणीतरी आईला बाबांना आणि त्या दुसऱ्या बाईला मुलगा झाल्याचे समजले. त्यादिवशी आईने स्वयंपाक केला नाही. सईने जेवण बनविले पण आई उपाशीच राहली म्हणून आम्ही पण उपाशी राहिलो.
आईची तगमग आम्हाला कळत होती पण आम्ही काय करु शकत होतो?
दिवस जात होते.आता मला बरीच समज आली होती.
आई तिच्या तशा मनःस्थितीत देखील आमच्या अभ्यासाकडे,खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायची. पण आमचे एकमेकांशी बोलणे कमी असायचे.आई यंत्रवत सगळे करायची. राजा जास्त घरात असायचा अभ्यास करत.बाबा दुसऱ्या बाई सोबत राहतात याची त्याला लाज वाटायची.सईला पण वाटत असणार. ती पण आधीसारखी मैत्रिणींना घरी आणायची नाही. आणि मी. मला पण कोणी बाबांबद्दल विचारले तर लाज वाटायची. पण मी जास्त वेळ बाहेर रमायची.घरात आले कि घरातला तो तणाव नकोसा वाटायचा.सगळे आपापल्या कोषात असायचे. आई तर आईच्या कोषात घट्ट मिटलेली असायची. हसणे नाही,खिदळणे नाही, कुणाशी बोलणे नाही,कुणाला काही विचारणे नाही.बाबाच कारणीभूत होते ह्या सगळ्यांना. बाबा आमच्यापासून वेगळे झाले आणि आम्हालाही एकमेकांपासून वेगळे केले. नंतर आयुष्यात कधीही आम्ही एकमेकांशी खूप जुळून राहू शकलो नाही.फक्त नाते टिकवून ठेवले. आम्ही सोबत राहूनही एकेकटेच वाढलो. आई कोणत्याही समारंभाला जायची नाही.
बाबांचे दुसऱ्या बाईसोबत राहणे आईला अपमानास्पद वाटायचे. लोकांनी काही विचारले तर काय सांगायचे? लोक काय म्हणत असतील ?असे प्रश्न तिला छळत राहायचे.
मी मोठी होत होते. तरुण होत होते.यौवनात आले होते. बाबांचा मला राग यायचा पण मी बाबांना कधीही विसरु शकले नाही.बाबा आम्हाला सोडून का गेले असतील हा प्रश्न मनात नेहमी यायचा.
आई ,आई , अग मी केव्हाची आवाज देत आहे.
सुखदाच्या आवाजाने शलाकाची तंद्री भंगली. संध्याकाळ झाली होती. शलाका भूतकाळातून बाहेर आली.
सुखदाचे डायरीकडे लक्ष गेले.
‘अरे वा,आई तु लिहायला सुरुवात केली ‘ असे म्हणत डायरीकडे गेली.
सुखदा,थांब,अग पूर्ण लिहून झाल्यावरच वाच.
सुखदा थांबली.
संध्याकाळ झाली होती.मानस काॕलेजमधून घरी आला. चहा पिऊन सरळ त्याच्या अभ्यासिकेत गेला.
आता तो जेवायलाच येणार रोजच्यासारखा. दिवसभरात घरात काय झाले?कोणी काय केले? त्याला कशाशीही देणेघेणे नव्हते. शलाकाने एक उसासा सोडला आणि टेरिसवर जाऊन सूर्यास्त बघू लागली. सूर्याच्या विविधरंगी विविधछटेतील काही गडद तर काही हलके रंग बघून ती त्याचा संबंध आयुष्याशी जोडायची. आपले आयुष्यही असेच आहे.गडद आणि हलक्या सुखदुःखाच्या छटांनी बनलेले.
शलाकाच्या वडिलांच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आणि कधीही न भांडणारे शलाकाचे आईवडील एकमेकांपासून दूर झाले.एक सुंदर घरटे विखूरले.फक्त आईबाबांचेच घर विखूरले नाही.घरट्यातील पिलांचे आयुष्यही कायमचे बदलले…पुढे शलाकाचे जीवन कसे बदलत गेले…वाचा पुढील भागात….
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा