८- शलाकाची डायरी
८- शलाकाची डायरी

८- शलाकाची डायरी

८- शलाकाची डायरी
लग्न माझे फायनल झाल्यानंतर करायचे ठरवले.
लग्न जुळल्यानंतर मानस कधीतरी फोन कराचा.मोजकेच बोलायचा. माझ्या अभ्यासाबद्दल विचारायचा किंवा स्वतःच्या अभ्यासाबद्दल सांगायचा.बाकी रोमँटिक बोलणे त्याला जमायचे नाही.केवढा विरोधाभास होता आमच्या स्वभावात.
मी छोट्या छोट्या गोष्टीत सौंदर्य शोधणारी
तर तो सौंदर्याची जाण नसणारा.
मी कल्पनेचे पंख लावून उडणारी
तर तो वास्तवाचे भान राखून जमीनीवर पाय घट्ट रोवणारा.
मी सगळ्या कलांची चाहती. नाटक,सिनेमे,चित्रकला सगळेच मला मोहीत करायचे 
तर त्याला ह्या गोष्टी टाईमपास गोष्टी वाटायच्या.आमच्या स्वभावात एवढा विरोधाभास असूनही आम्ही लग्न करायला तयार होतो. विरोधी स्वभावातील आकर्षण यालाच म्हणत असावेत. 
दिनांक……
आज माझे लग्न झाले मानसबरोबर.राजा लग्नाला येऊ शकला नाही.सगळी जबाबदारी आई,सई आणि संदिप भाऊजींनी उचलली. आईने ह्यावेळेस बाबांना लग्नाला बोलवायची इच्छा व्यक्त केली नाही. बाबांना मनातून काढले होते आता तिने.
माझ्या लग्नानंतर आई एकटीच राहणार होती.
 आई एकटी कशी राहिल?आईची काळजी वाटत होती.
मी मानसबरोबर सासरी गेली. तिथे आठवडाभर राहून आम्ही परत मुंबईला आलो.मानसची नौकरी इथेच होती. मुंबईत असल्यामुळे मी आईला नेहमी भेटायला जात असे.
मानस – त्याला वाईट म्हणावे असा कोणताही अवगुण नव्हता त्याच्यात. सर्व बाबतीत परफेक्ट वाटावा असा. पण मला काही कमतरता जाणवायची,कसली तरी उणीव बोचायची. स्वभावातला विरोधाभास आता प्रकर्षाने जाणवायचा. माझ्यात एक प्रकारची अतृप्तता होती.याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर मी थेट माझ्या  बालपणात पोहचायची. वयाची आठ दहा वर्ष सुखाने न्हाहलेली मी अचानक बाबा गेल्यामुळे विस्कळीत आयुष्य  पदरी पडले. आईने तिला शक्य होईल तेवढे केले आमच्यासाठी.किंबहुना  जास्तच.आमचे खाणेपिणे,संस्कार, शाळा, अभ्यास यासाठी ती जागता पहारा ठेवायची.पण भावनिक गरज. मात्र अपूर्णच राहली.मनात खदखदणाऱ्या  गोष्टी बाहेर कधी पडल्याच नाही.  त्यामुळे एकप्रकारची अपूर्णता,अतृप्तता वाटायची तेव्हाही आणि आताही.
मानसही आईसारखाच माझ्या सर्व गरजा पुरवायचा.नवरा म्हणून त्याला त्याचे ते कर्तव्यच वाटायचे पण इथेही तेच .भावनिक बंध निर्माण  होत नव्हते.त्याचा तो आत्मनिर्भर होता.भावनिक दृष्ट्या कोणावर अवलंबून राहणे त्याला जमत नव्हते. त्यामुळे माझी  भावनिक गरजही त्याला समजत नव्हती. 
आम्ही एकमेकांवर प्रेम करतो का?
 याचेही उत्तर शोधतांना माझा गोंधळ उडायचा.
मानसच्या माझ्याकडून काहीही अपेक्षा नव्हत्या.
त्याचे सगळे रुटीन फिक्स राहायचे. स्वतःला त्याने त्यात बांधून घेतले होते. मी स्वतःला बांधून घेऊ शकत नव्हते.
अशातच स्वानंदचा जन्म झाला.मी आई बनले.  जगण्याला अर्थ  आला. लगेच दोन वर्षांनी सुखदा आली. कुटुंब पूर्ण झाले. संसार जुना होत होता तसतसा मानस त्याच्या कामात जास्त गुरफटत होता. मुले मोठी होत होती.
मी पण त्यांच्या शाळांच्या वेळा बघून जवळच्याच काॕलेजमध्ये नौकरी शोधली. मानसने माझ्यावर कुठलेही बंधन घातले नाही.पण त्याचीही माझ्याकडून तीच  अपेक्षा  होती. मी नौकरी आणि  घर यात गुंतून
असले तरीही मनाला आलेला एकटेपणा जाणवत राहायचा. कोणी तरी हवे मन मोकळे करायला असे सतत वाटत राहायचे. मला  कुणाचा तरी आधार हवा होता. मानस माझा जोडीदार बनला पण सहचर नाही बनू शकला.त्याच्यात प्रियकर किंवा मित्र  कधीच सापडला नाही मला. तो कायम नवऱ्याच्या भूमिकेत राहिला.
ट्रिंग ट्रिंग फोनची बेल वाजली अन् शलाका तिच्या गतकाळातून बाहेर आली.
हॕलो आई मी पोहचलो ग आताच.
पलीकडून स्वानंद सांगत होता.
बापरे,  म्हणजे मी तीनचार तास लिहितेच आहे.
शलाका खोलीच्या बाहेर आली.सुखदा तिचे आवरुन क्लासला गेली होती. घरी शलाका एकटीच होती.तिने पटापट आवरुन घेतले.जेवण केले आणि  पुन्हा खोलीत जाऊन डायरी घेऊन बसली.
दिनांक ….
काॕलेजमध्ये जरा माझ्या आधी एका लेक्चररने काॕलेज जाॕइन केले होते. श्रीकांत नाव होते त्यांचे.  त्यांच्या स्वभावामुळे दोन तीन महिन्यातच मुलांचे आवडते सर बनले ते. कुणावरही प्रभाव पडावा असे व्यक्तीमत्व होते त्यांचे. खेळकर,मोकळा,कुणाच्याही मदतीस तत्पर असणारा स्वभाव. श्रीकांत आणि मी जवळजवळ एकाच वयाचे. स्वभाव थोडाफार सारखा.मी सरांसारखीच बडबडी पण मनातले सांगू  न शकणारी,कितीही बोलले तरी समोरच्याला मनाचा थांग लागू न देणारी.श्रीकांत सर मनात काहीही न ठेवता मन रिते करणारे. श्रीकांतमध्ये मला एक चांगला मित्र  मिळाला. काॕलेज संपल्यावरही आम्ही दोघे थांबत होतो गप्पा मारायला. घरी मुलांना सांभाळायला बाई होती आणि  मानस घरी उशिराच यायचा.
त्याची पीएचडी झाली होती. त्याला आता एका नावाजलेल्या काॕलेजमध्ये नौकरी मिळाली.
 तो त्यातच बिझी राहायचा. आमची मने तर कधी जुळली नव्हतीच पण  आता शरीरही अंतरत गेली  एकमेकांना.
श्रीकांतचे लग्न झाले नव्हते.त्याच्यात मी गुंतत चालले होते. त्याला काहीही विचारा.उत्तरे तयार असायची.सगळ्या विषयांवर चर्चा करायचो आम्ही.
छोट्या  छोट्या गोष्टीत रस असायचा त्याला.
मला त्याच्या खूप जवळ आल्यासारखे वाटत होते.
माझ्या मनाने मैत्रीच्या सीमा पार केल्या होत्या.
मला श्रीकांत हवा होता संपूर्ण.
मी तसे त्याला सांगितले.
त्याने एकच प्रश्न विचारला,
तू तुझा संसार सोडून येणार माझ्यासोबत? 
आकाशात स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्ष्याला धाड्दिशी कोणीतरी जमीनीवर आदळावे तसे वाटले मला श्रीकांतचा प्रश्न  ऐकून.
मी सोडून जाऊ सगळे?मानसला?मुलांना?
माझे बाबा आम्हाला सोडून गेले तसे .घराची वाताहत करुन जाऊ शकेन मी श्रीकांतसोबत?
नाही.
कधीही नाही.
मी हतबल झाले.
बाबा का गेले असतील आम्हाला सोडून? हा प्रश्न  पुन्हा डोक्यात आला.
श्रीकांत मला समजवत होता.
क्रमशः
Next Part

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!