अक्षम्य भाग-५

काही गुन्हे अक्षम्य असतात
अक्षम्य
भाग-५
प्रभाकरराव आधूनिक विचारांचे पण शिस्तप्रिय स्वभावाचे होते.
शलाकाच्या जन्मानंतर एक मुलगा व्हावा असे शलाकाच्या आईला वाटत होते.
पण त्यांना हा विचार पटला नाही.
मीच असे विचार ठेवले तर समाजाला काय शिकवणार?असे त्यांना वाटायचे.
शलाकालाच आपण नीट  वाढवू.सुसंस्कारीत करु असे त्यांचे म्हणणे असायचे.शलाकाला त्यांनी लाडात वाढवले.पण लाडाला नेहमी मर्यादा ठेवली.
शलाकाची दहावी झाली आणि तिने अकरावीत वडील शिकवायचे तिथेच Admission घेतली.
बी.ए. नंतर एम.पी,एस.सी.करुन प्रशासकीय अधिकारी बनायचे असे ठरवले होते.
पण तिने ठरवलेले काही पूर्ण  झालेच नाही.
जे झाले ते सगळे कल्पनेच्या पलीकडले.
मुक्ताला शलाकाने शाळेत सोडले आणि घरी येऊन ती आईकडे गेली.
शलाका खूप  दिवसानंतर अशी माहेरी राहायला आली होती.
नेहमी घरी एकटी असणाऱ्या आईला घर भरल्यासारखे वाटले.
संध्याकाळी आनंद मुक्ताला घेऊन आला.
आज्जी म्हणत  मुक्ता आजीच्या कुशीत शिरली.
चहा पिऊन आनंद निघाला.तो रात्री शलाकाच्या माहेरी कधीही राहायचा नाही.
लिलावतींनी नेहमीप्रमाणे जावयाला राहण्याचा आग्रह केला. 
पण ही एकच गोष्ट तो त्यांच्या मनाने करायचा नाही.
शलाकालाही त्याने कधीतरी माहेरी राहावे असे वाटायचे. पण नाही.आनंद कधी तयार नाही व्हायचा.
शलाकाचे बाबा गेले तेव्हाही तो रात्री त्याच्या घरी गेला होता.
शलाकाला त्याच्या फक्त ह्या एकाच गोष्टीचा राग यायचा. आनंद राहायचा नाही म्हणून शलाकाचेही माहेरी  राहणे कमी व्हायचे.
आनंद निघून गेला. लिलावतीने खास लेकीच्या आवडीचे जेवण बनवले.तिघींनीही जेवण केले. गप्पा करत करत बराच उशीर झाला. मुक्ता तिथेच आजीच्या मांडीवर झोपली. तिला उचलून  तिघीही लिलावतीताईच्या रुममध्ये झोपायला गेल्या.जातांना मध्ये शलाकाची बेडरुम होती.
त्या रात्रीनंतर ती बंदच होती. तिच्याकडे नजर वळवली तरी आजही एवढ्या दिवसानंतरही शलाकाच्या अंगावर शहारे आले.जीवाचा थरकाप झाला.
तिची तडफड तिच्या आईच्या लक्षात आली.
मुक्ताला पलंगावर ठेऊन आईने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवले.तिला समजवत म्हणाली,
शलाका विसरुन जा बाळ ती काळरात्र.
त्या खोलीचची भीती अजूनही  तुझ्या मनात रुतलेली आहे.
अजून किती दिवस ती आठवण उगाळत बसशील.
तू मनात आणले तर सुखच सुख आहे शलाका तुझ्या  आयुष्यात.प्रेमळ सासु-सासरे,आनंदसारखा जोडीदार अहे.सुख सुख यापलीकडे काय असते?
त्याचेच तर जास्त दुःख आहे आई.
एवढा समंजस जोडीदार असूनही मी माझी व्यथा त्याला सांगू शकत नाही आहे.
खूपदा वाटते सांगून टाकावे एकदाचे त्याला.पुढे काय व्हायचे ते होईल. 
पाणी भरलेले भांडे झाकण ठेऊन आगीवर ठेवले,उष्णतेने
 त्याची वाफ होत आहे पण झाकणामुळे बाहेर येवू शकत नाही आहे. आणि आतल्या आत ती कोंडूनही नाही राहू शकत.तशी अवस्था झाली ग माझी.
   खूप वाफ जमा झाली तर झाकणाला उडवून वाफ बाहेर येतेच.मला तर तेही नाही जमत आहे.
 आई मी काय करु?
 शलाका, जे झाले त्यात तुझी काही चूक नव्हती बेटा.
 तुझ्या मनातून तू ती गोष्ट काढून टाक.
 नाही ना.तेच तर नाही जमत. कधी कधी आनंदचा चांगुलपणा अंगावर येतो माझ्या.त्याच्या आयुष्यातुन पळून जावेसे वाटते मला.पण त्याच्याशिवाय मी राहूही नाही शकणार.
 शलाका स्वप्न समजून ती रात्र विसरुन जा.
 करते ग आई प्रयत्न.काही दिवस ती काळरात्र मनातून जातेही पण हद्दपार होत नाही.
 मनाची घालमेल सुरुच असते.
 आनंदला सांगावे असे सतत वाटत राहते.
 त्याला सांगितल्याशिवाय मन शांत होणार नाही.
 नको शलाका.ती चूक करु नकोस. आनंदसारखा जोडीदार नशिबाने मिळतो. नको गमावू त्याला.आणि जे झाले त्यात तुझी चूक नव्हतीच. जी चूक  तुझी नव्हती त्याची शिक्षा तू का भोगावी?
 आई,अग तेच तर. जे झाले त्यात माझी चूक नव्हती हे आनंद नक्कीच समजून घेईल.
 आणि  नाही समजून घेतले तर?
 तो कितीही चांगला असला तरी पुरुष आहे.
 स्त्रियांपेक्षा वेगळे विचार असतात त्यांचे.
हे असे नेहमीच शलाका आणि  तिच्या आईचे बोलणे व्हायचे. आई तात्पुरती शलाकाची समजूत काढायची.पण शलाकाचे प्रश्न जिथल्या तिथे निरुत्तर राहायचे.
मन वेळ मिळाला कि तिथेच धावत राहायचे. मनातले हे जीवघेणे काहूर कधीतरी संपवणे आवश्यक होते.
स्वभावाने समजदार शलाकावर खूप प्रेम करणाऱ्या आनंदवर लिलावतीबाईंचा खूप  जीव होता.
प्रभाकरराव असतांना त्या नेहमी त्यांना म्हणायच्या
शलाकाने नशीब काढल हो आपल्या. असा जावई मिळणे भाग्यातच असावे लागते.
लिला माझी लेक काय कमी गुणी आहे? तिला चांगला जोडीदार मिळणारच होता.
पुरे झाले लेकीचे कौतुक.
आनंद काॕलेजमधून घरी जाता जाता शलाका आणि मुक्ताला भेटायला आला.
लिलावती ताई त्याला म्हणाल्या,
आनंदराव आज जेवून जा इकडेच.
तुमच्या आवडीचे बनवले सगळे. 
बरं आई.
मी घरी फोन करुन सांगतो.आई-बाबा वाट पाहतील.
थांब मी सांगते.
शलाका म्हणाली.
तसेही आज मी आईशी बोलले नाही.
मुक्ता ये ग.आजीशी बोलायला.
शलाकाने सासूबाईंना फोन लावला.
क्रमशः
कथेची मुळ कल्पना-विशाल भोवते

कथेचा पुढील भाग खालील लिंकवर वाचू शकता.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!