आंब्याचे झाड-marathi sad story
आंब्याचे झाड-marathi sad story

आंब्याचे झाड-marathi sad story

बकुळा आणि बबन,
दोघेही आजुबाजूच्या छोट्याछोट्या गावात राहणारे.
बबनचे लग्न करायचे म्हणून कुणीतरी बकुळाचे स्थळ सुचविले.
बबन काकासोबत जाऊन बकुळेला पसंत करुन आला.
लग्नाचा बार मे महिन्याच्या शेवटी उरकावा असे ठरले.
दोघेही खेड्यातले
गरीब शेतकऱ्यांची मुले
बकुळ्च्या माहेरी फक्त चार एकरचा तुकडा.
तर इकडे बबनची परिस्थिती यापेक्षाही वाईट  होती.
डोक्यावर बँक अन् सावकार दोघांचेही कर्जाचे ओझे होते.
यंदा फेडले नाही तर वावर सावकाराच्या ताब्यात जाणार हे नक्की होते.
चार वर्षापासून दरवर्षी नापीकी होती. 
कधी पाऊस जास्त म्हणून  तर कधी पाऊस नाही म्हणून. 
दरवर्षी शेतकरी हवालदिल होत होते.
दोघांमध्ये जास्त गरीब कोण हा प्रश्न पडावा इतपत दोघांचीही सारखी परिस्थिती.
लग्नासाठी वीसपंचवीस हजाराची पण सोय नव्हती दोघांच्याही घरी.
आपापल्या गावातील सावकारांकडून  कर्ज घेऊन लग्न उरकली.हो.उरकलीच.
शहरी माणसांसारखी तीन तीन दिवस लग्न नाही चालत गरीबांची.
डीजे,संगीत……असले प्रकार वर्ज्य असतात तिथे.
बबनला लग्नाच्या आदल्या रात्री हळद  लागली.
पहाटेच नवरीच्या गावाकडे मेटॕडोरने निघाले.
खेड्यात नवरदेवाची आई मुलाच्या लग्नात जात नाही म्हणून बबनची आई अनुसयाबाई घरीच थांबल्या.
गाव कोस दोन कोसावरच.
एकदोन तासातच वरात बकुळेच्या गावात हजर.
वाजंत्री वाजवत लग्नाचा कार्यक्रम आटोपला.
मे महिन्यातील रखरखीत  उन्हात पत्र्यावळ्या उठल्या.
घरातलं पहिलं कार्य म्हणून बकुळेच्या बापाने गावजेवण दिलेले.
जमिनीवर सतरंजी टाकून पत्रावळीत जेवण.
वाढपींची लगबग बघण्यासारखी.
पटापट एकजण मीठ वाढणार.
मग दुसरा भात.
भातावरच वरण.
त्याच्याच बाजूला आलूवांग्याची भाजी आणि मोठमोठ्या पोळ्यांचे दोन कोर.
संपला  मेन्यु
पाणी प्यायला लोकांनी आपापल्या घरुन पेले आणले.
शहरासारखी बिसलरी पाण्याचे नखरे नाहीत.
ड्मला आतून रंग  असतो.त्यात विहीरीचे पाणी भरायचे आणि  प्यायचे. 
बबन-बकुळाचे लग्न आटोपले.
दुपारी चारपाच वाजता वरात निघाली.
सात वाजता बबन त्याच्या नवरीला घेऊन वरातीसोबत घरी आला.
अनुसयाबाईने सुनेला बघितले नव्हते.
खोबरं आणि गुळाचा तुकडा ओवाळून सुनेचा मुका घेतला आणि बकुळेचा गृहप्रवेश झाला.
सुन आवडली  त्यांना खूप .
दुसऱ्या दिवशी बबनने  गावपंगत दिली. (wedding reception )
दोन दिवसात लग्नात आलेले पाहूणे वापस गेले.
बबन-बकुळेचा संसार सुरु झाला.
मे सरायला आला.
जून महिना सुरु झाला.
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच आभाळात ढग जमलेले दिसू लागले.
ते बघून बबनची आई  खूष होत होती.
 
बकूळे तूया पायगून लय साजरा बग,दोन वरीस दगा दिलेला पाऊस अमदा लवकरच येनार’
 
बकुळा खूष झाली सासुचे बोल ऐकून.
यंदा कर्जाची परतफेड करायची होती. 
नाहीतर शेती सावकाराच्या घशात जाणार हे नक्की होते.
बकुळेच्या पायगुणाने यंदा पहिला पाऊस लवकरच आला.
बबन पाऊस येण्याआधीच नांगरणी करुन आला.
पहिला पाऊस, त्याच्या स्पर्शाने चिंब झालेल्या मातीचा शब्दात पकडता न येणारा सुगंध सर्वत्र पसरला.
रखरखीत उन्हाळा जाऊन सगळीकडे ओलावा जाणवायला लागला.
पावसाळा सुरु झाला.
बकुळा पहाटेच उठून घरचे कामे आटोपून
भाजी,भाकर फडक्यात बांधून 
 बबनबरोबरच शेतात जात होती.
शेतात एक मोठे आंब्याचे हिरवेगार झाड होते.
बकुळेला त्या झाडाखाली बसून शिदोरी खावी असे वाटायचे पण बबन तयार नसायचा.
त्या झाडाबद्दल फक्त तो एवढेच बोलायचा,
 
मी जनमलो तवा माया बापानं हे झाड लावले होते’.
 
पेरणीचे काम आटोपले होते.
मजुराला पैसे द्यायला नको म्हणून बबन- बकुळेनीच पेरणी केली.
नांगराला बैल जुंपून हे दोघे त्याच्यामागे बीज टाकत गेले. 
आठदहा दिवसात बीजाचे रोपात रुपांतर झाले. 
आजवर काळ्या काळ्या दिसणाऱ्या  मातीवर 
छोटी छोटी रोपे मस्त डवरु लागली शेतात.
बबन बकुळेला बोलला,
 
बकुळे मायं खरचं बोलते वं, तुया पायगुन लयं चांगला बग.
 
ऐकून बकुळा लाजली.
बबन बोलला,
 
पीक आता मस्तच बहरलं बकुळे. रान हिरव दिसाया
लागलं.अमदा समदी कर्ज फेडतो बग. आपली काळी माय जास्त दिस रुसायची नाय आपल्यावर. बस्स आता कायी दिवस पावसानं जोराचा तडाका नायी देल्ला म्हंजी जमनं बराबर
हे पीकात लय तन वाडलयं बग उद्या निंदून टाकू समदं. 
 
दोघे खूषीतच घरी आले.
सुन शेतात जाते म्हणून सांजचा स्वंयपाक अनुसयाबाई करायच्या.
त्यांचा स्वयंपाक पण काय राहणार?
एखादी भाजी आणि ज्वारीची भाकरी.
ज्वारी शेतातीलच राहायची.
यंदा पण थोडी ज्वारी,कापूस,त्याच्या मध्ये  तीळ आणि  तुर लावली.
सगळी पिके जोमाने वाढायला लागली. 
बबनची माय म्हणायची,
 
बबन्या कापसाला बरा भाव भेटला तर कर्ज फिटून पुढच्या पेरणीसाठी पन पैका वाचन बग’.
 
बबनच्या छातीवरचे कर्जाचे  ओझे उतरल्यासारखे वाटायचे त्याला.
शेतातली पीके एव्हाना डोलायला लागली.
कापसाला गुलाबी,लाल कळ्या लागल्या,
कळ्यांची फुले आणि फुलांची बोंडे तयार होऊ लागली. लवकरच त्यातून पांढराशुभ्र कापूस बाहेर येणार होता.
तुरीची झाडे पिवळ्याधम्म फुलांनी डवरु लागली.
ज्वारी छोटी छोटी कणसे दिसू लागली.
काही दिवसातच हुरडा खायला मिळणार होता.
सुगीचे दिवस जास्त दूर नव्हते आता.
यंदा सगळेच काळ्या मातीचे धनी आनंदात होते.
सगळ्यांचे वावरं  हिरवे होते.
यंदा तरी काळीमाय पदरात दान टाकीनच हा भरोसा सगळ्यांना वाटत होता.
आभाळाएवढे उंचच उंच नाही पण थोड्या उंचीचे स्वप्न ते बघत होतेच.
खूप नाही पण निसर्गाने गुजभर दान तरी पदरात टाकावे असेच वाटत होते त्यांना.
चार पाच वर्षांपासून पाऊस लपंडाव खेळत होता त्यांच्यासोबत.
पाहिजे तेव्हा यायचे नाही आणि नको तेव्हा खूप यायचे.
 
गेल्या  कित्येक वर्षात शेतकऱ्यांची स्वप्ने अपूरी होती.
ते सहजासहजी कसे पूर्ण होणार?
त्या दिवशी बकुळाची तब्येत ठीक नाही म्हणून बबन एकटाच शेतात गेला
घरी आल्या आल्या मायने चहा दिला अन् म्हणाली, 
 
बबन्या बाप व्हनार बरं का तू.
 
मायने असे म्हंटल्यावर बकुळा-बबन दोघेही लाजले.
रात्री तिघेही आनंदातच झोपले.
 
रात्री झोपेत असतांनाच तिघेही पत्र्यावर पावसाचा टपटप आवाज ऐकून जागे झाले.
बबनला वाटले दोनचार शिंतोडे उडवून थांबेल पाऊस असा विचार करुन कुशीवर वळून झोपला.
पण त्याच्या मायची झोप उडाली होती
बबन्या घात झाला रं
पाऊस थांबायचं नाव घेईना.
बबन ताड्कन उठला.
पीक हाताशी आलेच होते तर पावसाने घात केला.
हवा नव्हता तेव्हाच नेमका कोसळायला लागला.
त्याचे कोसळणे कोणी थांबवू शकले नाही.
सगळ्यांची स्वप्ने विस्कटली तेव्हाच त्याने कोसळणे थांबवले.
पाच सहा महीन्यापासून आई, बबन-बकुळा यांनी बघितलेल्या स्वप्नाची  एका रात्रीत राखरांगोळी झाली.
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला होता.
बबन घराच्या बाहेर बघत होता.
अंधारात पाऊस दिसत नव्हता.
वीज चमकायची तेव्हाच त्याचे टपटप भूईवर पडणारे टपोरे थेंब डोळ्याने दिसत होते.
बबन मट्कन खाली बसला.
त्याच्यासमोर सावकार,गहाण पडलेला शेतीचा तुकडा
कर्जापायी फास लावून घेतलेला बाप,
काल मायने सांगितलेली गोड बातमी ….सगळे फेर धरुन नाचायला लागले.
बबनच्या घरात अंधार झाला पण बाहेर रोजच्यासारखे उजाडले होते.
सगळेच आपापल्या घरात निराश,उदास बसले होते.
शेतात जायची ताकद आज तिघांपैकी कुणांमध्येही नव्हती.
घरी आज जेवण बनले नाही.
 
माय  आता वरीस कसं काढायचं रं 
 
म्हणत हमसू लागली.
घरातला दाणा न् दाणा संपायला आला होता.
सगळं पीक जमीनदोस्त केल्यावरवरच पावसाने उसंत घेतली.
बबन -बकुळा दिवसभर विमनस्क अवस्थेत बसून होता.
बबनच्या  मायला सवय  होती या लहरी पावसाची.
या पावसाच्या लहरीनेच बबनच्या बापाला मरायला भाग पाडले होते.
पण आता तिला धीर ठेवावा लागणार होता.
बकूळेच्या गर्भात बबनचे बाळ वाढत होते.
तिच्या  पोटात दोन घास जायलाच हवे म्हणून
ती उठली,चूल पेटवली.लाकडं ओली झाली होती,पेट घ्यायला उशीर लागत होता.
आधी चहाचे पाणी उकळायला ठेवले. 
दुसऱ्या बाजूने डाळ शिजवायला ठेवली.बबन जवळ आली.त्याची  समजूत घालू लागली.
बबन मात्र वेगळ्याच विचारात होता.
माय मांग लागली म्हणून कसातरी पोटात चहा टाकला.
मायला  कापऱ्या म्हणाला,
 
माय येतो वावरातून. 
 
बकुळेकडे बघून पुटपुटला,
 
आपला  लेक शेतकरी नाय बननार बकुळे.
 
एक नजर बकुळेकडे टाकून तो घरातून शेताकडे निघाला.
बराच वेळ झाला तरी बबन घरी आला नाही.
दोघी जणी त्याची वाट बघत दारातच उभ्या होत्या.
अनुसयाबाईला लांबूनच त्यांचा पुतण्या धावत येतांना दिसला. त्यांच्या छातीत चर् झाले.
मोठीमाय बबनदादा बबनदादा झाडाला….
एवढेच ऐकून त्या काय झाले ते उमजल्या अन् बकुळेचा हात पकडून धावतच बबन्या बबन्या असा हंबरडा फोडीत वावरात असलेल्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने  निघाल्या…
             ……..प्रिती……

8 Comments

  1. Darshana1972

    बापरे काळजाचे पाणी.. पाणी करणारी अतिशय सत्य बळीराजाची पीडा ….लेखिकेने आपल्या लेखातून मांडली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!