काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
भाग-१५
आज शलाकाचे माहेर संपले होते.
सगळे आटपून आनंद घरी परत आला.
शलाका,नक्षत्रा तिथेच थांबल्या.
शलाकाला आईच्या आठवणी सोडवत नव्हत्या.
लिलावतीताईंच्या घराचा वापर ज्या मुलींना शिकायची इच्छा आहे पण इथे राहायला जागा नाही अशा मुलींसाठी करण्याचे आनंद,शलाकाने ठरवले.
काॕलेजमध्ये नवीन admissions सुरु झाल्या होत्या.
एकदा शलाकाच्या माहेरी जाऊन व्यवस्था बघणे आवश्यक होते.शलाका-आनंद दोघेही गेले.बाकी घर बघून झाले.शलाका त्या एका खोलीत जाऊ शकत नव्हती.
म्हणून तिने आनंदला जाऊन बघायला सांगितले.
आनंद नाही म्हणाला.शलाकाला आश्चर्य वाटले.
आनंद त्या खोलीत माझ्यासोबत काय झाले तुला माहीत आहे.मी त्या खोलीत न जाण्याचे ते कारण आहे.पण तू तर जाऊ शकतोस.
एकदा बघून घे ना.
नको शलाका मी नाही जाऊ शकणार.
शलाकाला वाटले तिच्यासोबत जे झाले त्याच्या वेदना आनंदला होत असणार म्हणूनच तो त्या खोलीत जाण्याचे टाळत आहे.
दुसऱ्या दिवशी तिथे काम करणाऱ्या बाईला सांगून खोली ठीक आहे का हे शलाकाने विचारुन घेतले.
शलाकाचे काही सामान होते तिथे.ते तिने बाईला दिले.तिने बाकी खोली तिला साफ करायला सांगितली. नक्षत्राचे सामान तसेच ठेवायला सांगितले.
तिची एक डायरी कपाटात होती,कपाटाची चाबी कपाटाजवळच्याच ड्राॕवरमध्ये होती.बाईला सांगून शलाकाने डायरी घेतली..
डायरी,तिच्या मनाशी हितगुज करणारी तिची डायरी.शाळेत असल्यापासून ती डायरी लिहायची.मनातले सगळे डायरीत मांडल्याशिवाय चैन पडायची नाही तिला.
पण त्या रात्रीनंतर डायरी लिहिणे बंदच केले तिने.
डायरी आईने कपाटात ठेवली होती.
आज खूप दिवसांनी जुनी मैत्रीण भेटल्याचा तिला आनंद झाला.
डायरी घेऊन ती घरी आली.
आनंद आणि घरचे सगळे लिलावतीताई गेल्यापासून शलाकाला जास्त जपायला लागले.
आज सुमतीताईची तब्येत जरा ठीक वाटत नव्हती.
शलाका त्यांना घेऊन डाॕक्टरकडे गेली.त्यांना एक दिवस दवाखान्यात भरती राहावे लागणार होते. घरी बाबा ,मुक्ता आणि आनंद तिघेच होते. बाबा मुक्ताला घेऊन बागेत गेले. घरी आनंद एकटाच होता.काहीतरी लिहावे म्हणून तो बेडरुममध्ये गेला.
सोबत कपभर चहाही घेऊन गेला.
शलाकाने घाईघाईत तिचे कपाट उघडेच ठेवले होते.
आनंद लावायला गेला.सहजच शलाकाच्या डायरीवर नजर गेली.
तिच्या परवानगीशिवाय वाचू कि नको या द्वंद्वात अडकलेल्या मनाने ओझरती वाचायला काय हरकत आहे असा निवाडा दिला.
डायरीचे पहिले पान
आज बाबांनी रातराणीचे रोप लावले. त्याला रोज पाणी घालून ते वाढवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली.
मला तर आहेच झाडांची आवड.
दुसरे,तिसरे,चवथे पान
आज आई म्हणाली मी आता मोठी झाले.जपून राहायला हवे.
मुलांपासून,पुरुषांपासून थोडे अंतर राखायचे.
मी आता छोटी मुलगी नव्हते.
आठवीचा निकाल आला. नेहमीप्रमाणे चांगलेच मार्कस् आलेत मला.मी नववीत गेले,
माझ्या गाण्याच्या परिक्षेचाही निकाल आला.
गाणे माझा विकपाॕईंट.
पाच वर्षापासून शास्त्रीय संगीत शिकत आहे.
पुढचे पान
तो रोहित माझ्याकडे बघत असतो सारखा वर्गात.
माझी पण नजर सारखी त्याच्याकडे वळत असते.
मला आवडायला लागला तो.
पण दहावीचे वर्ष आहे हे.
आई एकदा म्हणाली होती, हे वय म्हणजे आकर्षण आणि करियर यात गोंधळ निर्माण करणारे असते.
क्षणिक आकर्षणापायी नुकसान होते.
मला अभ्यासात लक्ष घालायला हवे.
पुढचे पान
झाले दहावी.
प्रथम वर्गात पास झाले.
रोहित शाळेत पहिला आला.
त्याला डाॕक्टर बनायचे आहे. त्यासाठी अकरावीपासूनच तो पुण्याला जातो आहे.
मला अर्थातच त्याची खूप आठवण येईल. त्याला मी आवडत असणार का?
तो जाणार या कल्पनेनेच हूरहूर दाटली मनात.
अकरावीत ॲडमिशन झाली. मला आर्टस् घेऊन बी.ए. करायचे आणि मग एम.पी.एस.सी.
मला प्रशासकीय अधिकारी बनवायचे बाबांचे स्वप्न आहे.
त्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी असे आईबाबा म्हणत आहेत.
पुढचे पान
काॕलेज सुरू झाले.
मोरपंखी दिवस आलेत जणू आयुष्यात.शाळेसारखी इथे शिस्त नाही. मुक्त वातावरण आहे. गणवेष नाही.रोज वेगवेगळे ड्रेसेस.मजाच आहे सगळी.
पण आईच्या सुचना असतातच.
काॕलेजलाईफ एजाँय कर पण मर्यादेत राहून….असे आई सांगत असते.
पुढचे पान
अकरावीनंतर सुट्ट्या सुरु झाल्या.आम्ही सगळ्या मित्र मैत्रिणींनी आमच्या शाळेत भेटायचे ठरवले.
काॕलेजमध्ये सगळ्यांना नवीन मित्र मैत्रीणी मिळाले होते पण शाळेतल्या मित्रांची सर त्यांना नाही असे माझ्यासह सगळ्यांचेच मत आहे.
रोहितही आला होता. त्याचे तेच चोरुन माझ्याकडे बघणे सुरू होते.
बारावी सुरु झाली. आता अभ्यास मन लावून सुरु केला.
रोहित मागे पडला.
पुढचे पान
बारावी पास झाले.अपेक्षेनुसार मार्कस् मिळाले.बी.ए. पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली.
इथे बाबाच प्राचार्य.बाबांना किती मान आहे काॕलेजमध्ये.
मी एम..पी.एस.सी.झाले कि बाबांचा मान अजून वाढेल.माझ्याबद्दल त्यांना अभिमानही वाटेल.
मी आता त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे.
एम.पी.एस.सी.चे क्लासेस लावले.
पुढचे पान
आज कोणी नवीनच सर आले.आनंद देशमुख.
काॕलेजमध्ये आल्याबरोबर त्यांनी बाबांना नमस्कार केला.
ते ह्याच काॕलेजमध्ये शिकले असे बाबा सांगत होते.
आनंद सर एका आठवड्यातच सगळ्यांचे आवडते बनले.
मलाही मराठी शिकवतात.
पुढचे पान
आज बाबांचे मित्र जाधवकाका आले होते घरी.
मला यु.पी.एस.सी.च्या तयारीसाठी दिल्लीला पाठवावे असे बाबांना सांगत होते. बाबा नाही म्हणाले.इथे पण चांगले क्लासेस आहेत.असे सांगितले त्यांनी.
पुढील पान आनंदने पलटवले.पण आता बाकीची सगळी पाने रिकामी होती.
तारीख बघितली त्याने. तीच तारीख होती.म्हणजे त्यानंतर शलाकाने डायरी लिहिणे बंद केले.
जी गोष्ट विसरायचा प्रयत्न करत होता आणि एवढ्यात विसरलाही होता तो.पण डायरीच्या रुपाने परत तीच गोष्ट समोर आली.
क्रमशः
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
उत्सुकता वाढते.
छान कथा 🌟🌟🌟🌟🌟