यापेक्षा निपुत्रिक बरं-marathistory
यापेक्षा निपुत्रिक बरं-marathistory

यापेक्षा निपुत्रिक बरं-marathistory

 

यापेक्षा निपुत्रिक बरं-marathistory

श्री वासुदेवराव व सौ. राधाबाई यांनी काबाडकष्ट करून संसार उभा केला होता. त्यांना तीन मुले व एक मुलगी. तीन मुलं झाल्याने ते दोघेही जाम खुष होते. या जगात आपल्यापेक्षा कुणीच सुखी नाही असा त्यांचा समज होता. या आनंदात कन्यारत्न प्राप्तीचे मोल त्यांना तोकडे वाटू लागलं. बघता बघता त्यांचा संसार बहरला. मुलंही मोठी झालीत. सोबतच मुलगीही लग्नाची झाली.
सौ. राधाबाईला सूनबाईचे वेध लागलेत, पण मुलीचे लग्न केल्याशिवाय सूनबाई घरात येणं शक्य नाही, हे त्यांना उमगले होते. मुलीसाठी मुलाची शोधाशोध सुरू झाली. एक चांगलं स्थळ मुलीसाठी चालून आले, लग्न जमले. निश्चित तिथीला त्यांनी मुलीचं लग्न थाटात केले. एकीकडे मुलगी सासरी निघाल्याचे दुःख, तर दुसरीकडे सूनबाई घरी येईल याचा आनंद, असे दोन्ही भाव राधाबाईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. जसे मुलीचे लग्न झाले, त्यांनी मुलांच्या लग्नाचा ससेमिरा वासुदेवरावांच्या मागे लावला. मुलं नोकरीला आहेत, मोठी झालीत, आताही मीच घरात राबू काय? लवकर घरात सुना आणा. त्यांना सासूचा तोरा मिरवायचा होता. सुना आल्यावर राधाबाईला कसला आनंद होणार होता हा प्रश्न वासुदेवरावांना पडला ?…
बघता बघता तिन्ही मुलांचे लग्न झालीत. वासुदेवरावांनी अगोदरच तिन्ही मुलांची सोय करून ठेवली होती. राधाबाईचा तोरा काय पाहायचा. तीन तीन सुना.
मुलगी माहेरी आली, की त्या थकत नव्हत्या सुनेचे कौतुक करतांना. मुलीला वाटायचं आई बाबा सुखी आहेत.
जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसा मुलांनी व सुनांनी आपला रंग दाखविणे सुरू केले. त्या तिन्ही मुलांनी आपापली वेगळी चूल मांडण्याचा कांगावा सुरू केला. काही दिवसांतच एका घराची चार घरे झालीत. मुलीचे ते हक्काचे माहेर, हक्काचे घर,पण सूनबाईंना तेही बोचू लागले. मुलीचे माहेरी येणे आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. सर्व काही बदललेले होते.
एक दिवशी अचानक आलेल्या पावसाने मोठ्या सुनेने टेरेसवर घातलेले वाळवण घरात घेताना वासुदेवरावांची त्रेधातिरपीट उडाली होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून ते घरी आले होते. घरात घेईपर्यंत सगळे वाळवण थोडंफार भिजलेच. फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते वाळवण ठेवले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सुनेचाच कॉल होता.

आईने वाळवण आत घेतले काय? तुम्ही सोनुला शाळेतून आणलं काय? पाऊस येईल कपडे आत काढून ठेवा म्हणा आईला? मी माझ्या आईकडे आली आहे येतेच थोड्या वेळाने ?

असा कामाचा पाढा वाचून त्यांच्या सुनेने फोन ठेवून दिला. तसे त्यांनी घरात असलेल्या लहान सुनेला आवाज देवून बाई जरा वरचे कपडे काढून घे. आईची तब्येत बरी नाही झोपली आहे ती.घरातूनच धाकटी सून खेकसली,

“आईला काय धाड भरली. काही वेळापूर्वी तर पोरीसोबत मोबाईलवर खिदळत होत्या. तुम्ही जावून काढा ? नाही तरीही आता घरीच असता.”

असे प्रत्युत्तर दिले. खिन्न मनाने त्यांनी झोपलेल्या राधाबाईकडे पाहिलं. मनातच पुटपुटले. हिला सुना पाहिजे होत्या व मंद मंद गालातच हसून कपडे काढायला गच्चीवर गेले.
ते नुकतेच सेवामुक्त झाले असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांना बायकोसाठी,पोटच्या मुलांसाठी,नातवांचे भविष्या साठी काही तरी करावयाचे होते. राधाबाई पण खूप खुश होत्या, पण ते सुख नियतीला पहावले नाही. बायको नेहमीच अस्वस्थ राहते,तिचे जेवणपण कमी झाले,पूर्वीसारखी हसत नाही,म्हणून वासुदेवराव नेहमी चिंतेत राहत असत. त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावून आईची व्यथा सांगितली. “आईला एखाद्या डाॅक्टरकडे दाखवू या.”

असे म्हटले,एक एच करीत सर्व मुलांनी तेथून काढता पाय घेतला. हे बघून त्यांना खुप वेदना झाल्यात, पण त्यांनी स्वतःला सावरलं. आटो आणून स्वतः त्यांनी राधाबाईला डाॅकटर कडे नेले.
राधाबाईंना पोटाचा कॅन्सर झाला आहे हे कळल्यावर वासुदेवरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. कॅन्सर अखेर चरणात पोहचला असल्याने ती आता काही दिवसांचीच सोबती होती. राधाबाईंनी वासुदेवरावाना धीर देत म्हटले,

काळजी करू नका हो ,आपले तीन सोन्यासारखी मुलं आहेत, ते करतील माझा उपचार एखादया मोठ्या डाॅकटरकडे.

वासुदेवरावांनी एक कटाक्ष बायकोकडे टाकला. जे मुलं आईला दवाखान्यात आणु शकले नाहीत, त्यांचेकडून कसली अपेक्षा करते ही? असा प्रश्न स्वतःलाच केला.
दोघेही घरी परत आलेत. मुलांनी आईची साधी विचारपूस पण केली नाही

. ‘काय म्हणाले डाॅक्टर’

हे सुध्दा विचारले नाही.सुना तर त्याहून निब्बर.आईला बाबा अचानक बाहेर घेवून गेलेत हे एकून एकून मुलगी अस्वस्थ झाली होती,ती वांरवांर बाबांना फोन करून आईची विचारपूस करीत होती.आई घरी पोहचली हे कळताच मुलीचा फोन आला

,बाबा आई कशी आहे,काय झाले आईला,बाबा तुमचा आवाज का थरथरतोय?,तुम्ही ठीक आहात ना.आई काय करते आहे?जेवण झालं तिचे? आईला फोन द्या ना

असा प्रश्नांचा भडीमार सुरू केला. मुलीचा फोन येताच वासुदेवरावांचा संयम सुटला. त्यांनी हुंदका दिला.
“काय झालं बाबा ? का रडता ? बरं नाही काय ?

वासुदेवरावांनी स्वतःला सांभाळलं.

आई झोपली आहे बेटा. मी दवाखान्यातून आईला आत्ताच घरी घेवून आलो. “का बरं? काय झालं आईला ? सांगा ना बाबा.” मुलीचा रडका व काळजीचा स्वर ऐकून वासुदेवराव म्हणाले, “पोरी आईला कॅन्सर झाला. आठवडा झाला आईची तब्येत बरी नाही. तिघांनाही म्हटले आईला दवाखान्यात घेवून चला पण त्यांना वेळ नव्हता आईसाठी. डाॅक्टरानी काही चाचण्या करायला सांगितल्या, तर आमचेजवळ पैसे नाही म्हणतात. तुझ्या आईच्या हट्टापुढे मी सर्व पैसे तिन्ही मुलांना वाटून दिले. आता फक्त पेन्शन आहे. घरचे विजेचे बिल, टॅक्स, पाणी बिल पण ते भरत नाहीत. मलाच भरावं लागतं. पोरी तू परक्याच धन ! तुला काय सांगणार बेटा !”

असे म्हणून काही सांगीतले नाही आणि रडायला लागले.काहीच
काळजी करू नका बाबा मी उद्याच घरी येते.मुलीचे हे वाक्य एकून वासुदेवरावांना आता थोडा धीर आला होता.

वासुदेवरावांनी रंगवलेल्या स्वनांचा चुराडा झाला. ते राधाबाईची खूप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. मुलगी आली तिने सर्व सूत्र आपल्या हातात घेवून आईला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मुले आपल्या संसारात रमली होती. आई मरते, की वाचते याची त्यांना चिंता नव्हती. बहिणीने तिन्ही भावांना फटकारले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
अखेर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उगवला. राधाबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला.ताडकन वासुदेवराव आत गेले. राधाबाईंना धाप लागली होती, त्या जोरजोरात श्वास घेत होत्या.भरलेल्या नजरेने वासुदेवरावानी बायको कडे बघून तिचा हात हातात घेतला. राधाबाईनी खुणेनेच वासुदेवरावांना त्यांचा कान जवळ करण्यास सांगितले. कान जवळ करताच राधाबाई म्हणाल्या, “वासुदेवा,

मला माफ करा. आज तुम्हाला एकेरी हाक मारते आहे. पण आज तसं म्हणावसं वाटलं . खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती. पण कधी हिंमत केली नाही. मी आता फार जगेन असं वाटत नाही.

कालच सूनबाई आणि मुलं आपसात बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरं तर आज तुम्हाला हे सांगणारच नव्हते, पण काल रात्रीपासून माझा आवाज खालावत चाललाय.असो. बहुतेक मुलांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणीच, मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू होते. मला माझी काळजी नाही. माझ्या पश्चात तुमचे कसे होईल ? याचीच चिंता मला सतावत आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांना आपण देवून टाकले. उरले सुरले माझ्या औषधोपचारात खर्च झाले , तरी आपल्या पोरीने माझे खूप केले. कालचे सुनांचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे, पण मुलांना सोडून कूठेही जावू नका. असे असले तरी तुम्हालाच तुमच्या अस्तित्वाचे जतन करून ठेवायचे आहे.तुम्ही परावलंबी नाहीत हे मला ठाऊक आहे ,आपली पोरगी तुमची काळजी घेईलच. मी गेल्यावर स्वतःला सांभाळा..पोरीला आजच बोलवून घ्या. मुलांना पण बोलवा

असे म्हणून राधाबाई धापा टाकू लागल्या. तसेच वासुदेवराव आत घावत गेले. मुलांना, सुनांना आवाज दिला. दोन मुलं घरी नव्हती, लहान मुलगा घरीच होता. वासुदेवरावांनी मुलीला फोन केला व बोलावून घेतले. वासुदेवरावांनी धाकट्या मुलाला म्हटलं, “चल आईला दवाखान्यात घेवून जाऊ,
तर मुलगा म्हणतो,

“डाॅक्टरांनी सांगितले ना, आता औषधाचा काही फायदा होणार नाही, मग कशाला दवाखान्याचा फालतू खर्च करायचा.आज माझ्या नवीन घराचा स्लॅब पडणार आहे मला तेथे राहणे आवश्यक आहे,मी जातो

असे म्हणून बायकोसह निघून गेला. वासुदेवराव निःशब्द होवून राधाबाई जवळच बसून होते. राधाबाई धापा सुरूच होत्या, न जाणे कुणात त्यांचा जीव अडकला होता. मुलगी घरी पोहचताच आईला पाहून रडू लागली.मुलीचा आवाज ऐकून राधाबाईनी डोळ्यांची उघडझाप केली व केविलवाण्या नजरेने मुलीकडे पाहून म्हणू लागल्या, “बाई मला मरायचं नाही. तुझ्या बाबासाठी जगायचे आहे. बाई मला वाचव,” असे म्हणून रडायला लागल्या. राधाबाईंचा श्वास हळूहळू त्यांचा साथ सोडू लागला. काही वेळाने राधाबाई अखेर शांत झाल्या. मुलीने टोहो फोडला, “आsssई ! आsssई !”

वासुदेवरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकली होती पण किती काळजी होती सर्वांची तिला,तिचं पुर्ण आयुष्य सगळ्यांच्या काळजीतच गेले. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी मुलांसोबतच राहायला हवं. म्हणून आजही वासुदेवराव आपल्या वचनाखातर खोलीत राधाबाईंच्या फोटोसह एकटेच राहतात. आई देवाघरी गेली, पण मुलांमध्ये काहीच बदल झाला नाही. मुलगी अजूनही अधूनमधून बाबांना भेटायला येते. घरी चला असा आग्रह करते. बाबा आईची अखेरची इच्छा तिला सांगून नेहमीच टाळून तिची समजूत घालतात. वासुदेवराव नेहमी मुलीला म्हणतात

, “तुझ्या आईला मुलांचा खूपच लळा होता, पण शेवटी शेवटी ती मला म्हणायची मुलांपेक्षा आपली मुलगीच बरी. असे मुले असण्यापेक्षा मी निपुत्रिक असती तर बरे झाले असते.

असे म्हणून फोटोला बिलगून वासुदेवराव आसवं गाळतात व कधी यातून सुटका होवून मी आपल्या राधेजवळ जातो याची वाट बघून रोज आपल्या जीवनाचा गाडा रेटीत होते.काळाला त्यांचे दुःख बघविले नाही.अवघ्या एका वर्षातच वासुदेवराव सर्वाना पोरके करून आपल्या राधेजवळ निघून गेलेत.
😢श्री अरविंद सराफ.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.
अरविंदस्मित.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

9 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!