जीवनाचा खरा अर्थ-मराठीकथा
जीवनाचा खरा अर्थ-मराठीकथा

जीवनाचा खरा अर्थ-मराठीकथा

सुमी आज खूपच खूष होती.तिचा लाडाचा लेक किती तरी वर्षानंतर अमेरिकेतून येणार होता. लग्न झाले आणि रोहीत तिला दुरावला.आजकाल तर फोन येणे पण जवळपास बंद झाले. लग्नाआधी दिवसातून एक फोन तरी करायचा साकेत पण आता….सुमीने डोळ्याला पदर लावला.पिल्लू मोठे झाली.. आणि दुरावली.ती तर आता आकाशात झेपावणारच..उंच भरारी घेणार ….आकाशाची उंची सुध्दा त्यांना कमी पडायला लागते.नवे क्षेत्र ..नवे क्षितिज त्यांना खुणावित असते.आपले चार भिंतीच घर त्याला आता बंदिस्त..छोटे वाटायला लागले ..म्हणून तर तो जास्त पगार मिळतो म्हणून अमेरिकेला गेला.त्याने जाण्याबद्दल सांगितले आणि सरूच्या पोटात भीतीने गोळा ऊठला.इतक्या लांब ..कसा राहशील.? आपल्या सारखे जेवण मिळेल का?पुन्हा तब्येतीचा विचार ..बरे नसले तर कोण काळजी घेणार? अंसख्य प्रश्न तिच्या मनात रूंजी घालायचे.पण रोहीत गेला.आई काळजी करू नको… तुझी काळजी घे…अग आजकाल सर्व खूप सोपे झाले ग ..मी रोज फोन करत जाईल.गेला तेव्हा सुमी किती दुःखी झाली होती.

गरीब घरात जन्मलेल्या सुमीचे बालपण सुंदर होते पैसा कमी होता पण प्रेम करणारे आई…वडील होते.अभ्यासात खूप हुशार होती ती… पण खेडेगाव…लग्नाचा विषय निघाला.मुलगा छान होता. घरात सर्वात मोठा..मोठे कुटुंब वडील लहानपणी गेले त्यामुळे सर्व जबाबदारी त्याच्यावर.मोहन तिला शिकवायला तयार होता.सरूला तेच हवे होते.लग्न झाले.घरातील कामे करून अभ्यास करणे तिला जड जात होते.पण तिचा जिद्दी स्वभाव होता .कोणतेही काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण झालेच पाहिजे असे तिला वाटायचे..घरात सर्वांना माया लावायची. लवकरच घरामध्ये सर्वांच्या लाडाची झाली.

जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळे हौस..मौज मनातच राहायची.तिला पेंटीगची आवड.खूप सारे रंग उधळावे …रंगाचा नुसता बाजार मांडावा असे तिला वाटायचे पण ……..
तिच्या सर्व इच्छा अपेक्षा उंबरठ्यावर येऊन वाकूल्या दाखवून वापस जायच्या.पण एक दिवस आंनदाचा उजाडला.तिला नोकरी लागली. आता सर्व ठीक होईल या आंनदात ती होती.किती तरी दिवसांनी मोगरा फुलला होता.आता मनसोक्त रंगाची उधळण करायची …रंगात अगदीच डुंबून जायचे.नवीन साड्या …एखादा दागिना अंगावर मिरवायचा.खूप आंनदात होती ती.रोज तिची कसरत असायची .घर..नोकरी ..थकून जायची पण मनात समाधान होते.चेहऱ्यावर तृप्त भाव दिसायचे.लग्नानंतर चहात साखर विरघळावी तसे तिचे झाले होते.स्वतःचे अस्तित्व काहीच उरले नव्हते.तरीही प्रत्येकाच्या आशा..अपेक्षा अपुऱ्या

दिवस चालले होते आणि अचानक सासू आजारी पडल्या.अर्धागंवायूचा झटका आला. सर्वांनी काढता पाय घेतला.बाई वेळेवर येईना.सासूचे हाल होत होते.मुलगा छोटा होता.शेवटी नोकरी सोडून दे मोहनने ठरविले.त्याचा निर्णय तिला योग्य वाटला.पण ती खूप दुःखी झाली.क्षणात सर्व संपल्यासारखे झाले…आशेने गुंफलेले स्वप्न हवेत विरले.

आता रोहीत शाळेत जाऊ लागला. पुन्हा तिच्या आशा पल्लवित झाल्या.जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या.आता पुन्हा अपूर्ण स्वप्नं पूर्ण करायचे…छानसी नोकरी करायची.मोहनला रोहीतला पाळणाघरात ठेवणे पटले नव्हते तसे सरूलाही आवडले नव्हते पण काही दिवसांची गोष्ट होती…नंतर काहीतरी मार्ग निघेल या आशेवर ती होती.तिने मनाला आवर घातला.तिची नोकरी सुरू झाली.काही दिवस बरे गेले.रात्री रोहीत खूश दिसायचा कारण आई जवळ असायची.

अचानक रोहीत आजारी पडला.सारखा आई… आई करायचा.पाळणाघरातून त्याला घरी आणले.त्याला आईची खरी गरज होती.आता पुन्हा निर्णय सुमीला घ्यायचा होता.नोकरी सोडून दिली तिने.या वेळेला पण तेच दुःख …पण रोहीतच्या प्रेमापोटी ती सर्व विसरली.मोहन बघत होता..सुमीला एवढी ताकद कुठून मिळते हेच त्याला कळत नव्हते.प्रत्येकाला खूष करता… करता तिचे जगणे ती विसरून गेली.

रोहीत मोठा झाला होता.त्याला तडजोड करूनच अमेरिकेत पाठविले होते.
सुमी…सुमी मोहनने आवाज दिला.कुठे गुंग होती?
काही नाही हो….रोहीतला यायला आठ दिवस उरले.
अग सुमी…काल ते अनाथालयवाले आले होते नं ते घराचा एक हिस्सा भाड्याने मागत आहेत.आपले मोकळे ..चाकळे घर त्यांना खूप आवडले..आपली बाग आवडली त्यांना…किती दिवसांनी आजूबाजूला किलबिल ऐकू येईल.मोहन बोलत होता.
बघू हो…आधी रोहीतला येऊ द्या बर…तुम्ही मध्येच काही लावू नका.बघू नंतर.
बरे बाई ..रोहीत येण्याचा आंनद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.रात्र झाली.रोहीतचा फोन आला.
आई …जरा ऐकून घेते का ?. अग फ्लॅटची खरेदी आहे माझ्या. मी नाही येऊ शकत.आणि हो ऊद्या बिल्डर येईल तुमच्या कडे मी परस्पर घराचा सौदा केला पाच कोटी मिळणार आहेत.
तुम्ही दोघे अमेरिकेत राहायला या.आई तुला फक्त उद्या सही करायची आहे.तिच्या पायाखालची जमीन सरकली.कसे शक्य आहे घर सोडून जाणे.सारी हयात या घरात गेली.लग्न होऊन याच घरात आली.किती तरी आठवणी.रोहीतचा जन्म…त्याचे बोबडे बोल…हसणे..खेळणे….त्या आठवणीत जगायचे आहे आता.

रोहीत.. आम्हाला विचारले का? मला गृहीत धरू नको. मला मान्य नाही..मी माझ्या घरीच राहणार.जीवनाचा खरा अर्थ आता कळला रे मला.

अहो…तिने मोहनला आवाज दिला.
काय ग सुमी?
मला अर्धे घर अनाथालयाला दान करायचे आहे.
मोहन तिच्या चेहऱ्यावर तृप्त भाव बघत होता.

ज्योती रामटेके

8 Comments

    1. Parvin Dani

      खुपच सुंदर लिखाण …पिलुचे पाखरु व पाखरुचा पक्षी फारच सुंदर रंगविला. कथेचा शेवट अप्रतिम हं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!