सुप्रियाचे सासरे गेल्यानंतर सासु बाई काही दिवस ठीक होत्या नंतर त्यांनीही अंथरूण धरलं. वाटणीचा वाद चिघळत होता
स्वयंसिद्धा : भाग १५
शंभर धागे दुःखाचे
आजचा दिवस आनंदात घालवूया म्हटलं तरी उद्याची काळजी असतेच माणसाला. नोकरीच्या ठिकाणी सारी मायेची, प्रेमाची सहकार्याची , हाकेस धावून येणारी माणसे भेटली , तशी सुप्रिया आणखीनच घट्ट उभी राहू शकली.
तिच्या जीवनात एक प्रकारचे स्थैर्य आले ,पण नियतीचे डाव काही वेगळेच असतात.
सासरे गेल्यानंतर सासूबाई दोन वर्ष ठीक होत्या नंतर तब्येत ढासळली. पुन्हा दिवस रात्रीची ओढाताण आणि धावपळ. औषधी, जेवण , डायपर चादर बदलणे सुरूच . दिवस कधी संपे आणि रात्र कधी कळत नव्हते . सासुबाईंच्या शरीराचं आणि मनाचं दोन्ही तंत्र बिघडले होते. त्या मनोरुग्ण झाल्या.
बोललेलं समजायचं नाही, काही विचारलं तरी बोलायचं नाहीत. आढ्याकडे बघून हातवारे करायच्या. सारखी भूक लागायची, जेवायला दिलं तरी दिलेच नाही म्हणायच्या. सुप्रिया नोकरीच्या वेळेत मग मुलींना आणि माधवला त्रास व्हायचा . कधी म्हणायच्या मला ‘ माझ्या घरी नेऊन सोडा हे माझं घर नाही’. नैसर्गिक विधीचा ताबा तर आधीच गेला होता. अंग पुसून पुसून स्पंजींग करून अंगावरच्या सैल कातडीला त्रास व्हायचा त्यांच्या. थोडंही ओढलं गेलं की करणाऱ्यालाच एक दोनदा त्या चावल्या पण होत्या .
सासुबाई गेल्या तिला सोडून.
ती पुन्हा एकदा खचली, थकली तनाने आणि मनाने.
पण एवढ्यात तिला हार मानायची नव्हती . आत्ता तर ती कुठे स्वयंसिद्धा झाली होती. आत्ताच तर तिला जगण्याचा खरा अर्थ कळाला होता.
सासुबाई गेल्या तसे सासऱ्यांचे येणारं पेन्शन बंद झालं.
सुप्रिया माधवच्या चार खोल्या व्यतिरिक्त बाजूच्या तीन खोल्यांचं एक घर किरायाने दिलं होतं. त्याचाही थोडा हातभार सुप्रियाला होता. पण सासरे गेल्यानंतर मोठे दिर बाजूच्या घरात राहायला आले , तसं ते घरभाडे बंद झालं . त्यामुळे सुप्रियाची आता पुन्हा आर्थिक ओढाताण वाढली. खर्चाची तोंडमिळवणी करता करता नाकी नऊ येत होते.
दुकान ठीकठाक चाललं होतं . त्यातून खूप काही उत्पन्नाची अपेक्षाच नव्हती. माधवला गुंतवून ठेवणे हे एकच महत्त्वाचं होतं. दुकानातून उत्पन्न वाढवण्यासाठी एकतर भांडवल नव्हतं आणि खरेदीसाठी कोणाला वेळही नव्हता .
पुन्हा घर नावाच्या इमारतीसाठी सुप्रिया नावाचा एक भक्कम वासा उभा होता.
जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकते त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तरी ती मागे फिरत नाही. सुप्रियाचही असंच होतं .
पाहता पाहता सुप्रियाच्या संघर्षाला आठ वर्षे लोटली.
मोठी शाल्वी पदवीच्या शेवटच्या वर्षात तर धाकटी सई पहिल्या वर्षात होती . सुप्रिया अर्धी लढाई जिंकली होती अर्धी बाकी. मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सेटल करणे, त्यांनाही स्वयंसिद्ध होऊ द्यायचे मग लग्नकार्य.
आई गेल्यावर माधव पुन्हा एकटा पडला. माधवच्या आजारपणानंतर त्याच्या भाऊ आणि बहिणीने हळूहळू संबंध कमी केले. आई-वडिलांच्या जाण्याने त्यात अजून अंतर पडलं. सुप्रियाचे मोठे दिर शेजारी आल्यानंतर ” आता माधवच घरही मलाच सांभाळावं लागते ” अशी चर्चा नातेवाईकात शेजारी पाजारी करू लागले . तसे स्वाभिमानी सुप्रियाने संबंध अजून कमी केले . दिराचे उपकारही नको आणि त्यांच्यावर आपले ओझेही नको .
माधव मध्ये खूप सुधारणा ही नव्हती किंवा त्याला त्रासही नव्हता. अचानक कुठून तरी कोरोनाचा प्रभाव वाढला .
मास्क…. सॅनिटायझर…. होम कोरंटीन
रस्ते , शाळा , क्लासेस सगळं बंद .
एका सायंकाळी सुप्रियाला माधव जरा बेचैन वाटला.
अशा भयंकर कोरोना काळात माधवला पुन्हा पहिले सारखा झटका आला होता. हा झटका त्याला बऱ्याच वर्षांनी आला, तसे सुप्रियाला औरंगाबादच्या डॉक्टरचे शब्द आठवले , ” माधवला आता अधून मधून असे झटके येतच राहणार, जपायला हवे “. हे सुप्रिया हा झटका येईपर्यंत विसरूनच गेली होती.
झटका आला त्यावेळी रात्र होती खूप पाऊस पडत होता. माधव खूप कासावीस होत होता , श्वास घ्यायला त्रास होत होता.
त्याला असं बघून सुप्रिया आणि मुली घाबरून गेलेत. दवाखान्यात जायला रिक्षाही मिळत नव्हत्या तेव्हा. सुप्रियाने रेनकोट चढवला. माधवला ही घातला. त्याला उभं करण्याचा प्रयत्न करताना तिच्या लक्षात आलं, माधवच्या पायातली शक्तीच गेली. तो उभाही राहू शकत नव्हता.
तिने लगेच त्याला गाडीवर बसवलं, आणि जवळचा दवाखाना गाठला. रिमझिम पाऊस चालू होता, माधव चा बी.पी.वाढला असावा, असं तिला वाटलं होतं.
डॉक्टरांनी तपासणी करून ताबडतोब न्यूरो सर्जन कडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. आता तिला मनोमन काळजी वाटू लागली. रात्रीचे 8 वाजून गेले होते, पाऊस थांबण्याचे मनावर घेत नव्हता. पण तिने पुन्हा माधवला गाडीवर बसवले, आणि ती दवाखान्याच्या दिशेने निघाली, घरी मुलींना फोन करून कळवले होते तसे तिने. आता तिला खरी गरज होती मदतीची. तिने आपले सहकारी सदानंद सर याना फोन केला, त्यांच्या बहिणीच्या म्हणजे डॉ.भाग्यश्री मदतीने तिच्या हॉस्पिटल मध्ये प्राथमिक तपासणी केली आणि पुढील उपचारासाठी मोठया हॉस्पिटल मध्ये भरती केले.
क्रमशः
मोहिनी पाटनुरकर राजे
काय होईल माधवचं ? उभा राहू शकेल का माधव पुन्हा ?
वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/