भाग-८
तृष्णा
सखासोबत नदीवरुन आनंदात परतलेल्या तृष्णेसोबत पुढे का होते वाचा खालील भागात.
मी आई बनल्यावर मलाही असेच माझ्या बाळाने न सांगता सगळे समजेल?
आज पहाटेच सखा गेला. त्याची आॕफिसची वेळ उशिरा असली तरी हा लवकर जातो. का जात असेल लवकर?
विचारले तर काही सांगत नाही.अबोल आहेच तो.
त्याला बोलते करण्याचा कितीही प्रयत्न करा.
काही फायदा होत नाही.
आज सखा लवकर आला तर आजही नदीवर जायचे आहे मला.
ती सतत झुळूझुळू वाहणारी नदी,
आभाळाचा आरसा असलेली नदी,
आभाळाचे प्रतिबिंब आत साठवणारी नदी
निर्मला किती जवळची वाटायला लागली मला.
काल एकदाच भेटली पण मनाचे हितगूज सांगायला मैत्रीण मिळाली मला.
कैक लोकांचे मन साठवले असणार तिच्यात.
चेहऱ्याबरोबर मनाचेही प्रतिबिंब तिच्या उतरवले असतील काही जणांनी.प्रेमीजणांच्या प्रेमाची साक्षीदार असलेली प्रेमभंगाचे दुःखही प्रेमीबरोबर अनुभवले असणार.
बस्स आज पूरे.आई म्हणायची नेहमी
तृष्णा अग किती बोलतेस.
त्यावर बाबांचे ठरलेले उत्तर ,
“पण गोड बोलते माझी तृष्णा,ऐकतच राहावे वाटते.जीभेवर शब्द ठाण मांडून असतात तृष्णेच्या.एक शब्द बाहेर पडायच्या आधी दुसरा तयार असतो.तृष्णा अशीच रहा तू”.
राधे तिला बोलू देत जा ग.
झालं मी एक शब्द तृष्णेला बोलले कि यांचे दहा शब्द तयार असतात….आई लटक्या रागाने बोलायची.
बाबा गेल्यानंतर खूप दिवस मी अबोल झाले होते.माझ्या अबोल आईने बाबांची जागा घेऊन मला बोलते केले.
सगळे पुरुष माझ्या बाबांसारखे असतात अशाच समजूतीत मी होते.सख्याशी लग्न झाले आणि माझी समजूत खोटी ठरली.मला आठवते तेव्हापासून आईबाबांचे पारदर्शक नाते मी बघितले.
माझे आणि सख्याचे नाते तसे आहे का? काही दिवसांनी होईल का तसे?नवराबायकोच्या नात्यात पारदर्शकता ,प्रामाणिकपणा असावाच.
एकमेकांच्या मनाचा तळ गाठता यायला हवा.आरपार भेदता यावे मनाला.नितळ,स्वच्छ नाते त्या निर्मला नदीसारखे.
मला सखा बरोबर तसे नाते हवे.
वेळ लागेल पण करेन मी तसे प्रयत्न.
आज आता पुरे.स्वयंपाक करुन ठेवते .सखा आला तर नदीवर जावू शकते.फोन करुन विचारु का सखाला.
नको.उचलत नाही तो,पण बघते करुन.आज उचलला तर.
व्हिडीओ बंद केला तृष्णाने.
कॕसेटही संपली होती. अमोल तृष्णाच्या विचारात गढला.तृष्णा इतकी सुंदर आहे तिचा सखाही असाच असेल का? तिला खूप प्रश्न विचारावेसे वाटतात पण कसे विचारु?
आता कुठे असेल ती? तिचा सखा.ह्या घरात किती दिवस राहले असतील? नंतर का गेले?कुठे गेले? चवथी कॕसेट होतीच .
संध्याकाळ झाली होतीच.आज तृष्णाकडून निर्मलाभेटीचे वर्णन ऐकले.मी पण जातो.असा विचार करत अमोल तयार झाला आणि निघालाही.
काळातील अंतर पुसून जाईल. तृष्णा, तिचा सखा त्याला भेटतील असेच त्याला वाटत होते.कॕसेट बघितली कि तो गोंधळून जात होता.
नदीवर जावून इकडेतिकडे फिरु लागला.संध्याकाळची कातर वेळ बरीच जोडपी दिसत होती. अमोलची नजर तृष्णा सख्याबरोबर दिसते का हे शोधण्यासाठी भिरभिरत होती.
ट्रींग ट्रींग
अमोल भानावर आला.
अमोल कधीची फोन करतेय.झोपला का?
नाही ग मुक्ता.नदीवर आलो.
एकटाच ?
हो ग.
कधी येतोस परत?
येतो ग दोन तीन दिवसात.
अरे काम झाले नं.मग आता थांबून काय करतोस?
पूर्ण काम नाही झाले अजून.
ये रे लवकर.
मुक्ता ये ना तूच इकडे.
वेडा आहेस का? आपण अजून घरी देखील सांगितले नाही..
चल ठेवते फोन.ये लवकर
बाsssय
अमोल नदीच्या तीरावर बसला जरावेळ.
तृष्णाने नदीचे केलेले वर्णन आठवू लागला.आज नदी त्याला तिच्या नजरेतून दिसत होती.
दिवस कलंडला.रात्र व्हायला आली.
अमोल निघाला घराकडे.
विजय त्याची वाट बघत होता.आज तो लवकर आला होता.
येतांना दोघांसाठी घरुन डब्बाही घेऊन आला.
विजय उद्या आपण इथेच जेवण बनवू.तृष्णाच्या किचनमध्ये.
कोण तृष्णा?
अरे खूप वर्षापूर्वी कोणी तृष्णा नावाची स्त्री राहायची इथे.
एकटी?
नाही रे.दोघे नवराबायको राहायचे.
तुम्हाला कसे माहित .
कळले मला.
विजयने जेवण केले.हाॕलमध्ये झोपून गेला.
अमोल रुममध्ये आला. बाबांना फोन केला.
बाबा,आपल्या घरात कोणी स्त्री राहायची का?
आपले घर? कोणते रे?
इथले.
अमोल आपण तिथे कधी राहलो नाही.ते घर आपले कसे?तू ये बाळा लवकर परत.
बाबा इथे कोण राहायचे?
कोणी नाही रे.मी ते घर सोडल्यावर कोणी राहत असेल तर माहीत नाही.
तू कधी येतोस?
येतो बाबा.
अरे तुझी तयारी बाकी आहे सगळी.
बाबा मी बाहेर शिक्षणाला जाणे रद्द केले.
काssssय?
का? घाईत कुठलाही निर्णय घेऊ नको.
तू ये.ठरवू आपण.
बरं बाबा.
अमोलने फोन ठेवला.
चवथी कॕसेट त्याला खूणवत होती.
झोप येत होती पण थोडावेळ बघतो असे म्हणून त्याने कॕसे सुरु केली.
क्रमशः
तृष्णा,घर यात गुंतत चाललेल्या अमोलने परदेशी जाण्याचे रद्द केले….पुढे काय वाचा पुढील भागात
छान कथा
कथा मालिका आवडली
छान लेखन