१०-शलाकाची डायरी
१०-शलाकाची डायरी

१०-शलाकाची डायरी

१०-शलाकाची डायरी
मुले आता त्यांच्या वेगळ्या विश्वात रमायला लागली.मानसचे वेगळे विश्व आधीपासूनच  आहे.
प्रश्न माझाच आहे. मी स्वतःला सशक्त नाही बनवू शकली. एकटेपणा सहन करण्याचे  सामर्थ्य नाही माझ्यात. मला भीती वाटते मानसिक एकांताची.
मला सतत एखाद्या पुरुषाचा आधार लागतो. मी अशी का? गोंधळलेली,अतृप्त.
माझ्या विस्कटलेल्या बालपणात याचे रहस्य असेल का, कि ही माझी लंगडी सबब आहे?
कुठलही नातं टिकवण्यात मला यश आले नाही.
मानसशी नाते मुलांमुळे टिकून आहे.
माझे भावनिक परावलंबित्व समोरच्या माणसाला लक्षात येत नाही.
वरपांगी मी दुःखी व्हावे असे घरात काहीही नव्हते.  मी सुखी आहे का?
बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी हा अट्टाहास आहे का? 
सगळे निरुत्तर प्रश्न.
माझ्या एका मैत्रिणीकडे डाॕ. रिषभची ओळख झाली.
हा माणूस सदा आनंदी. सुखी माणसाचा सदरा मिळाल्यासारखा. त्याच्याकडे बघून देव एवढा आनंद एखाद्या माणसाला कसा काय देऊ शकतो असा प्रश्न  पडतो. डाॕ. रिषभची ओळख झाली.
दोन चार भेटीतच आमच्या तारा जुळायला लागल्या.
रिषभ माझा  चांगला मित्र बनला किंवा मित्रापेक्षा जरा जास्त.
सखा वाटतो तो मला. त्याच्याशी बोलली कि त्याच्यातला उत्साह तो माझ्यातही ओततो.
तो घटस्फोटीत आहे.आश्चर्य  म्हणजे त्याच्या  ज्या स्वभावामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाली त्याच स्वभावामुळे त्याची पत्नी तनूजा त्याला दुरावली. दोघांची एक गोड मुलगी आहे.
ती तनूजाजवळ राहते.
वैभव, मानस, श्रीकांत  आणि  रिषभ माझ्या आयुष्यात आलेले चार पुरुष.
वैभववर मनापासून मी प्रेम केले. पण तो  त्या प्रेमाच्या लायक होता का? कदाचित् नाही.
मानस माझा जन्माचा जोडीदार  सर्वार्थाने लायक.
मला घर, स्थैर्य , मातृत्व  देणारा.त्याच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण होणार असा. पण माझ्या मनाच्या गाभ्यापर्यत  पोहचू न शकणारा. खूपदा स्वप्नात मला वेगळाच मानस दिसायचा.ह्या मानसपेक्षा निराळा.
जीवनातील सर्वच गोष्टींमध्ये रस घेणारा, सदा आनंदी दिसणारा, माझ्यात रमणारा.स्वप्नात तसा मानस बघून खूप आनंदी व्हायची मी. पण वास्तव स्वप्नांच्या आभासी जगापासून खूप  भिन्न आहे. मला स्वप्नात दिसणाऱ्या  मानससारखा हा मानस असता तर….
श्रीकांत माझ्यावर अबोल प्रेम करणारा पण वास्तवतेचे भान राखणारा.
डाॕ.रिषभ सर्वत्र आनंदाची पेरणी करणारा माणूस
माझ्या आयुष्यातही याने आनंदच आणला.
पण  तो किती दिवस माझ्यात गुंतून राहील मला माहित नाही.आमच्या नात्याला काहीही नाव नाही.
माझे मन सतत मृगजळाच्या शोधात भटकत  आहे.
बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली रितेपण कधी भरेल का?
मन स्थिर नाही,समाधानी नाही. तृप्त नाही.
रात्र खूप  झाली. पण शलाकाला झोप येत नव्हती.
मनात ती काहीतरी विचार करत होती.
मला आठवते तेव्हापासून जग किती बदलले.
पण माणसे,त्यांची मने तशीच आहेत. आपल्या गरजा त्याच आहेत. जग बदलले म्हणजे technology पुढे गेली.आपण तर तिथेच आहोत.भावना त्याच आहेत.
बदललेल्या जगात रमतो आपण पण थोडावेळच.
शलाका  विचार करत करतच झोपली.
पहाटे उठून शलाका सूर्योदय बघायला टेरेसवर गेली. त्याच नेहमीच्या पण वेगळेपण सूर्याच्या विविधरंगी छटा न्याहळत राहली.
सकाळची सूर्यकिरणे बघतांना शलाका विचार करत होती,
डायरीत बरेचसे मनात साठलेले उतरले होते.मन आता जरा हलके झाले.
आठवणी बाहेर निघाल्यामुळे आठवणींचे ओझे कमी झाले. आणि तिच्या  डोळ्यातून झरझर आसवे वाहायला लागली. का? कशाचे अश्रु आहेत हे?
मन रिते झाल्यामुळे येताहेत का अश्रु?
कि आयुष्यच रिते आहे माझे?
कि वाळूसारखे हातातून निसटून गेलेल्या क्षणांसाठी आहेत हे अश्रू ?
शलाकाने जरावेळ अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.
हलके वाटल्यावर ती खाली उतरली. काही आठवणींचा पाऊस कोसळून गेल्यामुळे मन मोकळे झाले होते निरभ्र आभाळासारखे.
नाश्ता करतांना सुखदाने विचारले,
आई डायरीत काय काय लिहिले ग? मला  दाखवशील बरं.
मी दाखवू शकेन का सुखदाला ही डायरी?
डायरी वाचून सुखदा काय विचार करेल माझ्याबद्दल?
आणि  मानस? डायरी वाचून  मी त्याच्यासोबत प्रतारणा केली असेच वाटेल त्याला. मलाही खूपदा वाटले मी मानसला फसवतेय पण मी त्या त्या वेळी मनाला आवर नाही घालू शकली.
संयम ठेवण्यात मी कमी पडली कि मला समजून घेण्यात मानस….सगळेच अनुत्तरीत.
मानसला  मला काय हवे हे कधी समजलेच नाही.समजणारही नाही.
मी कुणालाही डायरी दाखवणार नाही.
कधीच नाही.
डायरीतील मी फक्त माझ्यासाठी. माझा मी घेतलेला शोध.ती मी कुणालाही दिसायला नको.
पण माझा मी तरी पूर्ण  शोध घेऊ शकले का? मला काय हवे होते आयुष्यभर ?
सोडून गेलेल्या बाबांचे प्रतिबिंब शोधत राहिली का मी? कित्येक अनुभूतींना मी शब्द देऊ नाही शकले. त्या अनुभूती तशाच आहेत मनाच्या एका कप्प्यात. कित्येक रसरशीत,उग्र, आठवणी मी डायरीतही लिहू शकले नाही.
पण व्यक्त झालेली मी सगळ्यांसाठी नवी असेन हे नक्की. कदाचित् धक्कादायकही.
शलाकाने ती डायरी कपाटात आत  आत दडवून ठेवली…..
समाप्त

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!