११-उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
एकमेकांना दुरावलेले चैतन्य आणि आनंदी भेटतात.प्रेमाचे बंध पुन्हा जुळायला लागतात.पुढे वाचा.
भाग-११
जेवण करता करता गप्पा रंगल्या.मग चैतन्य काय ठरवले? आनंदीने सांगितले मला सगळे. चैतन्य काही बोलला नाही.
जेवण आटोपले.आनंदीला कोणी भेटायला आले म्हणून ती गेली…चैतन्य अनंतरावांना म्हणाला,
काका आपण जरा बाहेर जाऊन बोलू या का?
बरं.
अनंतराव आणि चैतन्य बाहेर येऊन पारसपिंपळाच्या पारावर येऊन बसले.
बोल चैतन्य.चैतन्यचा परत तोच गोंधळ.
सांगू कि नको,
अनंतराव बोलले.बरं आरामात बोल.
तुम्ही बोला काका.
आनंदीने मला तुझ्याबद्दल मागेच सांगितले.
तेव्हापासून तुला शोधण्याचा प्रयत्न केला.
तुझ्या कंपनीत गेलो पण ती नौकरी तू सोडल्याचे कळले. आनंदीने फेसबुक चेक केले पण तू तेही बंद केलेले. फोन नंबर बदलला. इथे कोणी तुझे नातेवाईकही नव्हते त्यामुळे कुठे शोधताच आले नाही तुला.
बरे झाले आनंदीला अचानक भेटलास.वेडी झाली होती ती तुझ्यासाठी.
वेडी?
हो. अरे, मी बाहेर बाहेर राहणारा.तिला आनंदशिवाय घरात कुणी नव्हते. आनंद अचानक गेला. मग तूही गेला, खूप एकटी पडली होती ती.
मनःस्थिती पार बिघडली होती तिची. आईविना वाढलेली पोर.भावूकता जास्त आहे तिच्यात.
मानसोपचारतज्ञाकडे जावे लागले तिला.
आनंद गेल्यावर राजकारणात मी एकटा झालो म्हणून आनंदीला राजकारणात आणले.काही वर्ष माझ्यासाठी ती राहिली राजकारणात.पण तिचा पिंड तो नव्हताच.मला हे उशिरा समजले.
पण ठीक आहे.अजून वेळ गेली नाही. तू सापडला नसता तर मात्र आनंदीचे आयुष्य व्यर्थ गेले असते.वेड्यासारखी तुला शोधायची. आताही तिला मानसोपचारतज्ञाची औषधे सुरु आहेत. तुम्ही दोघांनी मला आधी काही सांगितलेही नाही.नाहीतर मी तुला जाऊच नसते दिले. तुझ्याशिवाय ती कुणाशीही लग्न करायला तयार नव्हती.तुला राजकारणी लोकांचा राग येतो हेही तिने सांगितले मला.पण चैतन्य प्रत्येक क्षेत्रात अपवाद हे असतातच.
आता लवकर लग्न करा.
‘बोल आता. मघाशी काहीतरी सांगायचे म्हणत होतास’.
चैतन्य वाचा गेल्यासारखा चूप झाला होता.
अनंतरावांना काही सांगण्यात अर्थ नाही असे आता त्याला वाटले. खोल दरीत अडकल्याचा भास चैतन्यला झाला.
‘काही नाही काका’असे म्हणून गप्प बसला.
संध्याकाळी अनंतराव,आनंदी,चैतन्य चहा पीत बसले.
मी निघतो आता चहा पिऊन.
अरे आजच आला नि आताच काय निघतोस?
उद्या आनंदीचा वाढदिवस आहे.थांबून जा आजच्या दिवस.
अनंतरावांनी चैतन्यला थांबण्याचा आग्रह केला.
रात्री सगळ्यांची जेवणे झाली. अनंतरावांना लवकर झोपायची सवय होती.ते त्यांच्या खोलीत गेले. चैतन्य आणि आनंदी अंगणात पारसपिंपळाच्या पारावर गप्पा करीत बसले. आनंदी भविष्याची स्वप्ने रंगवत होती.खरेच आधीसारखीच अवखळ,अल्लड आहे आनंदी. सहा,सात वर्ष राजकारणात आहे असे जराही वाटत नाही हिच्याकडे बघून.
चैतन्यही तिच्यासोबत बेभान होत होता. आता त्याच्या उद्याच्या स्वप्नात फक्त आनंदी होती,प्राची दूरदूर कुठेही दिसत नव्हती.
पोर्णिमा होती. निरभ्र आभाळात चांदण्यांसोबत चंद्रही दिमाखात मिरवत होता. चंद्र आणि चांदण्याच्या चंदेरी उजेडात पारसपिंपळही न्हाऊन निघाला होता. त्याचे गुलाबी आणि पिवळी फुले चंद्राच्या शीतल प्रकाशात चमकत होती.
गप्पांच्या मध्ये प्राचीचा फोन आला होता पण आनंदीला संशय येईल म्हणून चैतन्यने उचलला नाही.
बरीच रात्र झाली होती. आनंदीच्या गप्पा संपणाऱ्या नव्हत्या. चैतन्यच बोलला
‘चल,परत जाऊ’.
दोघेही घरात आले.चैतन्य दुसऱ्या दिवशी परत जाणार होता म्हणून आनंदीला चैतन्यशी रात्रभर गप्पा करायच्या होत्या. ती त्याला तिच्या खोलीत घेऊन गेली.
‘चैतन्य तू लग्नाबद्दल काहीच नाही बोलत रे. पण माझे सगळे प्लॕनिंग तयार आहेत.लग्न पारसपिंपळाजवळ करायचे इथपासून ते हनिमूनला कुठे जायचे इथपर्यंत.
माझ्यापासून दूर राहून तू जरा जास्तच अबोल झाला.’
आनंदीची बडबड सुरुच होती.
चैतन्यला आज थांबायला नको होते
असे वाटून गेले.
‘आनंदी मी जातो दुसऱ्या खोलीत झोपायला’
चैतन्य असे बोलला पण त्यालाही आनंदीला सोडवत नव्हते.
आनंदी त्याचा हात पकडून म्हणाली.
‘थांब रे थोडावेळ.’
तिच्या हाताच्या जादूई स्पर्शाने चैतन्याचा आतापर्यंत मनावर ठेवलेला ताबा ढळला.
आनंदीला पुरुषाचा पहिला स्पर्श. त्याच्या स्पर्शाने मोहरुन गेली ती.
रात्र स्पर्शात जागवून पहाटे पहाटे थोडावेळ ते झोपले.
अनंतरावांची खोली खाली होती. सकाळी उठून नेहमीप्रमाणे ते फिरायला गेले.
चैतन्यला जाग आली.आणि भानही आले.बाजूला आनंदी गाढ झोपून होती. किती तृप्त दिसत होती ती. नेहमीपेक्षा अधिकच सुंदर भासत होती आनंदी.
चैतन्य खाली उतरला.अंगणात पारसपिंपळाच्या झाडाजवळ गेला. आता वापस जाऊन प्राचीला सगळे सांगायलाच हवे. काहीतरी निर्णय घ्यायला पाहीजे.आनंदी माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे नक्की.आणि मीही.
प्राचीला सांगू का? ती समजदार आहे. नक्की समजून घेईल मला.
असे विचार डोक्यात यायला लागले.तेवढ्यात प्राचीचा फोन आला.
‘हॕलो चैतन्य, आज येतोस ना परत?’
हो.
‘अरे खूप आनंदाची बातमी द्यायची आहे तुला.
मला पण तुला खूप सांगायचे प्राची परत आल्यानंतर.
तू आल्यावर सांग.
आधी गोड बातमी ऐक.
तू बाबा बनणार आहेस चैतन्य.
कालच टेस्ट केली.दोन महिने झाले’.
चैतन्यच्या हातून फोन पारसपिंपळाच्या पारावर पडला…..
समाप्त
उसवले धागे कसे?….कथामालिका कशी वाटली….अवश्य सांगा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खूप छान कथा मालिका…
छान शेवट
छान कथा मालिका. पण शेवट अनपेक्षित