गुंता स्त्री मनाचा-लग्न सोहळा
आज दिपक सेवानिवृत्त झाला होता. कार्यालयात त्याचा निरोप समारंभ पार पडला. त्याच्या मुलीने मधूने त्याच्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम घरी आयोजित करण्याविषयी माझे मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमाकरिता दुसऱ्या दिवशी जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला आमंत्रण देण्यात आले. योगायोगाने माझी मुले ही आलेली होती. कार्यक्रमाचे छान आयोजन करण्यात आले . कार्यक्रम खूप छान झाला.
जवळच्या मित्रांनी दीपक साठी भेटवस्तू आणल्या होत्या. तसेच त्याच्या कामाचे व ठणठणीत तब्येतीचेही खूप कौतुक झाले. मधु व माझी मुलेसुद्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत करत होते.
कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा फक्त घरची मंडळी उपस्थित होती तेव्हा मधूने विषय मांडला. दीपक व माझे लग्नाचा तो विषय होता. अचानक हे ऐकून जेवढा मला आश्चर्याचा धक्का बसला तेवढाच दिपकही स्तंभित झाला.
मी नाराजीने म्हणाले, मधु काय बोलतेस तू हे ? तिच्या सुरात सूर मिसळून माझी मुलेही, ती बरोबर आहे आणि ते किती आवश्यक आहे हे आम्हाला समजून सांगत होती. जणू काही त्यांनी मिळून एक मताने घेतलेला निर्णय असावा. त्यांचे म्हणणे होते की या वयात एकमेकांना एकमेकांची सुखदुःखे शेअर करायला हक्काचा माणूस हवा असतो. तुमचे पुढील आयुष्य सुखकर होईल .असे आम्हाला वाटल्याने आम्ही आमचा हा विचार मांडला.
तुम्हाला वाईट वाटले असेल तर आम्हाला माफ करा. असे मधु नम्रपणे बोलली. आम्ही चांगले मित्र आहोत पण आम्ही असा विचार कधी केला नाही. त्यामुळे तुम्ही मांडलेल्या विचारावर निर्णय देण्याआधी आम्ही एकमेकांशी चर्चा करून काय ते उद्या सांगतो. असे दिपक म्हणाला. तसे मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले.
मी पाहिलेला दिपक एक प्रेमळ पती आणि जबाबदार पिता होता. त्याने सावित्रीच्या आजारपणात तिची जी देखभाल व सेवा केली त्यावरून त्याच्या विचारांची उंची समजली. त्याचा हा स्वभाव मला अतिशय आवडला. तो एक सुसंस्कृत, सुशिक्षित ,निर्व्यसनी आणि प्रेमळ असा व्यक्ती होता. त्यामुळे मी होकार दिला. त्याचाही नकार नव्हताच.
मुलांनी आमचे नोंदणी विवाह पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करून घरी आलो. दिपकने माझे त्याच्या घरी गुलाबाची फुले देऊन स्वागत केले. दिपक मला म्हणाला,
” आजपासून तुझे नवीन आयुष्य सुरू झाले आहे. मी तुझे नवीन नामकरण करतो. सावित्री कारण तुझ्या नावासोबत तुझा वाईट भूतकाळ तू सोडून माझ्या आयुष्यात यावे अशी माझी इच्छा आहे .मी तुला माझ्या सावित्री चा दर्जा देत आहे.” मला त्याचे हे स्वागत खूप आवडले. असे म्हणतात की एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली तर शेवटही चांगलाच होतो.
मला माझ्या पहिल्या लग्नाची आठवण झाली, ती पाठीवरच्या वायरच्या चाबकाच्या वळाने. टचकन डोळ्यात पाणी आले. ते लगेच टिपून मी दिपक सोबत घरात प्रवेश केला. माझ्या दोन्ही सुना व मधू या जेवणाची तयारी बघण्यासाठी गेल्या. मुले त्यांना मदत करू लागली. घरीच जवळच्या नातेवाईक व मित्रांसाठी जेवणाची पार्टी ठेवली होती.आम्ही दोघे हॉलमध्ये निवांत बसलो.
हा एक आगळा वेगळा लग्न सोहळा होता . याची जीवनात मी कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती. मला तर सगळं स्वप्नवत वाटत होतं. एका नवथर नवरीच्या भावना यावेळी जरी माझ्यात नव्हत्या तरी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ज्या अव्यक्त भावना आजवर दडून बसल्या होत्या त्या आज बाहेर डोकावू पाहत होत्या.
मी घरावर चौफेर नजर फिरवली. दीपक म्हणाला, काय बघतेस. हे तुझेच घर आहे. माझे घर! माझ्या मनात अभिमान दाटून आला. म्हणजे दीपकच्या घरावर माझासुद्धा हक्क असणार आहे.
माझ्या नवऱ्याला तर स्वतःचे घर नव्हते. आमची भाड्याची एकच खोली होती. नंतर त्याने माझ्या आई-वडिलांच्या घरावर ताबा मिळवला तो प्रसंग आठवून मेलेल्या नवऱ्या बद्दल तिरस्कार वाटू लागला. मला नको ते आठवू लागले. माझ्याकडे बघून दिपक म्हणाला , सावी.. मला कार्यालयात तुझ्या नवऱ्याने केलेला तुझा अपमान, शिवीगाळ अजूनही आठवते. तू यापूर्वी जे भोगले ते विसरून जा. नवीन सुरुवात कर. मी तुला शेवट पर्यंत सन्मानाची वागणूक देईन असे वचन देतो. माझ्यावर विश्वास ठेव. मला रडू कोसळले. काय काय भोग भोगले माझे मलाच माहित.
दीपकने जवळ घेऊन माझे सात्वंन केले मला त्याच्या जो आधार वाटला त्याला कशाचीही तोड नाही. या पूर्वी नवऱ्याची अवहेलना ,मारहाण, अपमान सहन केला.
स्त्रीला एवढा सन्मान मिळतो हे प्रथमच मी दिपक कडून अनुभवले. मी स्वतःला नशीबवान समजू लागले. सर्वांनी एकत्र जेवणे केलीत. सर्व घर कसं आनंदाने भरून गेले होते. मुले, मधु खुश होते. एक चौकट आमच्या एक होण्याने पूर्ण झाली.
मी मधु कडे बघितले, ती सतत धावपळ करत होती. किती निरागस आणि गोड मुलगी आहे. आता ही एक जबाबदारी बाकी राहिली. माझ्या मनात विचार आला.
माझ्या मुलांच्या जबाबदारीतून तर मुक्त झाली आहे .मात्र मधूला शेवटपर्यंत आईच्या प्रेमाची उणीव भासू देणार नाही . किती समजदार आहेत मुले.
मधू आणि माझी दोन्ही मुले यांना आपल्या आईवडिलांची किती काळजी होती .त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली. केवळ आम्ही सुखी राहावे म्हणून त्यांनी हे सर्व केले.
देवा.. त्यांना पण सदा सुखी राहू दे रे त्यांच्या आयुष्यात! मनाच्या आतून आशीर्वाद उमटले. आणि नकळत हात जोडले गेले.
समाप्त…
https://marathi.shabdaparna.
प्रिय वाचक कथामालिका कशी वाटली? Comment मधून अवश्य सांगा
तुम्ही शब्दपर्णवर तुमचे लिखाण प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा