तृष्णा
भाग-९
चवथी कॕसेट त्याला खूणवत होती.
झोप येत होती पण थोडावेळ बघतो असे म्हणून त्याने कॕसेट सुरु केली.
तृष्णा दिसली.आज तिने जागा बदलली होती. जिथे अमोल बसला होता.ती पण तिथेच बसून होती.
तृष्णा जरा अस्वस्थ वाटली आज.
खिडकीतून बाहेर बघता बघता बोलायला लागली.
आज आमच्या लग्नाला दोन महिने झाले. सखाला सुट्टी घे म्हंटले पण नाही ऐकले.आज आॕफिसमध्ये खूप कामे आहेत .यायला उशीर होईल. खूप उशीर झाला तर आॕफिसमध्येच थांबणार असे सांगून गेला. ह्या घरात मी एकटी नाही राहू शकत अशा विनवण्या केल्यावर रात्री परत येईल पण उशीर होईल असे बोलून गेला.
कालही त्याने मला नदीवर फिरायला नेले नाही.
पण मीही ठरवले मी एकटीच जात जाईल निर्मलेला भेटायला. इथे आजूबाजूला कोणी राहत नाही.घरातून बाहेर पडली तरी लवकर परत यावे लागेल.
रात्री आईचा फोन आला होता.भेटायला बोलवत आहे.माझ्याशिवाय कधीही एकटी न राहलेली माझी आई मला न बघता कशी राहत असेल.
मला तर इकडे सखा आहे सोबत.माझ्या आयुष्याची नवी सुरूवात आहे ही.पण आई? आता मी गेली की आईला घेऊन येते इकडे.
दोघींनाही एकमेकींची सोबत होईल. आज जाण्याविषयी सखाला बोलावे लागेल.
काल माझी मैत्रीण केतकीचे पत्र आले. चारपाच वर्षात आयुष्यातून हद्दपार झालेल्या चैतन्यचा त्यात उल्लेख आहे.तो कंपनीत चांगल्या पगाराच्या नौकरीवर लागला.
मामाला भेटायला गावी आला होता.केतकीने त्याला माझे लग्न झाल्याचे सांगितले.
सखा चैतन्यसारखा असता तर बहार आली असती आयुष्यात. चैतन्यच्या आयुष्यातही सखासारखीच रुक्ष कोणी आली तर करपून जाईल बिचारा.
आज सख्याच्या आवडीचे जेवण बनवायचे होते मला.पण आम्हाला एकमेकांच्या आवडी तरी कुठे माहित आहेत?
माझ्या आईबाबांसारखे एकरुप आम्ही होऊ कि नाही कधी?
सखा इतका रुक्ष का? सगळ्यांसोबतच हा असा वागत असेल? याचे मित्रही कधी घरी येत नाही.हाही मित्रांकडे जात नाही.
एकलकोंडा आहे हा .एकटा स्वतःच्याच कोषात गुरफटलेला. ह्या सुरवंटाचे फुलपाखरात कसे रुपांतर होईल….
आज माझा मुड बिघडलेलाच आहे.आईची आठवण येत आहे.बाबांची पण.
अमोलला सतत खरीखुरी तृष्णा जवळ बसून असल्याचा भास होत होता.
त्याच्या लॕपटाॕपचे चार्जिग संपले. चार्ज करायला हाॕलमध्ये जावे लागले असते.त्याने लॕपटाॕप बंद केला.बेडवर झोप येण्याची वाट बघत पहूडला.
शुटींगमधले आणि आताचे एकच घर पण तेव्हाचे घर किती छान दिसत आहे.तृष्णाचा नवीन संसार किती हौसेने मांडला असेल तिने.
पण पूढे काय झाले असेल तिचे?
कुठे असेल ती आणि तिचा सखा? त्यांची मुले आणि तो चैतन्य?
त्यांच्या तेव्हाच्या आयुष्याचा साक्षीदार बनलेला मी. आता त्यांच्यापैकी कुणाबद्दल काहीही माहित नाही मला.
तृष्णाला शोधावे का?कसे?
विचार करत करत अमोल झोपला.
आयुष्यात काय कधी बदलेल सांगता येत नाही.मुंबईत राहणारा अमोल इथे येतो ,अचानक तृष्णेच्या आयुष्याशी जोडल्या जातो.
यालाच योगायोग म्हणत असावेत.
पहाटे झोपेत असतांनाच त्याला आईचा फोन आला. अमोल ,उठला नाही बेटा. नऊ वाजले.
उठलो,उठलो आई.
का ग सकाळीच फोन?
सहजच रे बाळा.
किती दिवस थांबणार अजून.ये परत.वाटले तर अजून जा.
आई अग मी जंगलात आहो का? इथे मन रमतयं माझे म्हणून दोनतीन दिवस थांबायचा विचार करतोय.
आई,तू पण ये अमोलीला घेऊन.मस्त वातावरण आहे इथले.
बरं.बघू जमले तर. काळजी घे.
असे म्हणत आईने फोन ठेवला.
काय म्हणतो ग अमोल?
मि,जाधवांनी विचारले.
दोन तीन दिवसांनी येतो म्हणाला.
अग, तू आग्रह करायचा लवकर येण्यासाठी.
त्याची इथली कामे पण पूर्ण करायची आहेत.व्हिसा बनवायचा आहे.अॕडमिशनची प्रोसिजर अपूर्ण आहे.
याला काही काळजी आहे कि नाही.
येईल हो.दोन तीन दिवसात.तुम्ही नका काळजी करु.
मधूराने मि.जाधवांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे बघून म्हंटले.
अमोल उठला आणि रुमच्या बाहेर आला.विजय उठून त्याच्या धंद्यावर जाण्यासाठी तयार झाला होता.
अमोलकडे वळून म्हणाला
साहेब एक वाजेपर्यंत येईल मी.येतांना जेवणाचा डब्बा घेऊन येईल.असे म्हणत विजय निघून गेला.
विजय आजपासून इथे स्वयंपाक करु बरं आपण
साहेब कशाला? दोनतीन दिवसात तुम्ही जाणार. दोन तीन दिवसासांठी कशाला खटाटोप?
बघू या तर.मी कधी स्वयंपाक केलेला नाही.
साहेब भांड्यांपासून सगळे घ्यावे लागेल.
चालेल.
अमोलने लॕपटाॕप चार्जिंगला लावला.
अंगणात आला. अंगणात फुलांची झाडे लावायला हवी.
तृष्णाची इथे बाग फुलवण्याची इच्छा पूर्ण झाली असेल का? बाजूच्या घरचे काका दिसले त्याला.त्याच्याकडेच येत होते.
अमोल,तुझ्या बाबांशी बोलणे झाले होते.बाबा बोलले असतील तुझ्यासोबत.
हो काका. सांगतो मी दोन तीन दिवसात.
बरं सांग लवकर.मलाही पैशांची तजवीज करावी लागेल.
हो काका.
काका,इथे नर्सरी कुठे आहे?
नदीकडे जातांना डाव्या हातावर दिसेल बघ.तुला कशाला हवी आहे?
मोगऱ्याचे रोप लावायचे आहे इथे.
घर विकत आहेस नं.
बघतो,सांगतो काका.अमोल जरा चिडला होता आता.
काका आश्चर्य करत निघून गेले.
अमोल नदीकडे निघाला.
डावीकडे बघत नर्सरीचा शोध घेत पुढे चालत राहला.
नर्सरी दिसली पण फक्त रोपे होती.
अकरा वाजता विकणारा मनुष्य येणार अशी पाटी लावून होती.
इकडे आलोच तर तृष्णाच्या आवडत्या निर्मलेला भेट द्यावी.तसेही आजवर तिचे संध्याकाळचेच रुप बघितले.आज सकाळचे बघायला मिळेल.
असा विचार करुन अमोल नदीकडे निघाला.
संध्याकाळी शांत आणि जरा मलूल वाटणारी निर्मला सकाळी मात्र उत्साही दिसत होती.एखाद्या नवयौवनेसारखी अल्लड,अवखळ भासत होती.
किती वर्षापूर्वीपासून वाहत असेल ही अशी अविरत.
निसर्गाला आपल्यासारखे वय नसते.नेहमी तो तरुण असतो.आपल्यासारखे म्हातारपण त्याला येत नाही.ही निर्मलाही अशीच राहणार.अवखळ,तरुण.
पण आपल्या विचारांचे प्रतिबिंब तिच्यात पडते.संध्याकाळच्या कातरवेळी आपण जरा उदास असतो म्हणून नदीही उदास भासते.आता सकाळी सगळे उत्साहात म्हणून नदीही उत्साही वाटत असेल.
अमोलचे विचारचक्र सुरु होते,त्याच्या डोक्यात
क्रमशः
अमोलसारखेच वाचकही गुंतत चाललेल्या कथामालिका तृष्णेचा पुढील भाग नक्की वाचा.
छान अप्रतिम लेखन
Khup chhan