अभंग निरूपण -रंगा येई वो ये -संतोष जगताप.
अभंग निरूपण -रंगा येई वो ये -संतोष जगताप.

अभंग निरूपण -रंगा येई वो ये -संतोष जगताप.

अभंग निरूपण -रंगा येई वो ये

 

कृष्ण हा प्रेमस्वरूप आहे तर विठ्ठल भक्तीस्वरूप आहे. तत्त्व एकच आहे परंतु प्रवाहाच्या दोन धारा आहेत. तुम्ही त्या प्रवाहाच्या कोणत्याही धारेत लागा, तुम्ही भवापार आलेच म्हणून समजा. भगवंताला आपण ज्या स्वरूपात पाहण्याची इच्छा व्यक्त करतो तो त्या स्वरूपात, त्या क्षणी अवतरीत होतो.

मी अगोदरच्या निरूपणात देखील सांगितले आहे की, माऊलींचा भगवंतप्रति असलेला दृष्टिकोन हा अतिशय मायस आहे. कणवेचा आहे. माऊली त्या निर्गुण तत्वाला कधीच बोजड शब्दात मांडत नाहीत. मी आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगात माऊलींनी कृष्णाला आणि विठ्ठलाला थेट मातृस्थानी बसवले आहे. आईची उपमा दिली आहे.

ह्या अभंगातील गोडवा आपल्याला अभंग ऐकता ऐकताच विविध रंगांची उधळण झाल्याचा भास करवतो. स्वरांचे आलाप ऐकवतो. ह्या अभंगात अमृतात भिजून आलेले ते गोडव्याचे बोल अगदी नजरेत पापण्यांवर तोलून धरावेत इतके मखमली आणि मुलायम आहेत. आईला कोणत्याही नावाने संबोधित करा; ती आई वात्सल्याची देवताच वाटते. ते अनादी तत्व इंद्रधनूला सप्तरंग माखणारे आहे म्हणूनच त्या तत्त्वाचा उल्लेखच माउलींनी सदर अभंगात ‘ रंगा ‘ असा केला आहे.

तर असा हा नितांतसुंदर अभंग आज निरूपणासाठी घेत आहे. अभंगाची पहिली ओळ आहे, ‘ रंगा येई वो ये.’

रंगा येई वो ये

‘ मुक्ताई sss ‘ मी दिलेली हाक मुक्ताईच्या कानापर्यंत पोहोचली नसावी. फुले वेचता वेचता ती शिवारात दूरवर गेली असावी. म्हणून मी परत एकदा हाक मारली तर तिची देखील प्रतिसादाची हाळी आली. आणि ती माझी ताई लगोलग दुडूदुडू धावत आली. इवल्याशा परकराच्या ओच्यात कितीतरी रंग-बिरंगी फुलं तिने आणली होती.

धावत आल्यामुळे तिला थोडीशी धाप देखील लागली होती तरीदेखील तिच्या चेहऱ्यावर पहाटेचा प्रसन्न हसू होतं ते चेहऱ्यावरचं स्मित कायम ठेवत तिने वेचून आणलेली ती फुले माझ्या पुढे टाकली आणि परकर झटकून दोन्ही हात कटेवर ठेवत विठुरायासारखी उभी राहिली. केवढीशी ही चिमुरडी! पण किती जीव लावते! धावत आल्यामुळे तिचे केस वाऱ्याने विस्कटले होते. मी ते केस हलकेच नीट केले. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ बसवले.

तिने आणलेली फुलं मी ओंजळीत घेतली आणि बाजूलाच देव्हाऱ्यात असलेल्या विठुरायाच्या चरणांवर अर्पण केली. हात जोडले. तसेच माझे पाहून तिने देखील हात जोडले. आणि नकळतच मला सहज म्हणाली,
” ज्ञाना, देवबाप्पा असतो का रे?”

” हो मग! असतो ना!”

” कुठं? ह्या विठ्ठलाच्या मूर्तीत?”

” हो ग माझे चिमुरडे! तो मूर्तीत आहे तसाच सगळीकडे आहे. ”

” मग तो सगळीकडे दिसत का नाही? ” तिने थोडे सावरून बसत प्रश्न केला.

” दिसेल हां, आमच्या तायडीला देखील लवकरच दिसेल.”

” जा गडे, तू चेष्टा करतो आहेस माझी दादा. मी काही अगदीच लहान नाही बरं आता! सगळं कळतं मला.”

” काय कळतं सांग बरं. मला देखील ऐकायचं आहे की, आमच्या ताईला काय काय समजते ते!”

” हे बघ, तुझा देवबाप्पा नसतोच मुळी. आपल्याला कुठे आपले मायबाप दिसतात. तसाच तो देखील दिसणार नाहीच.”

तिच्या त्या उत्तराने क्षणभर व्याकुळ झालो मी पण लगेच सावरत तिला सांगितले,
” हा विठ्ठलच आपला बाप आणि आपली आई आहे. ही रखुमाई आपली आई आहे.”

” खरंच दादा! त्यांचं गाव कुठे आहे? आपण तिथं का राहत नाही. अरे, कुणाची आई बघितली ना, की मला देखील वाटतं की आपल्याला आई असावी.”

” अगं वेडे! आपला विठ्ठलच आपली विठाई आहे. ”

मुक्ताईचे डोळे लकाकले तिच्या डोळ्यांत उत्सुकतेची चमक दिसायला लागली. ती अगदी देवघरापाशी येऊन बसली मांडी घालून. दोन्ही कोपरे मांडीवर टेकवत आणि तळहात गालांना टेकवत माझ्याकडे टकामका बघायला लागली. आणि तिने विचारलं देखील.

” विठाई म्हणजेच आई का रे? ”

” होय ग माझे ताई. तू लहान आहेस. सर्व सांगितलेले तुझ्या लक्षात येणार नाही परंतु तुला समजेल असे सांगतो. तू आणलेल्या फुलांना बघ कित्ती सारे रंग आहेत ना ! आपला देवबाप्पादेखील अगदी तसाच विविध रंगांचा, विविध रूपाचा असतो.

तो कधी दिसतो तर कधी अदृश्य असतो. तो कान्हा असतो त्यावेळी कान्हाई होतो तर विठ्ठल रूपात असतो त्यावेळेस विठाई होतो. आपल्याला आईच्या भरपाई करून देण्यासाठी तो बघ आज मी तुझ्यासाठी एक छानशी अभंगाची लय तुला ऐकवतो. ऐक…

रंगा येई वो ये, रंगा येई वो ये
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई “

” कित्ती गोड ना रे दाद्या! आई दिसत नसली तरीही आईला आपण किती वेगळ्या नावाने हाक मारू शकतो, नाही? ”

” होय अगदीच. ”

” पण मला एकदा बघायचे आहे रे ते गाव..तुला माहित आहे ते कुठे आहे ते!”

” होय त्याला वैकुंठ म्हणतात. आपली माऊली वैकुंठवासिनी आहे. आणि हे बघ मुक्ताई, ती केवळ आपलीच आई नाही तर अवघ्या विश्वाची आई आहे बरं. जगतजननी आहे ती. ”

” केवळ तशी नाही रे… मला अगदी जवळ घेणारी, कुशीत झोपवणारी, तिच्या हाताने मला खाऊ घालणारी, माझे लाड करणारी अगदी अशी आई हवी आहे. तशी आहे का ती? ”

” अगं वेडाबाई, ती विश्वाची माऊली प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. देह रूपात प्रत्येकाजवळ सर्वकाळ राहीलच असे नाही. … आणि तुझ्यासाठी मी आहे ना! मी तुझे सर्व काही करतोच आहे ना. अगदी आईसारखेच लाड करेन ग यापुढे देखील तुझे!”

माझ्या त्या बोलण्याने मुक्ताई भारावून गेली आणि लगेच उठून माझ्या गळ्यात पडली. तिची आणि माझी आसवे गालांवरून ओघळू लागली. तो वात्सल्याचा अपूर्व सोहळा देवघरातील विठुराया डोळे मिटून पाहत होता.
मी मुक्ताईच्या पाठीवर कुरवाळत विठाईकडे पाहत तिला एकच आवर्जून मागणी केली की,” माझ्यातील मायस भाव हा माझ्या मुक्ताईसाठी कधीही अपुरा पडू नये एवढेच एक दान दे.”

वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी
तुझा वेधू माझे मनी, रंगा येई वो ये

मुक्ताईच्या मनातील कढ आवरले आणि ती बाजूला होत म्हणाली,
” आणि मूर्तीत आहे तसा देखील तो असतो का? ”

” आपल्याला जसे रूप आवडते त्या रूपात तो दिसतो बरं. आणि विटेवर उभा असलेला तो पंढरीचा राणा अवघ्या वैष्णवांना अशाच स्वरूपात आवडतो.”

” तो तसा कुठे आहे मग? ”
तिची प्रश्नांची सरबत्ती काही संपता संपेना.

” होय आहे, आपल्या पंढरपुरात!”

” तू पहिला आहेस?”

” होय. अगदी डोळे भरून पाहिला आहे. ”

” खरंच! मला देखील पाहायचे आहे त्याला. आपण जाऊया का तिथे?”

” आपण नको जायला मी बोलावले की तो येतो लगेच.”

” चल बोलाव, लगेच आत्ताच.”

तिच्या हट्टापुढे हात टेकले. मंद स्मित केले. आणि पुढची ओवी स्मरली. माझ्या विठुरायाला आवाहन केले. देवघरातील ते सगुण सावळे रूप पंढरीच्या विटेवरी थेट मुक्ताईसाठी बोलावले.

कटी कर विराजित, मुगूट रत्न जडित
पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत

अगदी क्षणभराचा अवकाश! तो प्रकटला साक्षात! सोबत त्याची रखुमाई. ती विश्वाची स्वामिनी आणि जगतजननी केवळ माझ्या हाकेवर माझ्या मुक्ताईच्या आग्रहावरून एका क्षणात अवतरीत होतील असे वाटले नव्हते परंतु माझी काळजापासून गेलेली हाक पोहोचली होती.

मुक्ताईला ओळख पटायला उशीर लागला नाही ती लगेच रखुमाईच्या कुशीत विसावली. रखुमाईने तिला उचलून कडेवर घेतले. तिचे पटापट पापे घेतले. माय लेकरापाशी पोहोचली होती. तिच्यासाठी तर विठुरायाने तर खूप काही खाऊ आणला होता.

मग आम्ही खूप खूप बोललो. भरपूर गप्पा केल्या.
निघताना मुक्ताईला त्याने सांगितले की” तुला जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा सहजच ‘आई’ अशी हाक मार मी जवळच असेन.”

तो रंगा असाच आहे. तो कान्हा रुपात अवतरला होता. त्यावेळेस गोकुळमय झाला होता. तेथील गाई वासरांचा राखणदार झाला होता. यशोदेचा तान्हा झाला होता. राधेचा प्रियकर झाला होता. तोच तेथील दहीदुधामध्ये कालवल्या गेला होता. तोच बासरीचे स्वर चहूकडे पसरवत आसमंत स्वरमय करणारा भुलभुलय्या झाला होता. आणि आता माझ्या मुक्ताईला आई स्वरूपाची ओढ लागली होती तर लागलीच त्या स्वरूपात अवतरला.

विश्र्वरुप विश्र्वंभरे, कमळ नयनें कमळाकरे वो
तुझे ध्यान लागो, बाप रखुमादेवीवरे वो.

विठाई रखुमाईंनी आमचा निरोप घेतला. जाताना दोघांना कुरवाळले. तोंडभरून आशीर्वाद दिला. आणि निघून गेले. मुक्ताई खूप आनंदून गेली त्या भेटीने.

” मुक्ताई बघ, असे हे रंगांचे सोहळे आणि त्या रंगाचा प्रत्येक युगात रंगलेला उत्सव हा वैष्णवांसाठी भक्तीची पर्वणी घेऊन येणारा असतो. प्रेमाची अमृतधारा घेऊन येणारा असतो.”

” होय दादा, तू खूप गोड आहेस रे माझा अवघा हट्ट पुरवतोस. आता मी नेहमी रोज अशीच तुला फुले आणून देणार आहे. तू असेच निरनिराळे अभंग मला वाचून दाखवायचे समजावून सांगायचे. आणि मला लिहायला देखील शिकवायचे बरं!”

” होय मग! अगदी नक्कीच शिकवीन.”

एवढे सांगताच ती स्वतःभोवती गिरक्या मारायला लागली. आनंदाने बेभान झाली होती ती. स्वतःची चूक खेळता-खेळता माझी मुक्ताई दुडक्या चालीने हात हवेत उडवत, डोलवत घराबाहेर पडली. मी तिच्याकडे एकटक नजरेने कौतुकाने पाहत होतो.

संतोष जगताप.

रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!