शब्द-word

शब्द
शब्द-word
पृथ्वीवर मनुष्य आल्यानंतर खूप उशिरा आले पण आता शब्दांशिवाय आपण ?
छे, विचारच नाही करु शकत.
शब्द
नानाविध,सर्व  भावनांसाठी वेगवेगळे.
त्यांच्यातही जाती,धर्म,देश,प्रांत असा भेद.
शब्द वेगवेगळे पण अर्थ तोच.
एकाच अर्थाचे खूप शब्द
शब्दाविन कसे असेल आधीचे जग?
अबोल,मुके
शब्दाने मोहरणे नाही,दुखावणे नाही,रुसणे नाही,फुलणे नाही,राग नाही,लोभ नाही
किती भावना आतमध्येच कोंडलेल्या.
शब्द 
नसले तर
शब्दांचे आसुड नाही,
मनावर चरे पडणे नाही,
रात्रीची झोप उडणे नाही.
शब्द
नसले तर
कविता नाही,
कवितेची होणारी गाणी नाही,
गाण्याला चाल नाही,
जीवनाला लय नाही,
गती नाही.
शब्द
नसले तर
”अरे, तेव्हा तो शब्द उगाच उच्चारला मी”
असा पश्चाताप नाही.
किंवा  
“याच शब्दात उत्तर द्यायला हवे होते” 
ही खदखद नाही. 
“तेव्हा या शब्दात बोललो नसतो तर ही वेळ आली नसती “
ही खंत नाही.
“हे शब्दच बोललो नसतो तर आमचे नाते गढूळले नसते”
हे दुःख नाही.
शब्द
हा रागीट,हा प्रेमळ,हा उद्धट,हा सालस…..ही विशेषणे आपण  वापरलेल्या  शब्दावरुनच  कायमची चिकटतात आपल्याला.
आपल्या व्यक्तीमत्वाची पारख आपल्या शब्दातूनच  होते
शब्द
‘मी पोहचलो ‘ बायकोच्या जीवाची घालमेल कमी करणारे
‘आई मी ठीक आहे ग’ आईची काळजी कमी करणारे ‘मी वाट बघेन ‘सुखावणारे,
‘मला विसरुन जा’  कोलमडून टाकणारे,
‘आपण जिंकलो’ चैतन्याने भारुन टाकणारे,
‘तुला तर काही जमतच नाही’ आत्मविश्वास घालवणारे.
शब्द
शब्दांचे मोल ज्यांना बोलता येत नाही,
ज्यांना ते ऐकू येत नाही त्यांच्यासाठी.
किती ताकद आहे एकेका अक्षरांनी जोडलेल्या शब्दांमध्ये.
अक्षरांच्या काना,मात्रा बदलल्या कि अनर्थ करणारे.
काही शब्द सुंदर  तर काही शब्द कुरुप.
शब्द मान 
शब्द  अपमान
शब्द सौंदर्य
शब्द कुरुपता
शब्द उमेद
शब्द नाउमेद 
शब्द बोलके
शब्द मुकेही
शब्द आनंद 
शब्द दुःख  
शब्द व्यक्त
शब्द अव्यक्त
शब्द अंधारी रात्र
शब्द सोनेरी पहाटही
शब्द आशावादी
शब्द निराशावादीही
शब्द सुरांचा झंकार
शब्द आसवांचा हुंकारही
 शब्दातच सर्व काही.
मग शब्दांपलीकडे ? ? ? ? ? ?
 
 
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!