निरुपण-घनु वाजे घुण घुणा Ghanu vaje
निरुपण-घनु वाजे घुण घुणा Ghanu vaje

निरुपण-घनु वाजे घुण घुणा Ghanu vaje

निरुपण-घनु वाजे घुण घुणा Ghanu vaje

आज निरुपणाचा चौथा भाग सादर करत आहे माऊलींच्या अभंगांना लालित्यपूर्ण भाषेत निरुपणाच्या परिवेशात सादर करताना अतिशय आनंद आणि सुखद अनुभूती होत आहे. माझ्या हातून असे काही लिहिले जाईल याची यत्किंचितही कल्पना नव्हती परंतु ही सर्वकाही माऊलीची कृपा आहे.

मागील तीनही भाग आपण सर्व वाचकांनी अतिशय तन्मयतेने वाचले आणि त्यावर भरभरून प्रतिक्रिया देखील दिल्या त्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे. लेकराच्या बोबड्या बोलांचे आईने कौतुक करावे, त्याला जोजवावे त्यासारखा हा कौतुकसोहळा आहे आणि त्या सोहळ्याचे भारावलेपण मी अनुभवत आहे.

ईश्‍वराशी एकरूप झालेले मन हे त्याच्यापासून विभक्त राहू शकत नाही त्याचा थोडासा देखील विरह हा मनाला सैरभैर करतो, मन सदैव त्याच्याच आठवणीत रमते. आजच्या प्रस्तुत निरूपणात राधा कृष्णाच्या विरहाने व्याकूळ झाली आहे सातत्याने त्याची आठवण काढत आहे तिला कृष्णा वाचून कोणताही जीवनाशी निगडित संदर्भ भावत नाही, रमवत नाही. केवळ आणि केवळ जिवलग जवळ असावा ही तिची भावना सदर अभंगातून व्यक्त झाली आहे.

राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव. राधात्म म्हणजे साक्षात तादात्म्य. राधा म्हणजे स्वरांची अनाहत धारा. राधा म्हणजे प्रवाह, भक्तीचा वाहणारा खळाळता झरा. मन सदोतीत कृष्णाच्या स्मरणात डुबलेले रहावे ही आस मनात घेऊन वावरणारी राधा आपल्याला ह्या निरूपणात दिसेल. )

घनु वाजे घुण घुणा
कान्हा द्वारकेस गेला आणि मला विसरला तो विसरलाच शेवटी. साहजिकच आहे. मी कोण लागते त्याची? का त्याने माझी आठवण काढावी? मीच एक वेडी आहे सदानकदा त्याच्या स्मरणात असते. हे वेडावलेलं मन दुसरीकडे लागत देखील नाही ना! गाई वासरात गेले तेथे तोच दिसतो. देवघरापाशी बसले तेथेही तोच जाणवतो. रांधायला बसले की तो जवळ येऊन बसतो.

शिवारात गेले की तो की साक्षात उभा असलेला दिसतो. वाऱ्यावर लहरताना जाणवतो. एवढेच काय निळ्या आभाळात देखील त्याचे सावळे रूप उमटते. असा जादूगर आहे तो!

घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का?

वैशाख ज्येष्ठाची होरपळ मागे पडली. किंबहुना अंगावर काढली. पण आता घन भरून यायला लागलेत. गोकुळाच्या आभाळात दाटी करायला लागलेत. त्यांची घणाणणारी साद कानातून मनापर्यंत पोहोचत आहे. ती साद त्याच्यापर्यंत देखील पोहोचत असेल काय? वाऱ्याचे शितल झोत त्याचा शेला लरहरवत येतात. अंगावर पसरवतात अवघा देह कृष्ण कृष्ण होतो, हेच त्याला कसे कळणार?

तळपणारी आशनिका कधी त्या ढगाला छेदेल आणि जलधारा बरसायला कधी सुरुवात होईल सांगता येणार नाही. मग त्या घनाने देखील कोणासाठी बरसावे आणि मीदेखील कुणासाठी चिंब भिजावे? जिथे कान्हा नाही तिथे तृप्त करणाऱ्या जलधारांच्या पान्हा येऊन काय उपयोग?

हे कान्हा, अरे, तुझ्याविना हे आषाढलेले मनदेखील रिते आहे. पावसात निघायला तुझी राधा भिते आहे. यमुना काठोकाठ भरेल, आणि लगोलग वाहेल डोळ्यांवाटे… आता केवळ आणि केवळ एकच इलाज आहे एकच मार्ग आहे फक्त तू यावास.

चान्दु वो चान्द्णे चापे वो चन्दने
देवकीनंदनेवीण नावडे वो

मग हळूहळू तो बरसणारा ऋतू कृष्णविनाच रिता झाला तो वनमाळी आलाच नाही. ऋतू बदलला. पुनवेचे चांदणे अवकाशात पसरायला लागले, नक्षत्र दिसायला लागले, चांदणे खळखळून हसायला लागले पण रुची वाटेना, मनाला भावेना. अगदी अंगणातला रोज घमघमणारा जाणवायला लागला. त्याचा चंदनासारखा सुवास अपरिचित वाटायला लागला.

मी हे कोणाला सांगायला गेले तर लोक वेड्यात काढतील. आधीच तर ‘ही राधा कृष्णापायी बावरी झाली आहे’ असे सारेच म्हणतात, आणि सांगायला गेले तर चक्क वेड्यात काढतील. हे सारे मनाचे आभास म्हणावेत की कृष्णावरची एकरुप मनोवृत्ती म्हणावी? परंतु एवढे मात्र खरे की सारे काही त्याच्या विना सुने सुने लागत आहे त्याने एकदा तरी यायला हवे.

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का

गारठ्याचे दिवस संपले. उकाडा सुरू झाला. अंगाची लाहीलाही व्हायला लागली. कालिंदीच्या डोहात बसले तरी देह शीतल होईना. मनाचा दाह शमेना. अरे कान्हा काय काय उपाय केले म्हणून सांगू? झाडाखाली बसले की पाखरे येऊन त्यांच्या पंखांनी वारा घालायचे, तू देऊन गेलेला पावा ओठी लावावा तर त्याचे स्वर भोवती रुंजी घालायचे,

अगदी चंदनाचा लेप जरी अंगाला लावला तरी ती होरपळ कमी होईना. आणि अंतर्मन सांगायला लागले की यावर केवळ त्या जगदीशाकडेच उपाय आहे. तळमळणार्‍या जीवाला केवळ त्याच्या अमृताचे स्नानच उत्तर आहे. त्याला कोणी सांगावा पाठवेल का? त्याला माझी तळमळ कोणी कळवेल का?

दर्पणी पहात रूप न दिसे वो आपले
बापरखुमादेवीवरे मज ऐसे केले

तो येईल किंबहुना त्याने यावे म्हणून रोज नटून-थटून कालिंदीच्या काठावर जाऊन बसणारी ही राधा निराकार होत आहे. त्याचे प्रत्यंतर निशिदिनी येत आहे. जेव्हा नटण्या मुरडण्यासाठी दर्पणात मुख पहावे त्यावेळी आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. त्या दर्पणात देखील केवळ आणि केवळ तोच निळासावळा प्रतिबिंबित होतो.

आता हा मनाचा वेडेपणा म्हणावा की ही त्या सगुण सावळ्याची कृपा म्हणावी हेच आकळत नाही. पण

राहून राहून मन असे सांगते की ही कृपाच असावी. हे वेळ फार भाग्याने लाभात असावे आणि मी त्या भाग्यवतांपैकी एक आहे असे मानते. तो येईल न येईल ती त्याची मर्जी!
आता जगणे आणि स्मरणे हे श्वास घेण्या आणि सोडण्याइतके सहज झाले आहे. पण ते रूप डोळे मिटण्याआधी एकदातरी दिसावे. मग त्याचा पावा त्याच सुपूर्द करेल त्याचा देह त्याला अर्पण करेल. जीव शिवात मिसळेल. अवघा रंग एक होईल. गोरी राधा निळी सावळी होईल. असे एकदा तरी व्हावे आणि हे विठुराया,त्याने त्यासाठी एकदा तरी यावे.

रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
© संतोष जगताप.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!