शेतकरी कविता
शेतकरी कविता

शेतकरी कविता

  • उध्वस्त

    शेतकरी कविता

    धारेत अमृताच्या, भिजली धरा ही हिरवी
    स्वप्न पाहण्या सुखाचे, ठेविली काळी पोत गिरवी…

    आलास एकदाचा, पाहून वाट नेत्र थकले
    दोनदा पेरणीसाठी, बायकोचे जोडवेही विकले…

    घे थोडासा विसावा, घडीभर इथे आडोसा
    तुझ्या आगमनाच्या आनंदात, जगण्याचा नाही भरोसा…

    येतो असा कसा तु,सगळा हाहाकार उडाला
    वैरण आणता गुराला, पुरात शेतकरी बुडाला…

    उध्वस्त गावं सारा, गाभाऱ्यातील देवही हरपला
    शोधू कुठं देवा तुला, मनातला भाव ही करपला…

    सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते )

     

    पाऊस कविता

    मंदिराच्या गाभाऱ्यातला देव हरपला
    देवा कुठं शोधू रं तुला भाव हरपला…

    तुझ्या पायरीला आलं, पुराचं गा पाणी
    कसा सोडवशील आता गावाची गाऱ्हाणी…

    वेढलं सार गावं, पावसानं थैमान घातलं
    हिरवं सपान डोळ्याआड, मातीतच थिजल…

    पावसाचा एक एक थेंब डोळ्यात उतरला
    गुडघ्याभर चिखलात, बाप माझा रुतला…

    काकडल्या गोठ्यातून पांजणाऱ्या गाई
    घरट्यात उपाशीच चिमुकली चिऊताई…

    केवढा हा आकांत तुझा, काळी आई खरडली
    कसली तुझी प्रीती, लेकरं सरणावर निजली…

    कोसळली दरडी,किती लोक चिरडली
    प्रलयंकारी विनाशात, भक्तजन ही भरडली…

    एकदाच सारी सृष्टी घेऊन चल नं तुझ्या दारी
    खांदा द्यायची कोणावरही येऊ नये आता बारी…

    सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)

    आतुरता पावसाची

    भेगाळली भुई सारी
    वाट धूळ धूळ झाली
    पाय पोळती उन्हात
    पक्षी शोधती सावली…

    पानझड झाली रानी
    झाड झाड नागविली
    उभ पेटलं शिवार
    होई अंगाची काहिली…

    आतुरता पावसाची
    रानभर पसरली
    नभ दाटले अंबरी
    मोरपीस पिसारली…

    आला पहिला पाऊस
    बळीराजा सुखावला
    धरतीच्या गर्भातला
    जाळ थोडासा शमला..

    मृग नक्षत्री पाऊस
    पेरणीची झाली घाई
    बीज विसावे मातीत
    निर्मितीची नवलाई…

    शांत झाली एकाएकी
    पेटलेली तगमग
    कास्तकरी बळीराजा
    पेरणीची लगबग….

    सौ.राजश्री म. हिमगिरे(विभुते)

    नकोच दुर्दशा पोशिंद्यांची

    रानोमाळी राबराबतो हा
    अन्नदाता कष्ट उपसोनी,
    दिनरात ससेमिरा मागे
    जाई दिसागणिक खंगोनी

    करुनि सदोदित अन्याय
    नसेच कुणाला तमा याची,

    किंमत कवडी मातीमोल
    करिती दुर्दशा पोशिंद्याची

    दररोज मरे हा पोशिंदा
    जाण नसे कुनाला कष्टाची,
    करितो काळजी बळीराजा
    पिकवून धान्य भाकरीची

    धडपडत शेतकरी हा
    देतोय कष्टातूनी भाकर,
    खरंच, याच्या मेहनतीची
    करावी थोडीशी कदर

    होईल खच्चीकरण त्याचे
    सदोदित अशा अन्यायाने,
    आत्मविश्वास वाढवण्यास
    मदत करा माणुसकीने

    नको नको ती आर्त किंकाळी
    आत्महत्याग्रस्त पोशिंद्याची,
    करूनि खरेदी फळे भाज्या
    घेऊ काळजी बळीराजाची

    होऊनि एक करु निर्धार
    बळीराजाला या जगवू या,
    मिळुनी आता आपण सारे
    अन्नदात्याला नक्की तारू या

    सौ.पद्मजा जोशी

     

    रुसू नगं रं पावसा

    आरं, पावसा पावसा
    असा कसा रं लपला तू
    मिरग बी गेला सरून
    कुठं दडून बसला तू …..

    आरं, पावसा पावसा
    भेगाळली धरणी माय,
    तहानलेली अवनी सारी
    डोळं लाऊन वाट पाह्य ….

    आरं, पावसा पावसा
    रुसू नग औंदा राजा,
    टोबलेलं बी महागडं
    त्याले कशापायी सजा …..

    आरं, पावसा पावसा
    वसाड पडली समदी रान,
    बळीराजाची रं असे
    सारी आन बाण शान ….

    आरं, पावसा पावसा
    बघू नको इतुका अंत,
    पोशिंद्याच्या घरी व्हईल
    रोजी रोटीची रं भ्रांत …..

    आरं, पावसा पावसा
    भरीव शाळा आकाशात,
    कोसळू दे सरीवर सरी
    बळीराजाच्या वावरात

    आरं, पावसा पावसा
    तुझी किरपा होऊ दे,
    बळीराजा च्या मनातलं
    पळून नैराश्य जाऊ दे

    आरं, पावसा पावसा
    बगता बगता
    आखाडी बी सरली,
    आता हाती नाही काही
    फकस्त तुझ्या बरसण्याची
    आशा उरली

    आरं, पावसा पावसा
    घातलं विठुला साकडं,
    बरंस आता रानोमाळी
    बळीराजा चा हात पकड

    बळीराजा चा हात पकड

    सौ. पद्मजा जोशी

    बळीराजा सुखावला

    आले दाटुनी आभाळ
    कडाडत विजांसवे
    बरसती मृगधारा
    देई मना स्वप्न नवे….

    लगबग पोशिंद्याची
    पेरणीची चाले घाई
    टोबे बियाणे मातीत
    आनंदली काळी आई….

    वाट पाहतो सरींची
    डोळे लावूनि नभात
    एकटक आभाळास
    दिनरात न्याहाळत…..

    करी हा काबाडकष्ट
    घाम गाळीतो मातीत
    सदोदीत धास्तावून
    नापिकीच्या हा भीतीत,,,

    भोळा माझा बळीराजा
    घाली साकडं शंभुला
    डोईवर थंड धार
    मेघास बरसण्याला….

    कोंब पाहुनि मातीत
    मनोमनी धन्य झाला
    सरीमध्ये बरसत्या
    बळीराजा सुखावला….

    मनी स्वप्न रंगवित
    झोप लागे त्यास छान
    कणग्या भरू धान्यांन बळदाची आता शान….

    आनंदा आलं उधाण
    बळीराजा सुखावला
    औंदा फिटणारं कर्ज
    स्वप्नातच या रंगला……

    सौ. पद्मजा जोशी
    पुसद

याला जीवन ऐसे नाव

शेतात फुलला कापूस
कापसाला नाही भाव
शेतक-यांच्या फाटक्या धोतराला
जीवन ऐसे नाव

राबती हात मळ्यात
भाजी विकती बेभाव
माळ्याच्या चटणी-भाकरी ला
जीवन ऐसे नाव

बांधती मजल्यावर मजले
वसवती दुसऱ्याचे गाव
मजुराच्या तुटक्या झोपडीला
जीवन ऐसे नाव

मागती दगडाच्या देवाला
मंदिरात चोर साव !
रंकाच्या रिकाम्या झोळीला
जीवन ऐसे नाव

अपत्यांच्या हृदयातून ओसरला
मातृ पितृ प्रेमाचा आव !
गच्च भरलेल्या वृद्धाश्रमाला
जीवन ऐसे नाव

कमविण्यासाठी मोठी नोकरी
करतो नेहमीच धावाधाव !
माणसाच्या रिकाम्या खिशाला
जीवन ऐसे नाव

रांधते सुग्रास भोजन
सगळेच मारतात ताव !
गृहिणीच्या ताटातल्या खरडणाला
जीवन ऐसे नाव

सुरूच राहणार जीवनात
ऊन सावलीचा हा लपंडाव !
पदरी पडलेल्या सुखाला
जीवन ऐसे नाव

 

सौ.शरयु कोंडगिरे

 

हे दिवस पण निघतील-शेतकरी कविता

शेतातूनच व्हायला पाण्याचा महापूर !

पडून राहयली पिवळी सोयाबीन अन् तूर !!

टिकून नाही राहिलं कपाशीले बोंड !

शेतकऱ्याचा जन्म जसा गळ्यातला धोंड !!

 

महागाईनं मारलं तरी निसर्ग तारते !

सांगा कवा माय आपलं पिल्लूच मारते !!

घरात असलं नसलं तरी रोजच रांधते !

पक्वान्न नसले तरी चारघास चारते !!

 

शिक्षणासाठी पोराले धाडीन शहरात !

अन् पाहीन जोडवे पोरीचा पायात !!

सुटला आता धीर , कुठंल आणू अवसान !

शेत केल उजाड , या अवकाळी पावसान !!

 

कसा जाईल तोंडात घास , ताटात नसून !

कसं चाललं शेतकऱ्याला , हताश बसून !!

हे दिवस पण निघतील ,जाऊ नको खचून !

उठ आता लेकरासाठी , घे कंबर कसून !!

सौ.शरयु कोंडगिरे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!