Marathi Rain Song-तुझ्या माझ्या सवे
Marathi Rain Song-तुझ्या माझ्या सवे

Marathi Rain Song-तुझ्या माझ्या सवे

Marathi Rain Song-तुझ्या माझ्या सवे

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही

पाऊसधारांनी वसुंधरा भिजली कि आनंदाचा उत्सव सुरु होतो.
दरवर्षी पाऊस नवनवीन रुपे घेऊन येतो.त्यामुळे पाऊस जुना कधी वाटत नाही आणि कितीही पावसाळे बघितले तरी मन काही तृप्त होत नाही.
पावसाच्या मोत्यांनी सजलेल्या धारा बघत रहाव्या आणि आठवणी,कल्पना यात रमावे…

अशा या पावसाचे थेंब पडायला लागले,थेंबांच्या स्पर्शाने मृदगंध दरवळायला लागला कि काही गाणी हमखास मनाचा ताबा घेतात,मनात रुंजी घालायला लागतात.

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस …हे गीत अशाच पावसाळी आठवणीत घेऊन जाणारे आहे.तो आणि ती कधीकाळी पावसासोबत गायचे…
सुंदर पाऊसगाण्याचे रसग्रहण रागिनी पवार यांनी केले आहे.

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही…..

पाऊस कित्येक सुखद आठवणी घेऊन येतो तसाच तो हुरहूर लावणारा ही असतो.
पाऊस म्हणजे हिरव्याकंच मनाला फुटलेला प्रेमांकुर.या पावसाच्या किती म्हणून रंगछटा असतात,प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा असतो.
पहीलं प्रेम आणि पाऊस ही केमिस्ट्रीच काही और आहे. तो फक्त बरसत नाही तर प्रेमीयुगूला सोबत स्वतः ही गुणगुणतो..म्हणूनच कवी संदीप खरे असे म्हणतात,

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला-
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

अता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खूणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

संदीप खरे लिखित हि गजल नामंजूर या अल्बम मधील सलिल कुलकर्णी यांच्या स्वरांनी सजलेली.ऐकत असताना श्रोत्याचाच भुतकाळ जणू कवीने चित्रित केला आहे असे वाटते.
प्रियकर आणि प्रेयसीची पावसातली भेट म्हणजे सोने पे सुहागाच…अगदी आतुरतेने प्रेयसीची वाट पाहणारा प्रियकर तिच्या येण्याने जेवढा सुखावतो तेवढाच तो पावसाच्या येण्यानेही मोहीत होऊन जातो.
प्रियकर प्रेयसी च्या साथीने गुणगणणारा पाऊस.प्रेयसीला साद घालता पाऊसच आधी येऊन ठेपायचा आणि प्रियकराला वेड लावायचा.तो प्रियकराचा पक्का मित्र होऊन जायचा.
प्रेयसीचे भिजलेले रुप पाहताना सगळ्या सभोवतालाचा विसर पडायचा.
भेटीची वेळ संपत आली की प्रियकर प्रेयसीला थांबण्यासाठी आर्जव करत असता पाऊस नेमकी मध्यस्थी करायचा.
जाऊ नकोस म्हणून थांबवणाऱ्या प्रियकराचा लटका राग धरणारी प्रेयसी,तिच्या प्रेमाला भिजलेला पाहून सगळा राग विसरुन जायची.त्याच्या प्रेमात आकंठ बुडायची.
प्रेयसीचे मादक रुप पाहून पावसावर जळणारा प्रियकर तिच्या स्पर्शासाठी आतुर होऊन जायचा.
आज जेंव्हा जेंव्हा पाऊस येतो तेंव्हा तेंव्हा हे सर्व चित्र डोळ्यांसमोरून सरकत जाते.प्रियकराला या आठवणी व्याकुळ करतात,त्या खुणा ते ठिकाण तो आवर्जून पाहतो.
असा हा वेल्हाळ पाऊस मना मनात प्रेम भरुन जातो.
कवी संदीप यांच्या लेखणीतून बहरलेला पाऊस सलील यांच्या सलील सुरांनी अगदी तरल होत जाणारा,मन मोहीत करून जातो.

रागिणी पवार

प्रिय वाचक,श्रावणधारांनी धरा चिंब झाली की आनंदोत्सव सुरु होतो.अशा रम्य पावासाळी वातावरणात तुम्हालाही काही पाऊसगाणी आठवत असतील….पाठवा तर मग पावासाळी गीताचे रसग्रहण
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!