परवड-marathistory
विवेक आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. विवेकला दोन बहिणी, मोठ्या बहिणीचे लग्नं झालेले आणि दुसरी बहीण विवेक पेक्षा लहान. आई-वडिलांनी विवेकचे यंदा लग्नं आटोपून घ्यावे असा निर्णय घेतला. आणि विवेक साठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दोन-तीन मुली बघितल्यात सुद्धा. त्यातील एकही मुलगी विवेकला लक्षात आली नाही. पण विवेकच्या आईला त्याच मुली लक्षात आल्या होत्या, कारण त्या मुलींचे आई-वडील भलामोठा हुंडा देण्यास तयार होते. पण विवेकला चौथ्या नंबरला बघितलेली दीक्षा पसंत आली होती. दिसायला दीक्षा खूपच सुंदर, गोरीसी, बांधेसूद, काळेभोर लांबसडक केस, आणि शिकलेली मुलगी होती. विवेकला स्वतःची अर्धांगिनी म्हणून दिक्षाच हवी होती. आणि विवेक आई-वडिलांना बोलला की, ” करणार तर मी दीक्षा सोबतच लग्नं करणार”.
विवेकच्या जिद्देखातर विवेक आणि दीक्षाचे पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्नं पार पडले. दीक्षाचा गृहप्रवेश झाला.
लग्नानंतर लगेचच दीक्षा घरातील सर्व कामे करू लागली. विवेकच्या आईने दीक्षा घरात सून म्हणून आल्यानंतर धुणी-भांडी करणारी बाई काढून टाकली होती. त्यामुळे धुणीभांडी, घराची साफसफाई, सकाळी चहा-नाष्टा, दोन वेळचा स्वयंपाक… एकंदरीत घरातील सर्वच काम दीक्षा करत असे. दीक्षा सकाळी पाच वाजेपासून कामाला सुरुवात करत असे ते रात्री अकरा वाजेपर्यंत दीक्षा काम करत असे.
तसे घरात विवेक, विवेकचे आई- वडील, एक बहीण, दीक्षा आणि एक मांजर असा परिवार होता.
घरातील सर्व मंडळी,
दूध+ साखर +चहाची पावडर =असा चहा बनवून पीत असे. परंतु दीक्षाला जर चहा घ्यायचा असेल तर सर्वांचा चहा पिऊन झाल्यानंतर गाळलेल्या पत्ती मध्ये पाणी टाकून तो उकळून दीक्षाच्या कपात ओतला जात असे. आणि दीक्षा असाच चहा रोज पीत असे.
दीक्षा रोज सर्वांसाठी सकाळचा चहा, नाष्टा आणि दोन वेळेसचा ताजा स्वयंपाक बनवून सर्वांना गरम-गरम जेवण बनवून वाढत असे. सोबतच घरच्या मांजराला सुद्धा ताजा स्वयंपाकच मिळत असे.
परंतु दीक्षाला मात्र रोज शिळे उरलेले खाण्यासाठी दिले जाई आणि दीक्षा रोजच शिळ्या स्वयंपाकाचे जेवण करत असे. तरीही दीक्षाची कसलीही तक्रार नव्हती.
विवेक आणि दीक्षाचा संसार ठीक सुरू होता कारण विवेकला दीक्षा सोबत घरात असा व्यवहार होतो याची थोडीशीही कल्पना नव्हती.
दीक्षाला घरी कधी कपडे घेतले नाहीत किंवा कधी कुठलेही आभूषण घेतले नाहीत. तर जे काही थोडेफार कपडे होते ते ठेवण्यासाठी घरामध्ये दीक्षासाठी कपाट नव्हते की, कपाटात एखादा कप्पा ही नव्हता. तसेच सुटकेसही नव्हती. तर दीक्षा स्वतःची कपडे गाठोडया मध्ये बांधून ठेवत होती. आणि दीक्षासाठी कधी काही खरेदीच केली नसल्याने दीक्षा घरातील मोलकरीण सारखीच दिसायची. सोबत घरातील थोर्यामोठ्यांच्या आशीर्वादाने दीक्षाला घरामध्ये मोलकरीणचाच दर्जा होता. तरीही साध्याभोळ्या दिक्षाने हे सर्व पचवून घेतले.
आता लग्नाला एक-दीड वर्ष झाले होते.
दीक्षाला प्रेग्नेंसी कन्सिव झाली. दीक्षाला वाटले आतातरी घरचे वातावरण बदलेल पण दीक्षाला प्रेग्नेंसी असूनही दीक्षा जसे आधी काम करत होती तसेच प्रेग्नेंसी असूनही दीक्षा नमुटपणे सर्व काम करत असे.
दीक्षाला आता नववा महिना लागला होता. आणि दीक्षाचे वडील तिला डिलिव्हरीसाठी माहेरी घेऊन गेले.
दीक्षाला सुंदर गोरी-गोरी, लोभस, गोंडस मुलगी झाली. दीक्षाची तब्येत खूपच विक झाली होती. म्हणून डिलीवरीनंतर दीक्षाच्या आईवडिलांनी दोन महिने आरामासाठी माहेरी ठेवून घेतले.
डिलिव्हरी नंतर दोन महिने दीक्षाने आराम केला त्यामुळे दीक्षाच्या सासूला खूप राग आला. कोणालाही काहीही न बोलता, न सांगता, दीक्षाच्या माहेरी दिक्षाची सासू पंच घेऊन घरच्या मंडळी सोबत पोहोचली. आणि कुठलाही मागचा-पुढचा… विचार न करता…जे मनात येईल ते … दीक्षाच्या माहेरच्या मंडळींना बोलली. वादावादी सुद्धा केली. आणि सर्व मंडळी वापस गेली.
आता दीक्षा माहेरीच होती. तिला कोणीही घरी येण्याबद्दल बोलले देखील नाही. इकडे दीक्षाचे आई-वडील, बहिण-भाऊ सर्वांना खूप वाईट वाटत होते. आपली दीक्षा किती विचित्र विचार प्रवृत्तींच्या लोकांसोबत आपले जीवन व्यतीत करीत आहे.
एक महिना झाल्यानंतर अचानक एक दिवस विवेक दीक्षाच्या माहेरी आला आणि दीक्षाला व स्वतःच्या मुलीला घरी परत घेऊन गेला.
घरी गेल्यावर परत दीक्षाची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी पाच वाजता उठावे लागत होते. उशिरा उठलेले चालत नव्हते. सकाळी सर्वांचा चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण बनवणे, धुणी-भांडी, झाड-झुड, साफ-सफाई एकंदरीत घरातील सर्वच्या-सर्व कामे दीक्षा करणार.
दीक्षा एवढी विक होती की, तिला बाळाला पाजण्यासाठी दूध येतच नव्हते. म्हणून बाळाला पावडर चे दुध बनवून दिले जाई.
एक दिवस दिक्षा धूण धूत असतांना तिची मुलगी खुप रडत होती. जरा जास्तच रडत होती. रोजच्या प्रमाणे दीक्षाची ननंद मुलीला पावडरचे दुध बनवून पाजवत होती. दीक्षाचे म्हणणे की….!!!
“ती जास्तच रडते आहे…! मी दुध देते तिला… रोजच तुम्ही मला माझ्या मुलीला घेऊ देत नाही…माझ्या मुलीला जर घ्यायचे असेल तर मला तुमची परमिशन घ्यावी लागते. मी सर्व काम ही करेन आणि तिला दूध पण पाजेल”.
पण सासू बोलली कि,
“तू दूध पाजत बसली तर रोजच्या कामाला वेळ होईल… ! जा तुझे तुझे ते धुणे धुण्याचे काम कर…आम्ही मुलीला शांत करू”.
पण मुलगी काही शांत होतच नव्हती. दीक्षाच्या जीवाला शांत बसवत नव्हते.
ती म्हणाली,
“ती खूप रडते आहे आई…द्या तिला माझ्याजवळ… मी शांत करेल तिला… !”.
तर रागारागाने सासूने छोट्याशा मुलीला जोरात आपटून म्हणाली,
“घे तुझी मुलगी कर शांत तिला”.
दीक्षाची अवस्था स्वतःच्या घरामध्ये अशी होती की, गाळलेल्या पत्ती मध्ये पाणी टाकून उकळलेला चहा, जेवायला रोजच शिळे उरलेले, अंगावर कपडे फाटके, स्वतःचे कपडे किंवा काही वस्तू ठेवायच्या तर गाठोड्यात, स्वतःच्याच लेकराला हात लावायचा तर विचारून, परमिशन घेऊनच मग मुलीला घ्यायचे, बाहेर कुठेही जायचे नाही, की कुठला कार्यक्रम नाही, किती कठीण जीवन तरीही दीक्षा सर्व पचवत होती.
तिचा भोळेपणा तिला म्हणायचा की, कधीतरी घरचे वातावरण बदलेल. घरचे लोक माझ्याशी चांगले व्यवहार करतील.
असेच दिवसांमागून दिवस जात होते. दिक्षाने घरात छोटी जरी चूक केली की… सासू त्या चूकीचे.. “बात का बतंगड”, बनवून विवेकच्या हाताने दीक्षाला मार खाऊ घालेपर्यंत शांत बसत नव्हती.
दीक्षाचे जीवन दिवसेंदिवस केविलवाणे होत चालले होते. सासूने दीक्षाची तक्रार केली की, विवेक मारणार म्हणून भीतीपोटी स्वतःची चूक नसतानाही कितीतरी वेळा दीक्षा म्हणायची की, “हो सासुबाई जे बोलतात ते बरोबर आहे. माझे चुकले…!”.
पण विवेकने कधीही दीक्षाला विचारले नाही की,
“माझी आई सांगते आहे ते बरोबर आहे का?”.
उलट विवेकचे विचारण्याची पद्धत वेगळीच होती. आईने तक्रार केली की, विवेक डायरेक्ट दीक्षाच्या अंगावर… धावून…. डोळे मोठे करून.. हात उजारुन….मगच विचारणार की,
“हो का असेच आहे का?”.
“आई सांगते ते बरोबर आहे का?”.
दीक्षा बिचारी केविलवाण्या स्वरात मार वाचवण्यासाठी हो आई सांगतात ते बरोबर आहे.
काय तर फक्त… आता नवरा तुडवणार …हे वाचविण्यासाठी चूक नसतांनाही स्वतःची चूक आहे असे स्वीकारायची.
याचा परिणाम असा झाला की, “विवेकच्या दृष्टीने …माझी आई बरोबर असते आणि दीक्षा नेहमी चुकीची वागते”.
आता दीक्षाला स्वतःची बाजू सांगण्यासाठी घरात कोणीच नव्हते.
असेच दिवसांमागून दिवस जात होते.
दिक्षाच्या लहान नणदेचे लग्नं ठरले. आणि रिती रिवाजानुसार थाटामाटात साजरे झाले. पण दीक्षाला त्या लग्नामध्ये कुठेही मानपान, घरची सून म्हणून एक सन्मान नव्हता. दीक्षा लग्नसमारंभात कुठेही समोर नव्हती. आणि तिच्यासाठी कोणी नवीन कपडे सुद्धा खरेदी केले नाही.
आता दीक्षाची मुलगी तीन वर्षाची झाली होती. दीक्षाला दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी कंसीव झाली. पहिल्या प्रेग्नेंसी मध्ये तर शीळे खाण्यासाठी मिळत होते. परंतु दुसऱ्या प्रेग्नेंसी मध्ये तर जेवणात पूर्ण नऊ महिने शीळी पोळी आणि सोबत मिरचीचा ठेचा होता. सोबत भांडणाची शिदोरी, मार, घरातील सर्व कामे होतीच. नववा महिना लागल्यावर दीक्षाचे वडील दीक्षाला माहेरी नेण्यासाठी आले. दुसर्याही डिलिव्हरीसाठी दीक्षा माहेरी गेली होती. सासूने तिची डिलिव्हरी केली नव्हती.
नऊ महिने पूर्ण झालेत. दीक्षाला कळा सुरु झाल्यात. आई-वडीलांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी दिक्षाची तपासणी केल्यानंतर… आई- वडीलांना… बोलण्यासाठी बोलवून घेतले आणि दीक्षाच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. प्रसूती दरम्यान आम्ही सर्वजन.. पूर्ण काळजी घेऊत परंतु दीक्षाची तब्येत खूपच नाजूक आहे. आम्ही दिक्षाची आणि होणाऱ्या बाळाची guarantee घेऊ शकत नाही.
दुसरा मुलगा झाला पण मुलगा वजनाने खूप कमी होता, अशक्त होता आणि पुर्ण हिरवागार जन्माला आला होता. तातडीने बाल रुग्णालयात मुलाला दाखल करण्यात आले. इकडे दीक्षाचे सासू-सासरे, नवरा यांना डॉक्टरांनी बोलावून घेतले आणि दीक्षाच्या तब्येतीविषयी विचारपूस केलीतर…. दीक्षाच्या सासूने उडती-उडती उत्तरे दिली.
घरच्या लोकांनी दीक्षाच्या सासूने पुन्हा एक खोटे बोलले की, आम्ही तिला सर्व खाण्यासाठी देत होतो. तिच ठेचा-शिळीपोळी रोज खात होती. डॉक्टर बोलले तुमच्या घरचे आम्हाला काही सांगू नका. पेशंटच्या तब्येतीविषयी आपण बोलू आणि पेशंटच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
इकडे काही दिवसानंतर बाल रुग्णालयातून बाळ पूर्णपणे बरा झाल्याच्या नंतर बाळाला घरी घेऊन आलेत. आणि हॉस्पिटलचा सर्व खर्च दीक्षाच्या आई-वडिलांनी केला. दीक्षाच्या घरचे वातावरण बघता आईवडिलांनी दीक्षाला सहा महिने पाठवलेच नाही.
त्या दरम्यान दीक्षाच्या लहान बहिणीचे लग्नं जुळले. दीक्षाच्या लहान बहिणीच्या लग्नाला दीक्षाच्या घरून कोणीही आले नाही.
दीक्षाच्या बहिणीच्या लग्नं समारंभात दीक्षाच्या घरचे कोणीही सहभागी झाले नाहीत. फक्त दीक्षा एकटीच होती.
काही दिवसांनी म्हणजेच डिलिव्हरी झाल्याच्या सहा महिन्यानंतर एक दिवस अचानक विवेक दीक्षाच्या माहेरी येऊन….दीक्षा, मुलगी आणि मुलगा सर्वांना घरी घेऊन गेला.
काही दिवस सर्वकाही व्यवस्थित सुरू होते अचानक एक दिवस दीक्षाची तब्येत ठीक नव्हती. तिला चक्कर येत होत्या. दीक्षा रोज पिण्याचे पाणी पंधरा-वीस मिनिट चालावं लागेल एवढ्या अंतरावरून स्वतः पायी चालून घागर कडेवर घेऊन बोरवेल वरून पाणी आणत असे. परंतु तब्येत ठीक नसल्यामुळे दीक्षा बोलली की,
“मी आज पाणी आणू शकत नाही. माझी तब्येत ठीक नाही. मला बरं वाटत नाही”.
त्यावर सासू , “तू… अशीच कशी बोलली की …माझी तब्येत ठीक नाही ….पाणी तर तुलाच आणावे लागणार”.
…तब्येत ठीक नसल्याकारणाने चक्कर येत असल्यामुळे दीक्षा पाणी आणायला गेली नाही.
“तू असे कसे… पाणी आणणार नाही …तू पाणी नाही आणले तर …सर्वांनी कुठले पाणी प्यायचे …!”.
असे आणि बरेच काही दिक्षाची सासू बोलत होती. आता दीक्षाची तब्येत ठीक नव्हती. तीसुद्धा हाडामासाचीच बनलेली आहे ना…!
त्या कारणावरून दीक्षा जशी होती तशी म्हणजेच घरच्या अवतारात, अंगावर जुने फाटके कपडे, जवळ एकही वस्तू नाही आणि एक रुपया सुद्धा नाही. अशा अवस्थेत विवेकने दिक्षाला महामंडळाच्या गाडीत बसवून दिले.
आणि विवेकने दीक्षाच्या भावाला फोन केला की, दीक्षाला माहेरी पाठवली आहे…
तिला उतरून घ्या…!
बस मध्ये दीक्षा एकटीच रडत बसली होती. एका बाईने दीक्षाला विचारले,
“बाई तुम्ही का रडता… तुमच्या सोबत कोणीच नाही का?”.
त्यावर दिक्षाने झालेला सर्व प्रकार त्या बाईला सांगितला.
मग त्या बाईने दीक्षाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले आणि दीक्षा तिच्या माहेरी पोहोचली.
काही दिवस दीक्षा माहेरीच होती. दीक्षाचे दोन्ही मुलं सासुनी स्वतःजवळ ठेवून घेतले होते.
एक दिवस अचानक दीक्षाच्या मुलीला बरे वाटत नव्हते. परंतु काळजी न घेतल्यामुळे तब्येत जास्तच खराब झाली होती. म्हणून मुलीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेले … मुलीची तब्येत ठीक नसूनही …दीक्षा….हाॅस्पिटलमधे येवुनही, मुलाला भेटू दिले नाही.
काही महिन्यानंतर विवेक अचानक दीक्षाच्या माहेरी येऊन दीक्षाला घरी घेऊन गेला.
काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होते. एक दिवस दिक्षाने घरी कपडे ठेवण्यासाठी सुटकेस नाही, कपाट नाही, कपाटामध्ये साधा एक कप्पाही नाही म्हणून आईकडून चैन च्या दोन बॅग घेऊन आली होती. तिला काही सामान ठेवण्यासाठी दीक्षा बॅग शोधत होती. दीक्षाला बॅग सापडले नाहीत म्हणून फक्त सासूला विचारले की…
“मी आई कडून चैनच्या बॅग सामान ठेवण्यासाठी आणल्या होत्या. त्या बॅग मला दिसत नाही आहेत. मी त्या बॅग शोधत आहे. मला काही सामान त्यात ठेवणे आहे. कुठे आहे त्या बॅग?”.
बस त्यावरून घरात कडाक्याचे भांडण झाले आणि दीक्षा ला सासूने
…..मुसळधार पाऊस सुरू असून सुद्धा,
…..मुसळधार पावसात घरातून बाहेर ढकलून हाकलून दिले. ती बिचारी पावसात भिजत-भिजत पायी चालत, रडत-रडत…. विवेक नि एक नवीन घर बांधले होते त्या घराच्या ओट्यावर ओलीचिंब तशीच जाऊन बसली. आणि बराच वेळ रडत होती.
काही वेळाने दिक्षाने शेजारील बाई कडून फोन घेऊन विवेकला फोन लावला …
त्यानंतर विवेकने नवीन घराची चावी घेऊन आला आणि इथून पुढे विवेक,
…दीक्षा आणि मुलांना घेऊन तिथेच राहू लागला.
तिकडे दीक्षाचे सासू-सासरे शेजारी-पाजारी सोबत नीट वागत नव्हते. म्हणून घरमालकाने दीक्षाच्या सासू-सासर्यांना घर सोडण्यास सांगितले.
त्यानंतर दीक्षा जिथे राहत होती. तिथेच वरच्या मजल्यावर दीक्षाचे सासू-सासरे राहायला गेले.
काही दिवसांनी….
राहत्या घराच्या बाजूला जागा घेऊन विवेकने तीन मजली घर बांधले,
“घर… नवीन पद्धतीने… सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सजवले होते”.
नवीन घराचा वास्तु करण्याचे ठरले. घर विवेकने बांधले होते. वास्तु-पूजेला विवेक आणि दिक्षाने बसायला हवे होते. परंतु सासूने वास्तु पूजेला स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बसवून पूजा सुरू केली. दीक्षाचे म्हणणे, “की घर आपण बांधले वास्तु-पूजेला आपण पण सोबत बसुत”.
बस….
यावरून पूजा सुरू असतानांच वाद सुरू झाला आणि आणि याचा परिणाम दीक्षाला दातखिळी बसली. हात पाय वाकडे झाले. दीक्षा बेशुद्ध पडली. तिला त्या अवस्थेत सोडून घरची मंडळी तशीच पूजाकडे निघून गेली. इकडे दीक्षाच्या वहिनीने कसेबसे दातखिळी बसलेले दात मोकळे केले. दीक्षाला शुद्धीवर आणले आणि हॉस्पिटलला घेऊन गेली….
फक्त आणि फक्त ह्याच वेळेस विवेक आईला बोलला,
“दीक्षा तुला नको आहे ना… मग मी पण मरतो जा ..म्हणजे तुला समाधान होईल”.
कारण विवेकचे दीक्षा वर खूप प्रेम होते आणि आहे सुद्धा…..
बस……
विवेकच्या तोंडून दिक्षाबद्दल च्या भावना अचानक दिक्षाच्या कानावर पडल्यात आणि दिक्षाने ठरवले की,
“माझ्यासोबत कोणीही आणि कसाही व्यवहार घरात केला, तरी विवेकची साथ सोडायची नाही…!”.
दिक्षा सोबत घरात जी वागणुक केली जाते त्याची कल्पना, “आप्तेष्ट-नातेवाईक, मित्र-मैत्रिणी ,
शेजारी-पाजारी, बहुदा अनेकांना माहिती आहे”.
विवेक आणि दिक्षाचा संसार ठीक व्हावा यासाठी काही जवळच्या नातेवाईकांनी प्रयत्न देखील केलेले पण असफल…
शेवटी दिक्षाने पतीच्या प्रेमाखातर मनाची तयारी करून सगळ्यांचा अंगीकार करायचं ठरवलं आणि स्वतःचा संसार टिकवून ठेवला. पण…..त्यासाठी दिक्षाला स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करावा लागला. “दिक्षाच्या वाट्याला काय आले?”
“…शेवटी भारतीय स्त्री ती…!.”🙏🏻
स्मिता औरंगाबादकर
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुंदर मांडणी
छान लिहिले
खूपच छान 👌