या जन्मावर या जगण्यावर-समीक्षण
या जन्मावर या जगण्यावर-समीक्षण

या जन्मावर या जगण्यावर-समीक्षण

या जन्मावर या जगण्यावर-समीक्षण

 पेपरमध्ये अरुण दाते यांनी

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

ह्या गाण्याबद्दलचा सांगितलेला किस्सा वाचण्यात आला. आणि  शब्दात,सुरात किती ताकद असते याची जाणीव झाली.

एक नशेच्या आहारी गेलेला मुलगा(drugs addict) drugs घ्यायला दुकानात गेला.तिथे बाजूलाच असलेल्या टपरीवर या जगण्यावर या जन्मावर…हे गाणे सुरु होते.
ते गाणे ऐकता ऐकता त्याचे भान हरपले.तो दुकानात कशासाठी आला होता ते विसरला आणि  तिथून गाण्याच्या कॕसेटस् मिळतात त्या दुकानात गेला.तिथून ह्या गाण्याची कॕसेट घेतली आणि  जीवनावर,जगण्यावर प्रेम करणे शिकवणारे हे गाणे दहा बारा वेळा ऐकले.नंतर त्याची drugs घेण्याची इच्छा संपून गेली.
फक्त शब्दांच्या जादूने तो नशामुक्त झाला. समजा त्याने ते गाणे ऐकलेच नसते तर जीवनावर,जगण्यावर प्रेम करावे हे त्याला कळले नसते.
असे काय आहे ह्या गाण्यात? हा विचार मनात येताच गाण्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा मोह आवरला नाही.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
गाण्याचे शब्द अर्थातच मराठी रसिकांवर वर्षानुवर्ष आपल्या शब्दांनी गारुड करणारे, जीवनावर समरसून प्रेम करणारे,रसिकांनाही जीवनावर प्रेम करण्याची प्रेरणा देणारे  कवी मंगेश पाडगावकर यांचे. 
कवितेचे गाणे करतांना  सुरेख स्वरसाज चढवला आहे यशवंत देव यांनी.
आणि गाण्याचे चढउतार शब्दानुरुप उतरवलेला हळूवार,मुलायम आवाज आहे अरुण दाते यांचा 
गाण्याच्या पहिल्याच ओळीत अवघ्या गाण्याचे सार,आशय आहे.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
या जन्मावर,जगण्यावरही कितीदा प्रेम करावे?
तर शंभरवेळा.
जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जगण्यावर  प्रेम करत राहावे.
जीवन अमाप सौंदर्याने काठोकाठ भरले आहे. 
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
चंचल  वाऱ्यासोबत बरसणाऱ्या पाऊसधारा, त्या पावसामुळे सुपीक झालेली माती आणि मातीत अंकुरीत होऊन प्राण फुटलेले  बीज बाहेर येते. त्याला न्याहाळले तर तुमच्याही  कोरड्या झालेल्या,निराशेने ग्रासलेल्या मनात आशेची पालवी फुटेल.
झाडांवर,वेलींवर उमललेली फुले बघून प्रेयसीची प्रणयभाव आठवा.अर्ध्या उमललेल्या,लाजऱ्या  फुलांसारखी तिही लाजरी आहे.फुले बघून नक्कीच तिचे फुलपाकळीसारखे ओठ आठवेल.
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
सांजवेळी  रंगांचा पंखा उघडून अवघे आसमंत रंगवणारा  सांजवेळ रंगवणारा चित्रकार कोण असेल? आसमंतात रंंग उधळणाऱ्या  त्या जादूगराला स्मरा.
चहूबाजू अंधारलेल्या आहेत पण तरीही आभाळभर पसरलेलं चांदणं आशेचा कवडसा दाखवण्यास समर्थ आहे. सहा ऋतूंचे सहा सोहळे…हे सगळे भान हरपणारे आहे.जीवनाचा,जगण्याचा लोभ,प्रेम निर्माण करणारे आहे.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
बाळाच्या ओठातून आलेली बोबडी हाक,त्याचे बोबडे बोल
वेलीवर प्रेमापोटी जन्मलेली फुले,
एकमेकांवरील प्रेमापोटी जन्मलेले नवे जीव,सृजनशीलता …हे  सगळे सगळे जीवनावर,जगण्यावर प्रेम करायला शिकवते,
नदीच्या काठी प्रिय व्यक्तीसाठी गाणे गा.कळेल तुम्हाला जगण्यातील सुंदरता.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे.
इथले जगणे एकदाच मिळते.त्यासाठी हजारदा इथली माती चुंबून तिचे आभार मानावे.
एका संकटाने कशाला घाबयरायचे.इथले जगणे इतके सुंदर आहे कि त्यासाठी अनंत अडचणी, संकटे आली तरी ती प्रेमाने झेलावी.
जगा,जगण्यावर प्रेम करत जगा.तसे जगलात तर इवल्याशा पिंपळपानावरही तुम्हाला  अवघे विश्व दडलेले दिसेल.
जगा समरसून जगा, जगण्यावर प्रेम करा,
जीवनावर प्रेम करा….शतदा शतदा

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!