marathi song -राजा ललकारी अशी घे
मोहिनी शैलेश पाटनुरकर
गीतकार : जगदीश खेबुडकर , प्रा. विठ्ठल वाघ.
गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
संगीतकार : अनिल अरुण
चित्रपट : अरे संसार संसार (1981)
गीत : *राजा ललकारी अशी घे*
बापु (कुलदीप पवार ) सरळमार्गी चालणारा एक रांगडा शेतकरी. एका लहान गावातील छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर राबुन आपली उपजीविका करणारा.
रत्ना ( रंजना) त्याची सुंदर सुस्वभावी बायको.
दोघे मिळून शेतीसाठी खूप मेहनत घेतात . बायको आणि लेकरांना खाऊन पिऊन सुखी आयुष्य मिळावं एवढाच त्याचा प्रामाणिक हेतू.
बापुची तंबाखूची शेती. गावच्या सावकाराचे रत्नावर (अशोक सराफ) वाईट नजर असते. बापुला बाजूला करून , कर्जात बुडवायचा त्याचा दुष्ट हेतू असतो की जेणेकरून रत्ना त्याला वश होईल. पण बापु सावकाराकडे शेतीमाल न विकता थेट बाजारात नेतो. अवकाळी पावसामुळे त्याचा शेतीमाल खराब होतो आणि सगळं पाण्यात वाहून जाते. रत्ना भक्कम खांबा सारखी त्याच्या पाठीशी उभी राहते. बापुच्या कामात मदत करून अर्धांगिनी म्हणून सिद्ध होते आणि सावकाराचा बेत हाणून पाडते. अशी संसारा सोबत कर्तव्यात साथ देताना रंगलेलं त्यांचं प्रेमगीत, निसर्गगीत.
शेती करणे म्हणजे उन्हातान्हात राबणे . कामात जर चांगली सोबत मिळाली तर कामाचा ताण कमी होतो आणि वेळ कसा निघून जातो कळत पण नाही. त्यात जर सुंदर बायकोची सोबत मिळाली तर मग काय बोलायचं काम नाही. मग असे युगलगीत गुणगुणल्या जाणारच.
राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे
ती : कुंकवाचा माझा धनी , बळ वाघाचं आलंया
तो : भरलेल्या मोट वानी , मन भरून गेलया
ती : ओढ फुलाला वाऱ्याची, तशी खुण इशाराची
माझ्या सजणाला कळू दे
हाक दिली साद मला दे .
तिच्यासाठी तो राजा आहे. शेतकरी राजा
तिचा राजा एक उमदा रांगडा तरुण शेतकरी. ती गाण्यातून त्याला हाक मारते आणि त्याला साद ही मागते. तु पण शांत नको राहू ललकारी घे.
मी सदैव तुझ्या सोबत असेल हेच या ओळीतून सुचवायचे आहे .
भारतीय संस्कृतीत नवरा म्हणजे कुंकवाचा धनी. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी त्याच्यात वाघाचं बळ आलं . बायकोची साथ असल्यावर तो जास्त मेहनतीने शेतीत राबतोय . तिची अशी हवीहवीशी वाटणारी संगत मिळाल्याने त्याचं मन शेतातल्या मोटे सारखं भरून गेलं. भरलेली मोट म्हणजे सुख समाधान प्रेम या ओळीतून सुचते .
फुल पूर्ण रूपाने फुलले म्हणजे त्याला प्रणयी वाऱ्याची ओढ लागते जेणेकरून फुलातील परागण वाऱ्यासोबत इतस्तः विखरून नवीन आपल्यासारखाच रोप तयार व्हावं.
हाच इशारा ती गाण्यातून व्यक्त करते . आपली संसार वेल बहरावी हे आता त्याला कळू दे आणि माझ्या हाकेला साथ दे.
तो : सुर भेटला सुराला , गाणं आलं तालावर
ती : खुळ्या आनंदाचं माझ्या , हसू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलु दे
त्याच्या बेसूर सुराला एक नवीन लयबद्ध सूर भेटला आणि त्याचं गाणं पण लयीत आलं म्हणजे त्याच्या एकट्या वाटणाऱ्या रुक्ष आयुष्यात रत्नाच्या प्रवेशाने मधुरता आली.
तिला संसारात मिळणाऱ्या छोट्या छोट्या खूळचट आनंदाचं प्रतिबिंब ती बापुच्या हसऱ्या गालावर अनुभवते .
स्वतःच्या संसार बहरण्यासोबतच त्यांना शेत पण बहरलेलं हवं आहे . माझ्या भरजरी हिरव्या साडी सारखाच शिवाराने पण हिरवा शालू पांघरावा .
या गर्द हिरव्या रंगातच ती खुलून दिसते तसेच शिवार खुलु दे. असं त्यांचं निसर्गाला मागणं आहे .
ती : थेंब नव्हं हे घामाचं , त्याचं बनतील मोती
तो : घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
ती : न्याहारीच्या वखुताला , घडीभर ईसाव्याला
दोघे : सावली ही संग मिळू दे
हाक दिली साद मला दे
राजा ललकारी अशी घे
शेती कसण्यासाठी त्याने गाळलेलं घाम कधीच वाया जाणार नाही . या मेहनतीच्या घामातून जोंधळ्यात टपोरे मोती बनतील. ही काळी माती आपली आई आहे तीच सुखाचा घास भरवेल.
ती दोघेही एकमेकांचे आधारवड आहेत . सोबत चटणी भाकर खाताना एकमेकांची सावली अशीच मिळावी .
अशी हाक ती त्याला घालते आणि त्याच्या प्रतिसादाच्या ललकारीची अपेक्षा करते.
रांगडा कुलदीप पवार आणि चेहऱ्यातून सहज अभिनय करणारी रंजना दोघे बापु रत्नाच्या भूमिकेत चपखल बसले.
जीव ओतून अभिनय जिवंत केला .
अशोक सराफनी खलनायकी सावकार असा वठवला की बघणारा नकळत एखादी शिवी नक्कीच देऊन जाईल. (मनातल्या मनात )
या सुंदर चालीच्या गीतासोबतच
काळया मातीत मातीत तिफन चालते आणि
विठु माऊली तु माऊली जगाची
ही अजरामर गीते याच चित्रपटातील आहेत.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
मधूर गीताचे सुंदर रसग्रहण
Wahh
अप्रतिम
गाण्याप्रमाणे सुंदर रसग्रहण
Khup mst.. 👍