वाट बोलके चित्र
वाट बोलके चित्र

वाट बोलके चित्र

एक  लांबच लांब वाट बघून  मन विचार करतयं
कितीजण या वाटेवरुन गेले असतील
ही वाट कितीजणांना इच्छित स्थळी पोहचवत असणार.
किती जण मध्येच ही वाट सोडून परतले असतील.
किती जण या वाटेवरुन चालता चालता थकले असतील .
किती जणांनी मध्येच ही वाट सोडून दुसरी वाट शोधली असेल
किती जण या वाटेवरुन आले आणि  गेले असतील.
किती जणांचे अपघात या वाटेवर झाले असतील.
कितीजणांना या वाटेने संपविले असेल
किती जणांच्या लग्नाच्या वराती या वाटेवरुन गेल्या असतील.
किती माहेरवाशीनी याच वाटेवरुन सासरहून माहेरी आणि
सासरवाशीनी माहेरवरुन सासरी गेल्या असतील.
किती प्रियजण या वाटेवर भेटले असतील
किती प्रियजणांचा विरहही ओढवला असेल
किती वेगवेगळ्या वाटा आहेत .
काही सौंदर्याने बहरलेल्या तर काही रुक्ष, ओबडधोबड  असलेल्या.
काही वाटा धुक्यात  हरवलेल्या, दिशाहीन.
काही सुंगधी फुलांनी बहरलेल्या तर काही वाटा गंधहीन फुले असलेल्या.
ज्याला जी वाट भावेल आणि झेपेल ती तो निवडतो.
काही जण जगावेगळ्या वाटा निवडणारे असतात.
तर काहीजण तीच ती रुळलेली वाट निवडतात.
वाट कोणतीही निवडा.खाचखळगे,उतार,चढ ,वळणे येणारच.
एकच वाट सरळ सरळ आपल्याला हवे तिथे जात आहे असे नाही होत कधी.
किंवा सुरूवातीला सौंदर्याने नटलेली वाट पुढेही तशीच सौंदर्य टिकवून  असेल याची खात्री नाही.
सोपी वाट निवडली तरी ती कधी वळणदार होईल सांगता येत नाही.
आता कुरुप भासणारी वाट पुढे सुंदर नसेलच कशावरुन?
अशीच एक वाट आहे. अडथळ्यांची,वळणावळणांची,चढ उतारांची.
जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंतची वाट……
या वाटेवर तुम्ही थांबा किंवा नका थांबू ती पुढे  पुढे जातच राहते. ह्या वाटेवर तुम्हाला सुख भेटते,
दुःख  भेटते.
ही वाट तुमच्यापुढे अकस्मात संकटे उभे करते,
अडथळे आणते. ते अडथळे पार करत करत पुढे जावे लागते सगळ्यांना.
ही वाट अशी आहे कि इथून मागे फिरता येत नाही.
वाट सोडून पळ काढता येत नाही.
वाट बदलवताही येत नाही.
वाटेवर टाकलेली पावले मागे घेता येत नाहीत.
इथे चालणारे वाटसरु कोणत्याही वाटेने जावो,
शेवटचा थांबा ठरलेला आहे.
ह्या वाटेवर वेगवेगळे सवंगडी मिळत राहतात. त्यांच्याशी तडजोड करत पुढे  जावे लागते.
वाटेवर भेटणारे काही सोबती सोडून जातात अर्ध्या वाटेत
तर काहीजणांना वाटेवर ठेऊन आपल्याला पुढे निघून जावे लागते.
शेवटी प्रत्येकाला  एकट्यालाच पोहचायचे आहे.
शैशव,यौवन,हे सगळे याच वाटेवर भेटतात आणि सोडूनही जातात. तुम्ही यातील कुणालाही पकडून ठेऊ शकत नाही.
वृद्धत्व तुम्हाला सोबत घेऊन जाते.
 ही वाट कधी संपेल तेही आपण ठरवू शकत नाही.
आपण तिची गती ना कमी करु शकत ना वाढवू शकत.
आपण सगळे या वाटेवरचे काही वर्षांचेच वाटसरु असतो.
आपल्याला फक्त या वाटेवर उभे राहून गंतव्य ठिकाणाची वाट बघायची आहे.
कधी कधी ही वाट आपल्या आयुष्यात आनंदाची पेरणी करत वाट सुंदर बनवते तर कधी दुःख देऊन त्या आनंदाला गालबोट लावते.
या वाटेवर आनंद पेरत गेलो तर ही वाट आनंददायी होईल
रडत ,कुढत गेलो तर दुःखी होईल.
आपणच ठरवायचे,
वाटेत भेटलेल्या गंधहीन,रंगहीन फुलांना सुगंधी, रंगीत  बनवायचे कि तसेच पुढे जायचे…..
 ही वाट हसरी बनवायची कि उदास…….

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!